शिक्षण विभाग नापास.


महानगरपालिकेच्या महासभेत शिक्षण विभाग नापास

शिक्षण विभागाचे वाटोळे झाले असल्याचे नगरसेवकांचे ताशेरे 

शिक्षणाधिकारी, अतिरिक्त आयुक्‍तांचा फक्त खरेदीवर डोळा

PRESS MEDIA LIVE : पिंपरी :

पिंपरी – लहान मुले ही उद्याचे भविष्य आहे. मात्र शिक्षण विभाग हे भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. तीस-तीस वर्ष शिक्षक एकाच जागेवर आहे. बदली करण्यासाठी लाखो रुपये मोजले जात आहे. भौतिक सुविधा देण्याऐवजी फक्‍त कंत्राटदारांशी लागेबांधे करण्यात अधिकारी व अतिरिक्‍त आयुक्‍त व्यस्त आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचे वाटोळे झाले असल्याचे ताशेरे महापालिका महासभेमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांनी ओढले.

महापालिकेची ऑक्‍टोबर महिन्यांची सर्वसाधारण सभा आज पार पडली. महासभेच्या अध्यक्षस्थानी महापौर माई ढोरे होत्या. महापालिकेच्या काळभोरनगर येथील शाळेमध्ये आठवी ते दहावीची इंग्रजी माध्यमांची शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव महासभेमध्ये ठेवण्यात आला होता. याबाबतचे कंत्राट “आय टिच’ या खासगी संस्थेला देण्यात येणार आहे. यासाठी संस्थेने शाळांचे सर्व्हे करून काळभोरनगरची शाळा निवडली.

मात्र यासाठी स्थानिक नगरसेवकांना विश्‍वासात घेतले नाही. इतर पदाधिकाऱ्यांनाही याबाबतची माहिती शिक्षण विभागाने दिली नाही. विशेष म्हणजे ज्या शाळेमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार होता, ती शाळा पाडण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासनाने कोणत्या आधारे या शाळेची निवड केली? असा प्रश्‍न नगरसेवकांनी उपस्थित केला.

नगरसेवक भाऊसाहेब भोईर म्हणाले, शिक्षण विभाग म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. शिक्षण समितीच्या कोणत्याही ठरावाला अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील आणि अधिकारी दाद देत नाही. माध्यमिक आणि प्राथमिक एकत्र करावे, असा प्रस्ताव मांडला होता, त्याचाही विचार झाला नाही. बदली करण्यासाठी पाच लाख रुपये मागितले जातात. शिपाई देखील बदल्या करण्यासाठी सेटींग लावतो.

नगरसेवक हर्षल ढोरे म्हणाले, अधिकारी एकाही शाळेला भेट देत नाही. सब गोलमाल है. अधिकारी आणि अतिरिक्त आयुक्तांना फक्त कंत्राट पाहिजे असते. मीनल यादव म्हणाल्या, या शाळेचे नूतनीकऱण करायचे आहे. ही शाळा पाडल्यानंतर तिथे कशी चालवणार इंग्रजी शाळा याचा विचार प्रशासनाने केला आहे का? त्या संस्थेने पुण्यामध्ये शाळा चालविण्यासाठी घेतल्या आहेत. मग आपल्याकडेही तेच केले पाहिजे असा आग्रह नाही. सर्व्हे केला तर तो अभ्यासपूर्ण नाही मग अधिकाऱ्यांचा उपयोग काय आहे. माझ्या प्रभागातील एकाही नगरसेवकांला विचारण्याची तसदी अधिकाऱ्यांनी घेतली नाही. अशाप्रकारे विषय आणण्याची काय आवश्‍यकता होती. या विषयाला आमचा विरोधच आहे तो रद्द करण्यात यावा.

अजित गव्हाणे म्हणाले, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणची शाळा निवडल्याचा दावा प्रशासन करत आहे. पण भोसरी येथून 12 किमीवरून मुले येणार आहेत का? वैशाली काळभोर म्हणाल्या, शाळा तपासणीसाठी पर्यवेक्षक नाहीत. एका पर्यवेक्षकाकडे दहा शाळा आहेत. ते कशा शाळा सांभाळणार आहेत यावर प्रशासन विचार करत नाही.

महापालिकेच्या महासभेमध्ये सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी काळभोरनगर येथील शाळेमध्ये आठवी ते दहावीपर्यंत इंग्रजी शाळा खासगी संस्थेच्या माध्यमातून करण्याला विरोध केला. यावेळी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, उपमहापौर तुषार हिंगे, नगरसेविका माई काटे, सीमा सावळे, आशा शेंडगे, नगरसेवक राहुल जाधव, सचिन चिखले, राहुल कलाटे यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला. महापौर माई ढोरे यांनी हा विषय फेटाळून लावला.

                      “आय टिच’ संस्था

आय टिच ही संस्था इंग्रजी माध्यमिक शाळा चालविण्याची पूर्ण जबाबदारी घेणार होती. यामध्ये शाळेचे रोजचे संचलन, स्कूल लीडर निवड, शिक्षक निवड, शिक्षक प्रशिक्षण, शिक्षण पद्धती, प्रगती मूल्यपापन या गोष्टींचा समावेश होता. त्यासाठी महापालिकेने त्यांना भौतिक सुविधा पुरवायच्या होत्या.

               तेव्हा बदली न करणे भोवले

प्रशासन अधिकारी ज्योत्सना शिंदे यांना पुन्हा शासन सेवेत पाठविण्यासाठी ठराव केला होता. तेव्हा साथ दिली असती तर शिक्षण विभागाची आज ही वेळ आली नसती अशी खंत माजी महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, त्यांची बदली न करणे आता त्रासदायक झाले आहे. त्यावेळी मी एक पुरुष महापौर आणि त्या महिला अधिकारी असल्याने कारवाई झाली नाही. मात्र आता तरी त्यांना पुन्हा त्यांच्या जागेवर पाठविण्यासाठी ठराव करा.

              महापौरांनीही धरले धारेवर

महापौर माई ढोरे यांनी हा विषय फेटाळल्यानतंर त्यांनी शिक्षण विभागातील अधिकारी व प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. महापौर म्हणाल्या, अशा प्रकारे परस्पर कोणताही विषय करता येणार नाही. स्मार्ट सिटी करा पण त्यासोबतच मुलेही स्मार्ट करा. नकार द्यायचा विषय नाही मात्र तुम्ही विश्‍वासात घ्या. यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. बदली करण्यासाठी ज्या शिपायाने सेटींग केली आहे त्याला तात्काळ काढून टाका. यापुढे शिक्षकांच्या बदल्या होणे आवश्‍यक आहे. आदर्श मुले घडवली तरच आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जाईल.

Post a Comment

Previous Post Next Post