काँग्रेसच्या 135 व्या वर्धापन दिनानिमित्ताने सोमवार ता. २८ डिसेंबर २०२० रोजी काँग्रेसचा १३५ वा वर्धापनदिन आहे.इतिहासात कधी नव्हे एवढ्या विकलांग अवस्थेत आज काँग्रेस आहे हे खरे आहे. १९ डिसेंम्बर २०२० रोजी काँग्रेसच्या प्रमुख मंडळींची बैठक श्रीमती सोनिया गांधी घेतली होती.आज काँग्रेसने व्यापक प्रमाणात  जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवून  जनतेशी नाळ अधिक घट्टपणे जुळवणे गरजेचे आहे.तशा शक्यतांचे अवकाश परिस्थितीने तयारही केले आहेत.नेते व कार्यकर्ते यांच्यातील अंतर कमी कमी करत आणण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षात निवडणुकीच्या गणितात दारुण आलेले अपयश आणि सत्ताच्युत होण्याचे वाढते प्रमाण यामुळे सुस्तावलेल्या व धास्तावलेल्या पक्ष कार्यकर्त्यांत विश्वास निर्माण करण्यासाठी कार्यपद्धतीत मूलभूत बदल करण्याची नितांत गरज आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते तशी मागणी पक्षाच्या व्यासपीठावर व माध्यमांसमोरही जाहीरपणे  करत आहेत.ब्रिटिशांकडून मिळवलेल्या स्वातंत्र्याचे सुराज्यात रूपांतर करण्याची जबाबदारी व कर्तव्य  काँग्रेसचेच आहे याचे भान ठेवून काँग्रेसने वाटचाल अधिक सक्षम केली पाहिजे. .....

 काँग्रेसच्या १३५ व्या वर्धापनदिना निमित्ताने.....

-----------------------------------------------------

प्रसाद  माधव कुलकर्णी, इचलकरंजी

  ( ९८ ५०८ ३० २९०)

भारतातील सर्व राजकीय पक्षांमध्ये स्वातंत्र्य आंदोलनाचे मध्यवर्ती नेतृत्व केलेला व स्वातंत्र्यानंतरही सक्रिय असलेला,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वाधिक नेते – विचारवंत देणारा,सर्वात जुना – जाणता,सर्वाधिक काळ रुजलेला व जनाधार मिळवलेला,सर्वाधिक काळ सत्तास्थानी राहिलेेला ,भारताच्या सर्वांगीण विकासात मौलिक स्वरूपाची भागीदारी केलेला,भारताची प्रतिमा जागतिक स्तरावर उंचावणारा आणि विरोधकांना काँग्रेसमुक्त भारताचे ‘दिवास्वप्न ‘पाहू देणारा पण त्यात तथ्यांश नाही हे अल्पावधीतच त्यांनाच सिद्ध करायला लावणारा जर कोणता पक्ष असेल तर तो ‘काँग्रेस ‘आहे. सोमवार ता. २८ डिसेंबर २०२० रोजी काँग्रेसचा १३५ वा वर्धापनदिन आहे.त्यानिमित्ताने या पक्षाला व त्यांच्या कार्यकर्त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. आहे.इतिहासात कधी नव्हे एवढ्या विकलांग अवस्थेत आज काँग्रेस आहे हे खरे आहे. १९ डिसेंम्बर २०२० रोजी काँग्रेसच्या प्रमुख मंडळींची बैठक श्रीमती सोनिया गांधी घेतली होती.त्यातून काही नवी सुरुवात होईल अशी खऱ्या काँग्रेस प्रेमींना अपेक्षा आहे. तसेच नुकत्याच पदवीधर व शिक्षक विधानपरिषद निवडणुकीत काँगेसने महाआघाडीच्या सहकार्याने जे यश संपादन केले ते नक्कीच काँग्रेससाठी दिलासादायक आहे.


