AdSense code आज भारत बंद.

आज भारत बंद.

     कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचा आज भारत बंद.

भारत बंदला अनेक पक्ष, संघटना, समाजातील विविध घटकांनी पाठीबा  दिला  आहे.


 बहुमताच्या जोरावर, मनमानी पद्धतीने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱयांनी मोदी सरकारविरुद्ध अक्षरशः बंड पुकारले आहे. दिल्लीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीत 14 दिवसांपासून आंदोलन करणाऱया अन्नदाता बळीराजाच्या पाठीशी अवघा देश एकवटला असून,  'भारत बंद'ला अनेक पक्ष, संघटना, समाजातील विविध घटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्रासह अनेक राज्यांत हा बंद पाळला जाईल. केंद्र आणि भाजपशासित राज्यांकडून दडपशाही आणि साम, दाम, दंड, भेदच्या नीतीचा अवलंब होत असला तरी 'आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान' हा निर्धार देशवासीयांचा कायम आहे. दरम्यान, राजधानी दिल्लीत रॅपिड अॅक्शन फोर्ससह मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला आहे.

किमान 16 राज्यांमध्ये 'रेल रोको' होऊ शकतो. तसेच बससेवा स्थगित होईल. विमानसेवेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मोदी सरकारने तीन कृषी सुधारणा विधेयक आणली आणि कायद्यात रूपांतर केले. मात्र, या सुधारणा करताना शेतीमालास किमान आधारभूत किंमत (एमएसपी) हा महत्वाचा मुद्दाच वगळला. याचा पहिला भडका देशाचे 'गव्हाचे कोठार' असलेल्या पंजाबमध्ये उडाला आणि हे लोण हरियाणा, पश्चिमी उत्तरप्रदेशपर्यंत पोहोचले. दोन महिने आंदोलन सुरू होते; पण मोदी सरकारने लक्ष दिले नाही तेव्हा हजारो शेतकरी राजधानी दिल्लीच्या सीमेवर धडकले. लाठीमार, कडाक्याच्या थंडीत पाण्याचे फवारे मारले तरी बळीराजा मागे हटला नाही. दिल्लीच्या सीमेवरच लाखो शेतकरी बांधवांनी ठाण मांडले. देशाच्या अनेक भागातून शेतकरी तेथे पोहोचले आणि अडवणूक करणाऱया मोदी सरकारची दाणादाण उडाली. सरकारने शेतकरी नेत्यांबरोबर पाच वेळा चर्चा केली. परंतु कृषी कायदे रद्द घेतल्याशिवाय मागे हटणार नाही यावर शेतकरी ठाम आहेत. अखेर उद्या भारत बंदची हाक दिली असून, मोदी सरकार हादरले आहे.

दिल्ली आणि परिसरात फटका बसणार

या बंदचा सर्वात मोठा फटका दिल्ली आणि आजुबाजूच्या परिसराला बसणार आहे. हरियाणा, पंजाबमधून येणारे दुध, भाजीपाला, फळे वाहतूक बंद राहील. तसेच प्रवासी वाहतूक, मेट्रोवरही परिणाम होईल. विमानतळापर्यंत जाणारे रस्तेही बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विमानांच्या उड्डाणांवर मोठा परिणाम होईल.

बंद शांततेत

  • भारत बंद शांततेत असेल. दिवसभर हा बंद असेल. मात्र, दुपारी 3 पर्यंत चक्काजाम करण्यात येईल. अॅम्ब्युलन्ससारख्या आपत्कालीन सेवांसाठी रस्ता मोकळा करून दिला जाईल, असे ऑल इंडिया किसान युनियनचे नेते बलबीरसिंग राजेवाल यांनी सांगितले.
  • आमचा हा बंद केवळ पंजाब, हरियाणापुरता नाही. देशभरातून पाठिंबा मिळत आहे. हा देशव्यापी बंद आहे, असे शेतकरी नेते निर्भयासिंग यांनी सांगितले.
  • तीन कायदे मागे घ्यावे एवढीच आमची मागणी आहे. यात कायद्यांचा फायदा सरकारला आणि व्यापाऱयांना होईल. शेतकऱयांचे कुठलेही हीत या कायद्यात नाही, असे शेतकरी नेते म्हणाले.

केंद्र सरकारची अॅडव्हायजरी; सुरक्षाव्यवस्था वाढवा

शेतकऱ्यांच्या देशव्यापी बंदला सर्व स्तरातून मोठा पाठिंबा मिळत असल्यामुळे हादरलेल्या केंद्रीय गृहमंत्रालयाने एक अॅडव्हायजरी जारी केली आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी सुरक्षाव्यवस्था कडक करावी, तसेच कोरोनाकाळात होणाऱया या बंदमध्ये नियमांचे पालन केले जाईल हे पाहावे, अशी सूचना गृहमंत्रालयाने केली आहे.

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची दडपशाही! बंद पाळला जाणार नाही

विविध शेतकरी संघटना बंदसाठी एकवटल्या असताना भाजपचे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी गुजरातमध्ये बंदला पाठिंबा नाही, बंद पाळला जाणार नाही, असा इशारा दिला आहे. 'जर कोणी बळजबरीने दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला तर कठोर कारवाई करून शिक्षा केली जाईल', असे रूपानी म्हणाले.

