भ्रष्ट व्यवस्थेचे दहन हवे.

 नगरपालिका हे राज्याच्या व राष्ट्राच्या विकासातील एक महत्त्वाचे विकासस्थान असते. पण आज या साऱ्याचाच विसर पडलेला आहे.परिणामी किमान सुविधांअभावी नागरिक त्रस्त आहेत. सामाजिक कार्यकर्ते बळी जात आहेत आणि पदाधिकारी व प्रशासन सुस्त आहे.हे वास्तव अतिशय वेदनादायी आहे.पण ते संघर्ष करून बदलावेच लागेल. हा इचलकरंजी नगरपालिकेच्या प्रांगणात नरेश भोरे या कार्यकर्त्यांच्या आत्मदहनाचा संदेश आहे ....

कार्यकर्त्यांचे आत्मदहन नव्हे,भ्रष्ट व्यवस्थेचे दहन हवे

PRESS MEDIA LIVE : 


प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

( ९८ ५०८ ३०२९०)


आधुनिक नगरपालिकांचा उगम युरोपच्या इतिहासात दिसतो. भारतात इंग्रजी राजवटीत नव्या पद्धतीच्या नगरपालिकांचा आरंभ झाला. स्थानिक नागरिकांच्या कारभाराचे ते क्षेत्र असल्याने 'स्थानिक स्वराज्य संस्था' असेही त्यांना संबोधले जाऊ लागले. लॉर्ड रिपन व्हॉईसरॉय असताना त्याने १८ मे  १८२२ रोजी स्थानिक स्वराज्य विषयक कायदा केला. या कायद्याप्रमाणे जनतेच्या प्रतिनिधींद्वारे नगरपालिकांचा कारभार प्रथमच सुरू केला गेला. पुढे १९१९ ला राज्यकारभार सुधारणा कायदा झाला. त्यावेळी स्थानिक स्वराज्य हे प्रांतिक सरकारच्या अखत्यारीत आले. आणि जिल्हा लोकल बोर्ड ही संस्था खऱ्या अर्थाने स्थानिक लोकांची प्रातिनिधिक संस्था बनली.नागरी क्षेत्रात नगरपालिकांच्या निवडणुका होऊन लोकनियुक्त प्रतिनिधीद्वारे कारभार सुरू झाला. अर्थात त्यावेळी घरभाडे  भरणारे व  आयकर भरणारेच मताधिकार बजावू शकत असत. पण तरीही भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेल्या अनेक नेत्यांचा राजकीय उदय नगरपालिकांच्या कारभारातील सहभागामुळे झाला हे उघड आहे.पुढे १९२५ साली मोठ्या शहरातील नगरपालिकांसाठी बॉम्बे म्युन्सिपल ऍक्ट हा कायदा केला गेला. स्वातंत्र्यानंतर प्रौढ मताधिकाराच्या तत्त्वानुसार नगरपालिका निवडणुकीत वयास पात्र असणारे सर्व लोक  मताधिकारास पात्र ठरले. 

               नगरपालिकेचा आणि नागरिकांच्या व्यक्तिगत ,प्रापंचिक, सामाजिक जीवनातील अनेक बाबींचा किंबहुना महत्त्वाच्या बाबींचा फार जवळचा संबंध असतो.अशा वेळीं नगरपालिकेचा कारभार लोकाभिमुख असायला हवा. तो भ्रष्टाचारविरहित असायला हवा. त्यासाठी कारभारी यंत्रणा व कार्य यंत्रणा सक्षम व जनताभिमुख असली पाहिजे. हे गृहीत आहे. नगरपालिकेचा कारभार भ्रष्टाचार विरहित असला पाहिजे. भ्रष्टाचाराला वाव मिळतो तो नियमित व तत्पर निर्णयांच्या कार्यपूर्तीच्या अभावामुळे. हा अभाव टाळण्याची शिकस्त लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी या सर्व पातळ्यांवरून होणे अपेक्षित असते.तसेच नगरपालिकेची जास्तीत जास्त कामे ही  त्या त्या खात्याकडून झाली पाहिजेत. मक्त्याने, कंत्राटाने कामे देण्याची पद्धत शक्यतो कमीत कमी असली पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यात कोणत्याही टक्केवारीला वाव नसावा. टक्केवारीने होणार्‍या कामांचा दर्जाही  काही टक्केच बरा असतो ,बाकी वाईट असतो हे उघड सत्य आहे. 