वास्तविक गेली काही वर्षे भारतीय राजकारणात काँग्रेस पक्षाचा संख्यात्मक संकोच होतो आहे.२०१४ मध्ये तर अतिशय नीचांकी पद्धतीने काँग्रेसचा दारुण पराभव झाला.२०१९ मध्येही फारसा फरक पडला नाही.पण सत्ताधारी पक्षाची म्हणण्यापेक्षा नेतृत्वद्वयीची मनमानी धोरणे आणि त्यातून देशाला द्यावी लागत असलेली आर्थिक,सामाजिक,सांस्कृतिक घसरणीची अभूतपूर्व किंमत,गडगडलेला जीडीपी ते वाढती बेरोजगारी आणि वाढती सामाजिक कटुता ते परधर्मद्वेषी वातावरण यातून सर्वसामान्य जनता अतिशय त्रस्त झाली आहे.अर्थात काँग्रेसने पक्ष म्हणून अधिक संघटित,आक्रमक होणे ही या १३५ व्या वर्धापनदिनाची मागणी आहे.एकेकाळचा देशव्यापी काँग्रेस पक्ष आणि आज त्याला पर्याय म्हणून देशव्यापी होत असलेला भाजपा यांच्या राजकीय प्रेरणा आणि सिद्धांत अतिशय वेगवेगळ्या आहेत.त्याही यानिमित्ताने समजून घ्याव्या लागतील.


१८८५ साली अँलन व्ह्यूम या जन्माने इंग्रज पण भारताविषयी कळवळा असलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्याने भारतीय नॅशनल काँग्रेसची स्थापना केली.ब्रिटिश शासनात विविध पदांवर काम करीत असतांनाच त्यांना भारतीयांची आपल्या व्यथा वेदना मांडणारी एक संघटना असावी असे वाटू लागले.तत्कालीन व्हॉईसरॉय लॉर्ड डफरीनलाही त्यांनी ते पटवून दिले.अँलन व्ह्यूम यांनी ‘अँन ओल्ड मॅन्स होम ‘  नावाची एक पुस्तिका लिहिली.त्यातुन भारतीय समाज किती दारिद्र्यात जगत आहे याची मांडणी केली. भारतीयांची परिस्थिती सुधारणे हे आपले कर्तव्य आहे असं तो इंग्रज सहकाऱ्यांना सांगत होता.तर ‘ही परिस्थिती बदलण्यासाठी तुमचं तुम्हालाच संघटित होऊन लढावं लागेल ‘असं भारतीयांनाही तो सांगत होता.

१ मार्च १८८३ रोजी कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात अँलन व्ह्यूम यांनी भारतीय युवकांनी सामाजिक प्रश्नावर निर्भीडपणे एकत्र यावे व संघटना बांधावी असे आवाहन केले.त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.त्यातून ‘इंडियन नॅशनल युनियन ‘ही संघटना स्थापन झाली.तिच्या अनेक ठिकाणी शाखाही निघाल्या.याच दरम्यान इंडियन नॅशनल कॉन्फरन्सचे अधिवेशनही होते.त्याचे नेते सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंदमोहन बोस यांनी भारतातील प्रमुख मंडळींची एक बैठक  २२ डिसेंबर १८८५ रोजी पुण्यात बोलावली होती.पण तेंव्हा पुण्यात कॉलऱ्याची साथ असल्याने ही बैठक सहा दिवस पुढे ढकलली आणि मुंबईत घेतली गेली.२८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबईत झालेल्या या बैठकीतच अधिकृतपणे ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ‘ स्थापन झाली.

