इचलकरंजी वाहतूक आराखडा

इचलकरंजीत वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी करण्याची गरज.

पण पालिकेकडून त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे  नसल्याचे चित्र  दिसत आहे.

PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी : मनु फरास :
 

इचलकरंजी : शहरातील रस्त्यावरील हळूहळू वाहनांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लावण्याची पुन्हा एकदा गरज भासत आहे. त्यासाठी वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी करण्याची आवश्‍यकता आहे, पण पालिकेकडून त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. पार्किंग पट्टे मारण्यापासून ते सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यापर्यंतची कामे पालिकेकडे प्रलंबित आहेत.

कोरोना संसर्गामुळे एप्रिल महिन्यापासून वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. रस्त्यावरील वर्दळ कमी झाली होती. त्यामुळे अपघातांची भीती नसल्यामुळे वाहतुकीचा प्रश्‍नाचे फारसे गांभीर्य नव्हते, मात्र अनलॉक प्रक्रियेनंतर शहरातील वाहतूक पुन्हा वाढली आहे.हजारो वाहने दररोज शहरातील मुख्य रस्त्यावरून धावत आहेत. त्यामुळे शहरात रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण वाढत आहे. यातून बेशिस्त वाहतुकीचे दर्शन घडत आहे. यामुळे पुन्हा एकदा नव्याने वाहतुकीला शिस्त लावण्याची मोहीम राबविण्याची वेळ आली आहे.

वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये विविध उपाययोजना सूचविण्यात आल्या आहेत, पण त्याची सक्षमतेने अंमलबजावणी झालेली नाही. पालिका प्रशासनाकडूनही याबाबत प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्‍न सुटण्याऐवजी गुंतागुंतीचा होत चालला आहे. अद्यापही सिग्नल यंत्रणा सुरू झालेली नाही. शहरात मलाबादे चौक व प्रांत कार्यालय चौकात पूर्वीपासून सिग्नल यंत्रणा आहे, तर डेक्कन चौकात नव्याने यंत्रणा बसविली आहे. राजवाडा चौकातील बंद असलेली सिग्नल यंत्रणा स्टेशन रोडवर महावितरण कार्यालयाजवळ स्थलांतरित करण्यात येणार आहे.

याशिवाय अन्य एक-दोन ठिकाणी सिग्नल यंत्रणा नव्याने बसविण्यात येणार आहे. थोरात चौकात सध्यातरी विरोध झाला आहे. एकूणच सिग्नल यंत्रणा सुरू करण्याबाबत आता गती देण्याची वेळ आली आहे. याशिवाय पार्किंगचे पट्टे मारण्याची मागणी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने पालिकेकडे केली आहे, मात्र पालिकेकडून पावसाचे कारण सांगितले जात आहे. पार्किंग पट्टे नसल्यामुळे वाहने पार्किंगचा प्रश्‍न वादाचा ठरत आहे. बेशिस्त पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करताना अडचणी येत आहेत. यातून वादावादीचे प्रसंग निर्माण होताना दिसत आहेत.

                सम-विषमबाबत संभ्रमावस्था

शहरात सम-विषम तारखेला वाहने पार्किंग करण्याबाबत फलक लावले आहेत, मात्र याबाबत वाहनधारकांत संभ्रमावस्था आहे. यामध्ये अनेक चुका असल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. हे फलक दुरुस्त करण्याचा प्रस्ताव पालिकेकडे प्रलंबित आहे.

         नव्या अधिकाऱ्यांची प्रतीक्षा

शहर वाहतूक सल्लागार समितीची बैठक घेण्याच्या हालचाली सुरू होत्या, पण अपर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे व पोलिस उपअधीक्षक गणेश बिरादार यांची बदली झाली आहे. त्यामुळे नव्या पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षा लागली आहे. त्यानंतरच समितीची बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.

Post a comment

0 Comments