             

लोकाभिमुख कारभार आणि लोकांचा वाढता सहभाग ही पद्धती नगरपालिका कायद्यातही अभिप्रेत आहे. पण हे सारेच गुंडाळून ठेवले जात आहे.हे इचलकरंजी नगरपालिकेच्या आवारात एका सामाजिक कार्यकर्त्याने आत्मदहन केले यावरून भयावहपणे अधोरेखित होत आहे. सरकारसह सर्व स्थानिक संस्थानी यापासून काही धडा घेण्याची गरज आहे.कारण हे प्रकरण इचलकरंजीत घडले असले तरी कमी - अधिक प्रमाणात सर्वत्र हीच स्थिती आहे हे नाकारता येत नाही. पण म्हणून इचलकरंजीतील गुन्हेगारांचा गुन्हा क्षम्य ठरत नाही हेही तितकेच खरे आहे.

              

            इचलकरंजी शहर महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून आणि वस्त्रोद्योगातील एक महत्त्वाचे शहर म्हणून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखले जाते. तसेच या शहराला  सामाजिक व सांस्कृतिक  उज्वल अशी परंपरा आहे. या शहराने  अनेक  बिनीचे  सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, नेते  निर्माण केले. शिक्षणापासून संगीतापर्यंत आणि प्रबोधनापासून मनोरंजना पर्यंत सर्व क्षेत्रात या शहराने आपला एक राज्य व राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवलेला  आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात श्रीमंत घोरपडे सरकारांच्या अधिपत्याखाली या शहराने सर्व स्तरावर विकास अनुभवला. स्वातंत्र्यानंतर सर्व विचारधारेच्या लोकांचा या शहराच्या योगदानात मोठा वाटा आहे. सर्वांच्या सहकार्यातून या शहराचा विकास  झालेला आहे. गेल्या काही वर्षात मात्र  या नगरीचे राजकीय - सामाजिक -सांस्कृतिक वैभव लोप पावत आहे की काय ? अशी शंका यावी असे अस्वस्थ वर्तमान आहे. 

याचे कारण एकीकडे संवेदनशील  शहर अशी ओळख असलेली इचलकरंजी  अलीकडे  कमालीची  असंवेदनशील  बनत चालल्याची उदाहरणे  वारंवार घडत आहेत. हे चांगले लक्षण नाही.हा विषय संकुचित राजकारणाच्या,व्यक्तीगत स्वार्थाच्या,तोंडदेखल्या विरोधाच्या,संगनमत वाटावे अशा नुरा कुस्तीच्या,व्यक्तिगत हेव्यादाव्याच्या ,राजकीय पोळी भाजण्याच्या पलीकडे जाऊन पाहण्याची गरज आहे. कारण हे प्रकरण गंभीर आहे. नरेश भोरे यांनी आत्मदहना एवढे टोकाचे पाऊल उचलणे योग्य की अयोग्य ? याची चर्चा वेगळी होऊ शकते. तशी ती पद्धतशीरपणे सुरूही केली गेली आहे. तसेच अन्यही गोष्टी जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत.या प्रकरणी भोरे कुटुंबीय व समर्थक यांच्या रौद्र पवित्र्यामुळे नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.ठेकेदाराला अंतरीम जामीन मंजूरही झाला आहे.इतरांचेही  प्रयत्न सुरू झालेतच. पण हे आत्मदहन ज्या कारणांमुळे घडले ती कारणे दुर्लक्षित करता येत नाहीत.त्याचबरोबर एकूणच कमालीचा फोफावलेला भ्रष्ट व्यवहारही डोळ्यआड करता येत नाही.करून चालणार नाही.