मुंबईच्या गोवालिया टॅंक जवळील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत ही बैठक व काँग्रेसचे पहिले अधिवेशन झाले.बॅरिस्टर उमेशचंद्र बॅनर्जी  (जन्म: २९ डिसेंबर १८४४ कालवश : २१ जुलै २९०६ )यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अधिवेशनाला देशभरातील बहात्तर नामवंत उपस्थित होते.त्यात फिरोजशहा मेहता,दादाभाई नौरोजी,दिनशा वाछा,न्यायमूर्ती रानडे,बदृद्दीन तय्यब्जी,रा.गो.भांडारकर,गोपाळ गणेश आगरकर,लोकमान्य टिळक,पं.मोतीलाल नेहरू,न्यायमूर्ती के.टी.तेलंग यासारखे अनेक दिग्गज होते.या अधिवेशनात काँग्रेसचे संघटना सूत्र ठरविण्यात आले.काँग्रेसचे पाहिले अध्यक्ष बॅ.उमेशचंद्र बॅनर्जी यांचा काँग्रेसच्या १३५ व्या वर्धापनदिनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २९ डिसेंबर २०२० रोजी १७६ वा जन्मदिन आहे.त्याअर्थानेही या वर्धापनदिनाला विशेष महत्व आहे. काँग्रेसच्या स्थापनेत अँलन व्ह्यूम या इंग्रज व्यक्तीचा पुढाकार असला तरी त्यांना भारतातील सर्व धर्म ,जाती,पंथ याबद्दल आत्मीयता होती व ‘भारतीय माणूस’ हा त्यांचा केंद्रबिंदू होता.   हिटलर व मुसोलिनीप्रमाणे व त्यांचा आदर्श घेऊन त्यांच्याशी सल्लामसलत करणाऱ्यांप्रमाणे तो वंशवादी नव्हता हा मूलभूत फरक आपण लक्षात घेतला पाहिजे.कारण काँग्रेसची स्थापना ब्रिटिश माणसाच्या पुढाकाराने झाली याचे चुकीच्या पद्धतीने भांडवल गेली अनेक वर्षे केले जाते.आणि हिटलर व मुसोलिनीशी आपल्या जुळलेल्या नाळीला सोयीनुसार उघड व सोयीनुसार झाकून ठेवले जाते हाही गेल्या शतकभरचा भारतीय इतिहास आहे.

२८ डिसेंबर १८८५ रोजी बॅ.उमेशचंद्र बॅनर्जी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून चार प्रमुख उद्दिष्टे जाहीर केली.ती म्हणजे (१)देशाच्या विविध भागातील राष्ट्रवादी राजकीय कार्यकर्त्यांमध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यास उत्तेजन देणे.(२) जात,धर्म,प्रांतभेद विरहित राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेचा विकास करणे.(३) महत्वाच्या निकडीच्या प्रश्नांवरील लोकांच्या मागण्या सरकारपुढे मांडणे.(४) देशात विविध प्रश्नांवर लोकमत तयार करणे व त्याचे संघटन करणे.त्याचबरोबर शासन यंत्रणेत लोकहिताला प्राधान्य मिळावे,त्यासाठी इंग्लंडमधील ब्रिटिश राज्यकर्त्यांशी वैचारिक आदान प्रदान करावे,विधिमंडळात सरकार नियुक्त सदस्यांऐवजी लोकनियुक्त सदस्य असावेत,लष्करी खर्चात कपात व्हावी ,सरकारी व्यवस्थापनात उच्च अधिकार पदावर भारतीय व्यक्तींची निवड व्हावी अशाही कांही मागण्या या अधिवेशनात करण्यात आल्या.

