मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण.

 अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण नेमके काय ..?PRESS MEDIA LIVE : 

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अर्णब गोस्वामींच्या अटेकवरुन महाराष्ट्र सरकार विरुद्ध भाजप अशी जुंपली आहे. अमित शाहांपासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी अर्णब यांच्या अटकेचा निषेध केला आहे. तसंच महाराष्ट्रात ही अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. तर काहीजण अर्णब गोस्वामींवर करण्यात आलेल्या कारवाईचं स्वागत करत आहेत. कायद्यापुढे कोणीही मोठं नाही, कायदा सगळ्यांना सारखाच, असं म्हणत अर्णब यांच्यावर करण्यात आलेली कारवाई योग्य असल्याचं म्हटलं आहे.अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण नेमकं काय?

अन्वय नाईक यांनी 5 मे 2018 रोजी अलिबाग येथील कावीर गावातील राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याच ठिकाणी अन्वय यांच्या आई कुमुद नाईक यांचाही मृतदेह आढळला होता. अन्वय नाईक हे पेशाने आर्किटेक्ट होते. अन्वय हे कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे संचालक होते. अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीत पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांना आपल्या आत्महत्येला जबाबदार धरलं होतं.

अन्वय नाईक यांच्या कंपनीनं अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीचा स्टुडिओ उभारला होता. या कामाचे पैसे रिपब्लिकन टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांनी थकवलेय आणि त्यामुळं आपल्या पतीने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा आरोप अन्वय यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी केला आहे.

अन्वय नाईक यांच्या आत्महत्येनंतर पत्नी अक्षता यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांच्या विरोधात तक्रार दिली. अलिबाग पोलिसांनी याप्रकरणी कुठलीही कारवाई केली नाही असा आरोप देखील अक्षता यांनी केला होता. 5 मे 2020 रोजी अक्षता यांनी सोशल मीडियावर याप्रकरणी एक सविस्तर व्हिडीओ प्रसारित केला आणि आपल्या पतीच्या आत्महत्येला दोन वर्षांनंतर देखील न्याय मिळत नाही त्यामुळे न्याय देण्याची मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी केली होती.

आघाडी सरकार आल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 26 मे 2020 रोजी सांगितलं की, अन्वय यांची मुलगी आज्ञा नाईक त्यांना भेटली . अर्णब गोस्वामींनी पैसे थकवल्यानं वडील आणि आजीनं आत्महत्या केल्याच्या प्रकरणाची रायगड पोलीस तपास करत नाहीत अशी तक्रार तिनं केली. त्यानंतर मी सीआयडीला या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले आहेत, असं देशमुखांनी सांगितलं. त्यानंतर पुन्हा 3 ऑगस्टला अक्षता यांनी सोशल मीडियावर आणखीन एक व्हिडीओ प्रसारित केला

अर्णब गोस्वामी माझ्या पती आणि सासूच्या आत्महत्येला जबाबदार आहे. आधीच्या सरकारनं ही केस दाबण्याचा प्रयत्न केला. मला अजूनही न्याय मिळाला नाहीय, असा आरोप करणारा व्हीडिओ त्यांनी पोस्ट केला. त्यानंतर या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर #JusticeForAnvay ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. यात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी झाले होते.

Post a comment

0 Comments