साहित्य वास्तववादी विचार करणेस भाग पाडते.

 साहित्य वास्तववादी विचार करण्यास भाग पाडते

                                     - प्रसाद कुलकर्णी 


PRESS MEDIA : मलकापूर

          जगामध्ये सर्वज्ञ कोणीही नसतो. व्यक्तीला परिपूर्ण करण्याचे कार्य वाचन संस्कृती करते. वाचनातून माणूस घडतो. खऱ्या अर्थाने व्यक्तीचा, समाजाचा व राष्ट्राचा विकास वाचनामुळे होतो. वाचनामुळे केवळ मनोरंजन होते असे नाही तर ज्ञान, प्रबोधन, संस्कार वाढीस लागतात. वाचनाचा आनंद पराकोटीचा असतो. संतपरंपरेने वाचन संस्कृतीचा जागर केला आहे. सतत वाचन केल्यामुळे वैरभाव निर्माण होत नाही.  'साहित्य वास्तववादी विचार करण्यास भाग पाडते' असे प्रतिपादन इचलकरंजी येथील समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस, प्रसाद कुलकर्णी यांनी केले. 

                       ते रयत शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन. डी.पाटील महाविद्यालयातील मराठी  व ग्रंथालय विभाग आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'वाचन प्रेरणा दिनाचे' प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले की "संवादामुळे तत्परता येते. लिहिल्यामुळे मोजकेपणा येतो. तर वाचनामुळे परिपूर्णता येते. सांस्कृतिक अरिष्टा पासून  वाचन संस्कृतीच आज आपणास वाचवू शकेल. भौतिक साधने जरी महत्वाची असली तरी वाचन हे अत्यावश्यक आहे. व्हाट्सअप, फेसबुक म्हणजे वाचन नाही ते फेक असण्याची मोठी शक्यता असते.परंतु छापील स्वरूपात असलेले साहित्य सत्य असण्याची दाट शक्यता असते. 

                       सदर कार्यक्रमास  सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष रमेश पडवळ यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील हेळकर हे  होते. त्यांनी या कार्यक्रमाचे  प्रास्ताविक, स्वागत आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय  करून दिला. तर आभार ग्रंथपाल प्रा. बी. एस.चिखलीकर यांनी मानले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पी. एस. नाईक यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस. जी.माने व मराठी विभागाचे प्रा. डॉ. बी.ए सुतार  उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post