काँग्रेसचे दुसरे अधिवेशन १८८६ साली पितामह दादाभाई नौरोजी यांच्या अध्यक्षतेखाली झाले.तेंव्हापासून काँग्रेसच्या अधिवेशनात देशभरातून हजारो प्रतिनिधी सहभागी होऊ लागले.हळूहळू ब्रिटिश सत्ताधाऱ्याना काँग्रेसची ताकद कळू लागली.तिच्या शक्तीची व स्वातंत्र्य प्रेरणेची भीतीही वाटू लागली.त्यामुळेच लॉर्ड कर्झनला ‘काँग्रेसला शांतपणे मृत्यू येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे हीच माझी प्रमुख महत्वाकांक्षा आहे ‘ असे जाहीरपणे म्हणावे लागले. काँग्रेसने भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे दशकानूदशके  नेतृत्व केले.एकता व बंधुतेला प्राधान्य दिले.ब्रिटिशांच्या अनितीला बळी पडून आणि वंशवादी विचारधारा रुजविणाऱ्या  द्विराष्ट्रवादी सिद्धांताची तळी उचलली नाही. कोणाही काँग्रेस कार्यकर्त्याने, नेत्याने शिक्षा भोगताना सक्रिय राजकारण सोडण्याची हमी देऊन कधी माफी मागितली नाही अथवा सहकाऱ्यांची नावे सांगून स्वतःची सोडवणूकही करून घेतली नाही.हा दैदिप्यमान इतिहास काँग्रेसची मान सदैव ताठ ठेवणारा आहे यात शंका नाही. काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न कर्झनपासून आजपर्यंत अनेकांनी बघितले व बघत आहेतही ,पण ते फळाला आले नाही वा येऊ शकणार नाही.कारण कोणीही ,कितीही टीका केली तरी काँग्रेस पक्ष हा सर्वसामावेशक अशा अस्सल  भारतीय राष्ट्रवादाचे प्रतीक आहे.ती हिटलर ,मुसोलिनीचा आदर्श मानणारी संकुचित वंश – वर्णवादी ,परधर्माला दुय्यम नागरिकत्व देऊ पाहणारा संकुचित विचार मांडणारी संघटना नाही हे भारतीय जनतेने पिढ्यानपिढ्या अधोरेखित केले आहे.काँग्रेसला अनेक चढ – उतार अनुभवावे लागले हे जितके खरे तितकेच काँग्रेस कधी लाटेवर स्वार झाली नाही त्यामुळे तिला लौकर ओसरण्याचीही काळजी करावी लागली नाही हेही तितकेच खरे आहे.


स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांना जागृत करून,संघटित करून ब्रिटिशांच्या राजकीय व आर्थिक शोषणाविरुद्ध आवाज उठविण्याचे एक मिशन म्हणून काँग्रेसने भूमिका बजावली.म्हणूनच काँग्रेसची स्थापना व वाटचाल भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या इतिहासातील एक महत्वाची घटना ठरते.सर्वसामान्य जनतेच्या ब्रिटिश विरोधी जाणीवजागृती पासून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यापर्यंतचे नेतृत्व काँग्रेसने केले.मोठया प्रमाणात राजकीय जागृती करून लोकमत संघटित केले. भारतीय राष्ट्रवादाची राष्ट्रीय भावना तयार करण्याचे काम केले.जात,पात,पंथ निरपेक्ष असे संघटनशास्त्र अवलंबले.लोकाभिमुख दृष्टिकोन घेऊन राजकीय ,आर्थिक मागण्या केल्या.त्यासाठी लोकचळवळी उभारल्या.स्वातंत्र्य लढा बहुआयामी करण्यात आणि मध्यवर्ती प्रवाह बनण्यात काँग्रेसने मोठे यश मिळवले.

