अन्यथा 28 नोव्हेंबर पासून जिल्ह्यात

 


लॉक डाऊन काळातील घरगुती ग्राहकांचे सहा महिन्याचे वीज बिल माफ करावे.......

अन्यथा 28  नोव्हेंबर पासून जिल्ह्यात गाव बंद आंदोलन करण्यात येणार.


PRESS MEDIA LIVE : कोल्हापूर :

लॉकडाऊन काळातील घरगुती ग्राहकांचे सहा महिन्यांचे वीज बिल माफ करावे; अन्यथा दि. 28 नोव्हेंबरपासून जिल्ह्यात गाव बंद आंदोलन करण्यात येणार आहे. साखळी पद्धतीने हे आंदोलन सुरू ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीय कृती समितीतर्फे प्रताप होगाडे आणि महाराष्ट्र इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

होगाडे म्हणाले, लॉकडाऊन काळातील घरगुती ग्राहकांचे सहा महिन्यांचे वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे.गाव, शहर, महानगर अशा विविध पातळींवर धरणे आंदोलन, टाळा ठोको अशी विविध प्रकारे आंदोलने करूनही सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. सरकार केवळ 20 ते 30 टक्के सवलत देण्याची भाषा करीत आहे. सवलत देण्याचे नियोजन नसताना ऊर्जामंत्री मात्र शंभर युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची इच्छा असल्याचे सांगतात. थकबाकी, महावितरणचा तोटा आणि केंद्राने मदत न करणे, अशी कारणे मात्र ते सांगत आहेत. या सर्व कारणांचा वीज बिलमाफीसाठी काहीच संबंध नाही. सरकारची इच्छशक्‍ती असेल, तर तत्काळ निर्णय होऊ शकतो. मुळात कृषिपंपांची 42 हजार कोटी थकबाकी बोगस आहे. आयोगाने कृषिपंपांची दरवाढ केली असताना, सरकारने सवलत मात्र जाहीर केली नाही. त्यामुळे चौपट वीज बिले वाढली आहेत. कृषिपंप थकबाकीच्या 42 हजार कोटींपैकी दंड व व्याजाची रक्‍कम वजा केल्यास केवळ 27 ते 28 हजार कोटी थकबाकी उरते. पैकी चौथा भाग म्हणजे केवळ सात ते आठ हजार कोटी रुपयांची कृषिपंपांची थकबाकी आहे.

होगाडे म्हणाले, ऊर्जामंत्री मोफत विजेची भाषा करीत आहेत. यासाठी दरवर्षी आठ ते दहा हजार कोटी रुपये लागणार आहेत. कोरोना काळातील सहा महिन्यांचे 50 टक्के वीज बिल माफ करण्यासाठी केवळ चार हजार कोटी आवश्यक आहेत. एकदाच चार हजार कोटी देण्यास सरकार धजत नाही आणि दरवर्षी आठ ते दहा हजार कोटी कसे देणार, म्हणजेच हा कल्पनाविलास आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर सरकारने तातडीने निर्णय घेऊन घरगुती ग्राहकांना वीज बिल माफ करावे; अन्यथा साखळी पद्धतीने गावबंद आंदोलन करण्यात येणार आहे. 28 नोव्हेंबरपासून प्रत्येक तालुक्यातील तीन गावे अशी एकूण 36 गावे रोज बंद ठेवण्यात येणार आहेत. हातकणंगले तालुक्यापासून आंदोलनास सुरुवात होणार आहे. हातकणंगले तालुक्यातील किणी, घुणकी, वाठार, करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द, कोगे, बालिंगा या गावांपासून आंदोलन सुरू होईल.

शहरातील आंदोलनाबाबत कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समितीतर्फे लवकरच निर्णय जाहीर केला जाईल, असे विक्रांत पाटील-किणीकर यांनी सांगितले. सरकारने गावबंद आंदोलनाची दखल घेतली नाही, तर वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. पत्रकार परिषदेस बाबासाहेब पाटील-भुयेकर, चंद्रकांत पाटील-पाडळीकर, राजेंद्र पाटील, आर. के. पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, बाबासाहेब देवकर उपस्थित होते.

Post a comment

0 Comments