                 अलीकडे  इचलकरंजी नगरपालिका  ही कमालीच्या  टक्केवारीच्या  भ्रष्टाचारात अडकल्याची चर्चा  जाहीरपणे होऊ लागली आहे.  पालिकेमध्ये शिवीगाळ, भांडणे, आदळआपट अनेकदा होऊ लागली आहे.लाच घेताना  रंगेहात पकडल्याची उदाहरणे घडलेली आहेत. बेकायदेशी गाळे बांधकाम ते भूखंड लाटणे, नगरपालिकेच्या मालमत्ता बगलबच्याच्या घशात घालणे,  त्याच बरोबर  अनेकदा  सर्वांनी मिळून  एक मताने एक दिलाने  जनतेच्या पैशावर  डल्ला  मारायला  सुरुवात केली आहे  आहे अशी जाहीर चर्चा  रंगते आहे. हे सगळेच  नगरपालिकेचे आरोग्य पूर्ण अनारोग्यात रूपांतरित झालयाचे लक्षण आहे. नरेश भोरेंच्या आत्मदहनाला निमित्त आरोग्य विभागातील चुकीच्या कार्यपद्धतीचे असले तरी  भ्रष्ट कारभाराच्या अक्षयपात्राने कचराकुंडीचे रूप घेतले आहे हे नाकारता येत नाही.

  यातूनच इचलकरंजी नगरपालिकेच्या आवारात सोमवार ता.२६ ऑक्टोबर रोजी नरेश सिताराम भोरे या सामाजिक कार्यकर्त्याने इचलकरंजी नगरपालिकेतील आरोग्य विभागात सुरू असलेल्या चुकीच्या पद्धतीच्या कामा विरोधात आवाज उठवला होता. त्याची योग्य दखल न घेतल्यामुळे त्यांनी आत्मदहन केले. वारंवार पाठपुरावा करूनही आणि असे करण्याची कल्पना देऊनही हे आत्मदहन टाळता आले नाही.ही पालिकेची अत्यंत बेजबाबदार कार्यपद्धती आहे. अतिशय लांच्छनास्पदही  आहे. या घटनेने वस्त्रनगरीची  बदनामी जगभर कमालीची बदनामी झाली आहे. पालिकेतील  वाढता भ्रष्टाचार ,प्रशासनाचा मुजोरपणा ,अधिकाऱ्यांची मस्ती आणि सारे मिळून खाऊ ही विकृती या सर्व गोष्टी अलीकडे अतिशय वाढत आहेत व जनतेच्या चर्चेत आहेत.याबाबत इचलकरंजी नागरिक मंच, समता संघर्ष समिती यासह अनेक सामाजिक संस्था,संघटना सातत्याने आवाज उठवीत असतात.निवेदने देत असतात. पण तरीही प्रशासन मुजोरीनेच वागते. 