स्वातंत्र्यापूर्वी  ६२ वर्षे आणि स्वातंत्र्यानंतरची ७३ वर्षे काँग्रेस कार्यरत आहे.देशाच्या विकासात या पक्षाचे योगदान मोठे आहे .काहीजण हे नाकारतात हा राजकीय कृतघ्नपणा  आहे.काँग्रेसने अनेक चुका केल्या आणि त्याची अनेकदा किंमतही मोजली.काँग्रेसवर वारंवार जहाल टीका झाली पण काँग्रेसने विरोधकांना देशद्रोही ठरवत तशी पदवी वाटप करणाऱ्या पक्षशाखा गावोगावी काढल्या नव्हत्या.मात्र अलीकडे  ‘सरकारवर टीका केली म्हणजे राष्ट्रद्रोह नव्हे’ हे न्यायालयाला सांगावे लागावे अशा अवस्थेला देश पोहोचला आहे हे वास्तव आहे. काँग्रेसने अनेक निवडणुका जिंकल्या,अनेक राज्ये जिंकली पण एक दोन निवडणूका जिंकून आपण म्हणू तीच पूर्वदिशा,जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करणे,सर्व स्वायत्त संस्थांचे व्यक्तीगतिकरण करणे,अनाकलनीय व लोकद्रोही तुघलकी निर्णय प्रक्रिया अवलंबणे,भांडवलदारांची उघड उघड तळी उचलून त्यांना राव व कामगार,शेतकरी,कष्टकरी जनतेला रंक करणारी धोरणे आखणे यासारख्या अनेक बाबतीत कमालीची  सक्रियता काँग्रेसने दाखवली नाही.पं. जवाहरलाल नेहरूंपासून ते डॉ.मनमोहनसिंग यांच्या पर्यंतच्या कोणाही पंतप्रधानांना आपले नाव कपडातच विणलेला दसलाखी सूट घालायची ओंगळ प्रसिध्दीलोलुप कृतीशील मानसिकता दाखविण्याची गरज वाटली नव्हती. अथवा दाढी वाढवुन नवी प्रतिमा निर्माण करण्याचीही गरज वाटली नाही.भावनिक आवाहने व सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि भरमसाठ आश्वासने देऊन नंतर तो चुनावी जुमला होता असे म्हणण्याची गरज  काँग्रेसला सत्तेच्या राजकारणासाठी वाटली नाही.भले अनेक पराभव झाले ,काही निर्णय चुकले तरी काँग्रेसवर देशाचा विकासदर वेगाने खाली आणला ,शून्याच्याही खाली नेला व उणे २५ केलाअसा आरोप नव्हे तर वास्तविक आकडेवारी दाखवून

एवढ्या वर्षात कोणाला सिद्ध करता आले नाही.आत्ता मात्र जीडीपी मोजण्याची पद्धत बदळूनही गेल्या सत्तर वर्षातील सर्वात वाईट आर्थिक संकटात देश आहे . त्यात काँग्रेसचाच हात आहे असे म्हणता येणार नाही.


आज काँग्रेसने व्यापक प्रमाणात  जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवून  जनतेशी नाळ अधिक घट्टपणे जुळवणे गरजेचे आहे.तशा शक्यतांचे अवकाश परिस्थितीने तयारही केले आहेत.नेते व कार्यकर्ते यांच्यातील अंतर कमी कमी करत आणण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षात निवडणुकीच्या गणितात दारुण आलेले अपयश आणि सत्ताच्युत होण्याचे वाढते प्रमाण यामुळे सुस्तावलेल्या व धास्तावलेल्या पक्ष कार्यकर्त्यांत विश्वास निर्माण करण्यासाठी कार्यपद्धतीत मूलभूत बदल करण्याची नितांत गरज आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते तशी मागणी पक्षाच्या व्यासपीठावर व माध्यमांसमोरही जाहीरपणे  करत आहेत.ब्रिटिशांकडून मिळवलेल्या स्वातंत्र्याचे सुराज्यात रूपांतर करण्याची जबाबदारी व कर्तव्य  काँग्रेसचेच आहे याचे भान ठेवून काँग्रेसने वाटचाल अधिक सक्षम केली पाहिजे. 


भारतातील विविध जाती – धर्म – पंथातील सर्व सर्वसामान्य माणसाचा विकास साधणारी व त्याचे स्वत्व जपणारी व त्यातून एकता मजबूत करणारी धोरणात्मक भूमिका काँग्रेसला पुन्हा एकदा जनमानसात रुजवावी लागतील.ती केवळ त्या पक्षाची नव्हे तर या वैविध्याने नटलेल्या व संकुचिततेला नाकारणाऱ्या देशाचीही गरज आहे. तसेच भाजपेतर अन्य जे राज्यघटना मानणारे राजकीय पक्ष आहेत त्यांच्याशी सहमतीचे राजकारणही पुढे नेण्याची गरज आहे.एक सुव्यवस्थित राजकीय व्यवस्थापन करूनच काँग्रेसला वाटचाल करावी लागेल. काँग्रेसच्या या १३५ व्या वर्धापनदिनी एक मध्यममार्गी पक्ष म्हणून भरभरून शुभेच्छा.


( लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीच्या वतीने गेली एकतीस वर्षे  नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)

Post a comment

0 Comments