एक रविवार :' एक गझल' : प्रसाद कुलकर्णी.

 

" एक रविवार : एक गझल " : भाग सव्वीसावा 

( रविवार ता. ०६  डिसेंबर २०२०) 

गझल : शाहू फुले आंबेडकर 

---------------------------------

 गझल असो किंवा कविता असो, शेवटी ती माणसाच्या म्हणजेच पर्यायाने समाजाच्याच भोवती फिरते .माणूस हा नाशवंत असल्यामुळे त्याच्यात अपूर्णतेची जाणीव आहे. त्याच जाणिवेमुळे सर्व कला समृद्ध होत जातात.तसेच  दिलखुलास, मनमुराद आनंद देणे व घेणे हे मानवी जीवनाचे सार आहे. ज्यांच्यापर्यंत प्रकाश पोहोचू शकला नाही ,त्यांच्यापर्यंत तो नेण्याचे काम करणे ,तसा प्रयत्न करणे यातच खरा आनंद आहे. गझलेने तो केलेला आहे,दिलेला आहे.

गझलच्या मैफली ,मुशायरे रात्र- रात्रभर चालतात. जग झोपले तरी गझलकार व त्याची गझल जागी असते .सुख आणि दुःख या जीवनाच्या अटळ बाजू आहेत.संपूर्ण सुखी किंवा संपूर्ण दुःखी असा माणूस दुर्मिळच. जीवनाची हीच खुमारी आहे. गझलकार वेगवेगळ्या अनुभवातून ,दाखल्यातून तेच तर मांडत असतो. गझलकाराचे शेर हे केवळ त्याच्या काळजात वास करत नसतात.तर श्वासातुन आणि रक्तातुन वाहत असतात अशी माझी स्वतःची धारणा आहे .कवी इतिहास आठवत, भविष्य पहात वर्तमानात जगत असतो. त्यामुळे अनेकदा त्याचे लेखन समकालीनते बरोबरच कालातीतही असते.  ( ' गझलानंद ' च्या प्रस्तावनेतून )

आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन आहे.त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.आणि या दिनाचे औचित्य साधून आजची गझल...


शाहू फुले आंबेडकर

-----------------------

नुसते नको बोलायला शाहू फुले आंबेडकर

 कृतीत घ्या आणायला शाहू फुले आंबेडकर..


वेदोक्त अन शिक्षण तसा पाणी पिण्याचा हक्कही

लोकास आले द्यायला शाहू फुले आंबेडकर...

 

 माणूस आहे जात अन  माणुसकी हा धर्म हे

 आले इथे  शिकवायला शाहू-फुले-आंबेडकर ..

 

समता खरी नांदायला ज्यांना हवीशी वाटते 

त्यांनी हवे वाचायला शाहू फुले आंबेडकर...


आकाश उंचीचे असे जे लोक झाले मोजके 

त्यांच्यात घ्या  मोजायला शाहू-फुले-आंबेडकर..


धर्मापरी ,जातीपरी माणुसकी ज्यांना हवी

 त्यांना हवे सांगायला शाहू-फुले-आंबेडकर...

 

धर्मांध उतरंडीमुळे ठरले बळी त्यांना इथे

आले प्रतिष्ठा द्यायला शाहू-फुले-आंबेडकर ..


अंधारल्या ज्यांच्या पिढ्या, नाकारली ज्यांना घरे

आले तया उचलायला शाहू-फुले-आंबेडकर ...


ज्यांनी दुकाने थाटली त्यांना कधी उमगेल का ?

कोते आम्ही जाणायला शाहू-फुले-आंबेडकर..


 त्यांच्या विचारांची दिशा जाऊ पुढे घेऊन रे

 केवळ नको घोकायला शाहू फुले आंबेडकर...


                       प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

                               ( ९८ ५०८ ३० २९० )

या गझलेची लिंक पुढीलप्रमाणे

https://youtu.be/jYhcTv4cJCs

Post a Comment

Previous Post Next Post