अखेर प्रशासनास त्या शिक्षकाची

 हुपरी : अखेर प्रशासनास त्या शिक्षकाची बदली रद्द करावी लागली.हुपरी :
 रेंदाळ येथील एका शाळेतील शिक्षकाच्या झालेल्या बदलीमुळे विद्यार्थी, पालक  थेट रस्त्यावर उतरले होते . बदलीच्या विरहाने व्याकुळ झालेल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आलेल्या अश्रूंनी अखेर प्रशासनास त्या शिक्षकाची बदली रद्द करण्यास भाग पाडले. विक्रम बाळू कोरवी असे या विद्यार्थी प्रिय शिक्षकाचे नांव आहे. या शिक्षकाने ज्ञानदानाने विद्यार्थ्यांशी विणलेल्या गुरू शिष्यांच्या या आगळ्या नात्याची चर्चा सुरू आहे.

कोल्हापूरमधील एका शैक्षणिक संस्थेच्या रेंदाळ येथील शाळेत विक्रम कोरवी हे सात आठ वर्षांपासून शिकवत आहेत. ते सध्या दहावीचे वर्गशिक्षक होते. ते विज्ञान विषय शिकवतात. ओघवती शैली, विषय समजून सांगण्याच्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना त्यांची गोडीने लागली होती.दरम्यान, संस्थेच्या प्रशासकीय कामकाज पद्धतीनुसार त्यांच्या बदलीचा आदेश आला. त्यामुळे कोरवी हे बदलीच्या ठिकाणी रवाना होण्यासाठी तयारी करू लागले.

ही बाब विद्यार्थी, पालकांना समजताच त्यांनी कोरवी यांना शाळा सोडून न जाण्याची विनंती केली. मात्र, नाईलाज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पाचशेहून अधिक विद्यार्थी पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र येत शिक्षक कोरवी यांची बदली रद्द करण्याची मागणी केली. दरम्यान, पालकांबरोबर मुख्याध्यापक यांची बैठक झाली. ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणली. त्यामुळे संस्थेचे सचिवांनी शिक्षक कोरवी यांची बदली रद्द केल्याचे पालकांना दूरध्वनीवरून सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.


Post a comment

0 Comments