विरोधक दुट्टपी - भाजप

शाहीनबाग आंदोलन असू की, इतर कोणतीही सुधारणा, विरोधक लगेच सरकारच्या विरोधात उभे राहतात. विरोधकांची ही भूमिका दुट्टपी आहे, अशी टीका केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसह युपीएतील इतर पक्ष विरोधासाठी विरोध करत आहेत. युपीए सरकारच्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादीचे जे म्हणणे होते ते आमच्या सरकारने केले आहे; पण आता हे नेते कृषी कायद्याला विरोध करीत आहेत, असे प्रसाद म्हणाले.

बँक कर्मचारीही भारत बंद मध्ये सहभागी

जो शेतकरी वैफल्यातून आत्महत्या करीत होता तो आता रस्त्यावर येऊन आपल्या हक्काची लढाई लढत आहे. त्याला शक्ती देणे, बळ देणे ही बँक कर्मचारी संघटनेची भूमिका आहे. बळीराजा, शेतकरी, अन्नदाता आहे. म्हणून या हिंदुस्थान बंदमध्ये पूर्ण शक्तिनिशी सहभागी होत आहोत, असे महाराष्ट्र स्टेट बँक एम्पॉइज फेडरेशनचे जनरल सेव्रेटरी देविदास तुळजापूर यांनी सांगितले.

केंद्र सरकारचे झोपेचे सोंग

केंद्र सरकारचे कृषी कायदे हे शेतकऱयांच्या विरोधात असून हे कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱयांच्या आंदोलनाला संपूर्ण देशाचा पाठिंबा आहे. शेतकऱयांच्या मागण्यांच्या संदर्भात केंद्र सरकारने झोपेचे सोंग घेतले असून त्यांना जागे करण्यासाठी हा बंद आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या सहकार्याने हे आंदोलन यशस्वी करून शेतकऱयांच्या मागण्या मान्य करण्याच्या संदर्भात केंद्रावरील दबाव वाढवावा असे आवाहन काँग्रेसचे नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.

शिवसेना बळीराजाच्या भक्कम पाठीशी

शेतकऱयांचा देशव्यापी बंदमध्ये शिवसेना बळीराजाच्या भक्कम पाठीशी उभी राहिली आहे. शेतकऱयांचा हा देशव्यापी बंद यशस्वी व्हावा आणि त्यांच्या मागण्यांचा आवाज जगभरात जावा हीच शिवसेनेची भावना आहे, असे स्पष्ट करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱयांच्या देशव्यापी बंदला भक्कम पाठिंबा जाहीर केला. या बंदमध्ये महाराष्ट्रातील जनतेने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केल्यानंतर त्याला राज्यभरातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

जनता दल सेक्युलरचा पाठिंबा

जनता दल सेक्युलर महाराष्ट्रनेही बंदला पाठिंबा दिला आहे. एका बाजूला सरकारी मालमत्ता विकण्याचा सपाटा लावला आहे. आता शेती व्यवसायही काॅर्पोरेट क्षेत्राच्या नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न नव्य कायद्याच्या माध्यमातून केल्याची टीका पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीपतराव शिंदे यांनी केली.

भाजप शेतकऱयांची लूट करणारा पक्ष

भाजप हा शेतकऱयांचा पक्ष नसून शेतकऱयांच्या मालाची लूट करणारा पक्ष आहे. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. सामान्य लोकांनी या बंदला उत्स्फूर्त पाठिंबा देण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवत्ते नवाब मलिक यांनी केले आहे.

केजरीवाल सीमेवर

या बंदला 'आप'ने पाठिंबा दिला असून, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिंधू सीमेवर जाऊन शेतकऱयांची भेट घेतली. शेतकऱयांना पाठिंबा देण्यासाठी आलो आहे. केंद्राने शेतकऱयांचे ऐकले पाहिजे, असे ते म्हणाले.

उत्तर प्रदेशात गदारोळ; अखिलेश यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

भाजपशासित राज्यांमध्ये शेतकरी आंदोलन मोडून टाकण्यासाठी दंडेलशाही सुरू असल्याचे उत्तर प्रदेशात समोर आले आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज 'किसान यात्रा'चे आयोजन केले होते. कन्नोजपासून ही यात्रा सुरू होणार होती. मात्र, पोलिसांनी अखिलेश यादव यांच्या घराभोवती बॅरिकेड्स लावून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखिलेश यादव घराबाहेर पडले. सपाचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने हजर होते. त्यांच्या गाडय़ा रोखण्यात आल्या. अखिलेश आपल्या कार्यकर्त्यांसह पायी निघाले. मात्र, त्यांना पोलिसांनी अडवले तेव्हा धरणे आंदोलन सुरू केले. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात कडकडीत बंद पाळला जाईल, असे त्यांनी जाहीर केले.

पुरस्कार परत; 30 खेळाडूंचे राष्ट्रपती भवनाकडे कूच

  • शेतकरी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी पंजाबमधील कलाकार, साहित्यिक, खेळाडू एकवटले आहेत. पद्म पुरस्कार, अर्जुन अॅवार्ड, खेलरत्न आदी पुरस्कार ते परत करीत आहेत.
  • पुस्तीपटू करतार सिंग, बॉक्सर विजेंदर सिंगसह 30 खेळाडू आपले पुरस्कार परत करण्यासाठी राष्ट्रपती भवनाकडे जात होते. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी खेळाडूंनी तीव्र संताप व्यक्त केला.

कृषी कायदे मागे घ्या नाहीतर सत्ता सोडा - ममता

बंदला पाठिंबा देताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. कृषी कायदे मागे घ्या, नाहीतर भाजपने सत्ता सोडावी, असे त्यांनी सांगितले.

Post a comment

0 Comments