करोनाचा फटका झेंडुला.

 करोनाचा  फटका  झेंडूला  


PRESS MEDIA LIVE : पुणे :

पुणे – साडेतीन मुहुर्तापैकी संपूर्ण मुहुर्त असलेला दसरा रविवारी (दि. 25) आहे. त्यामुळे शुक्रवारी मार्केटयार्डातील फुल बाजारामध्ये झेंडुची मोठी आवक झाली. मात्र, करोनाचा फटका झेंडूच्या मागणीला बसला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा झेंडुला मागणी कमी असून किरकोळ बाजारात एक किलो झेंडूला प्रतवारीनुसार 50 ते 100 रुपये असा भाव मिळाला आहे. मध्यंतरी झालेल्या पावसाचा फटका झेंडुला बसला होता. चांगल्या प्रतीच्या सुक्या झेंडुला जास्त भाव मिळत आहेत

सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांकडून उत्सव साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत यंदा फुलांना मागणी कमी आहे. दसऱ्याला नवरात्रोत्सवाची सांगता होते. दसऱ्याच्या दिवशी माळा तसेच पूजनासाठी झेंडुला मोठी मागणी असते. घाऊक आणि किरकोळ बाजारात अन्य फुलांच्या तुलनेत झेंडुच्या मागणीत वाढ होते. रात्री पासून फूल बाजारात झेंडुची आवक सुरू झाली आहे. सातारा जिल्ह्यातील वाई, सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी, करमाळा, पुणे-सोलापूर रस्त्यावरील हवेली तालुक्यातील गावे तसेच बुलढाणा भागातून झेंडुची आवक होत आहे, असे मार्केटयार्डातील फूल व्यापारी सागर भोसले यांनी सांगितल

गतवर्षीच्या तुलनेत यंदा झेंडुला मागणी तसेच आवक कमी आहे. काही वर्षांपूर्वी कोलकात्ता भागातून झेंडुची आवक व्हायची. या झेंडुला कोलकात्ता झेंडू असे म्हणतात. कोलकात्ता झेंडुची लागवड आता राज्यातील शेतकरी करत आहेत. कोलकात्ता झेंडू आकाराने लहान असतो. कोलकात्ता झेंडुला प्रतवारीनुसार 60 ते 120 रुपये असा भाव मिळाला आहे. साध्या झेंडुला 50 ते 100 रुपये प्रतिकिलो असा भाव मिळाला आहे. पूजनासाठी साध्या झेंडुला मागणी असते. शनिवारी ( 24 ऑक्टोबर) झेंडुची आवक वाढेल, असे भोसले यांनी नमूद केले

मार्केटयार्डातील घाऊक फूल बाजारात 43 हजार 344 किलो झेंडुची आवक झाली. घाऊक बाजारात प्रतवारीनुसार 30 ते 70 रुपये किलो असा झेंडुला भाव मिळाला आहे. शनिवारी ( 24ऑक्टोबर) झेंडुची आवक वाढेल. झेंडूसह कागडा, शेवंती, गुलछडी, अस्टर, लिली, गुलाब या फुलांची बाजारात आवक झाली, अशी माहिती बाजार समितीच्या फूल बाजार विभागाचे प्रमुख प्रदीप काळे यांनी दिली.

शेवंती 300 ते 400 रुपये किलो

यंदाच्या वर्षी नवरात्रोत्सवात शेवंतीच्या फुलांना उच्चांकी भाव मिळाला.300 ते 400 रुपये असा भाव मिळाला आहे. गेल्या वर्षी तो 100 ते 150 रुपये होता, अशी माहिती फूल व्यापारी सागर भोसले यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post