नरेश भोरेचा बळी पालिकेतील मुर्दाड व मस्तवाल व्यवस्थेने हकनाकपणे घेतलेला बळी आहे.सर्व सामान्य कार्यकर्ता बळी जाणार आणि ज्या व्यवस्थेविरुद्ध त्यांनी आवाज उठवला ती व्यवस्था तशीच राहणार. ती व्यवस्था तशीच ठेवत तिचे लाभ घेणारे निवांत राहणार हे  अतिशय संतापजनक आहे. याविरोधात विविध पक्ष,सामाजिक संघटना आवाज काढत आहेत.आंदोलने करत आहेत. पालिकेच्या आवारात  पूर्वसूचना देऊन एक कार्यकर्ता आत्मदहन करण्यासाठीं स्वतःला पेटवून घेतो. आणि त्यावेळी दुर्घटनेच्यावेळी आवश्यक असलेली अग्निशमन  यंत्रणाही  निरुपयोगी ठरणे, कुचकामी ठरणे  हेही अत्यंत  बेजबाबदार कारभाराचे द्योतक आहे. हे स्पष्ट झाल्यावर अगदी दुसऱ्यादिवशी सर्व अग्निशमन यंत्रे तातडीने नगरपालिकेत बसवली गेली असे समजते.तसेच पालिकेकडे ऍम्ब्युलन्स चीही सोय नव्हती. नरेश भोरे या आत्मदहन केलेल्या कार्यकर्त्याला रिक्षातून दवाखान्यात न्यावे लागले.ही राज्यातील श्रीमंत नगरपालिकांपैकी एक गणल्या जाणाऱ्या इचलकरंजी नगरपालिकेची अवस्था आहे.  भ्रष्ट व्यवस्था आणि कमजोर व्यवस्थापन यांचाच हा परिपाक आहे. म्हणूनच या आत्मदहनाला जबाबदार असणाऱ्या प्रत्येक घटकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि नगरपालिका बरखास्त करून तेथे प्रशासक नियुक्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे.निरनिराळे राजकीय पक्ष,सामाजिक संस्था, संघटना एकत्र येऊन जेंव्हा यावर आवाज उठवतात तेंव्हा त्यातील गांभीर्य संबंधित यंत्रणा, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी,पालकमंत्री,राज्यसरकार या साऱ्यानी ध्यानात घेतले पाहिजे.

एकीकडे सर्वच निवडणुका या कमालीच्या भ्रष्ट पद्धतीने होत आहेत.पैशांचा वारेमाप वापर हा ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंतच्या सर्वच निवडणुकीत वाढलेला आहे. लाखो- करोडो रुपये खर्च करून नगरसेवक, सभापती,नगराध्यक्ष होणारी मंडळी   'सेवक 'राहतील हा भ्रम आहे.त्यांचा वर्तन व्यवहार नगराचे 'मालक' असल्यासारखाच झालेला आहे. त्यातून भ्रष्टाचाराची कीड व लागण फोफावलेली आहे. तसेच आज शहर ,शहरांचे राज्यव्यापी समान प्रश्न ,राज्याचे शहर विषयक धोरण व बांधिलकी यांचे प्रतिबिंब नगरपालिकांच्या कारभारात पडत नाही असे दिसते.सर्व कारभार नोकरशाहीच्या हातात जाताना दिसतो आहे. आणि नोकरशाही व सत्ताधारी , त्यांचे उघड व छुपे पाठीराखे यांचे साटेलोटे स्पष्टपणे दिसते आहे.

आज शहरांचे प्रश्न केवळ नागरी सुविधांचे नाहीत.तर नागरिकांचा रोजगार व उद्योगधंद्याची वाढ करण्याबाबतचेही आहेत.राज्याच्या ,राष्ट्राच्या विकास कार्यक्रमांमध्ये आपल्या शहराचा न्याय्य व गरजेचा वाटा मिळवणे हे नगरपालिका नेतृत्वाचे कर्तव्य आहे. नगरपालिका हे राज्याच्या व राष्ट्राच्या विकासातील एक महत्त्वाचे विकासस्थान असते. पण आज या साऱ्याचाच विसर पडलेला आहे.परिणामी किमान सुविधांअभावी नागरिक त्रस्त आहेत. सामाजिक कार्यकर्ते बळी जात आहेत आणि पदाधिकारी व प्रशासन सुस्त आहे.हे वास्तव अतिशय वेदनादायी आहे.पण ते संघर्ष करून बदलावेच लागेल हा नरेश भोरे या कार्यकर्त्यांच्या आत्मदहनाचा संदेश आहे .


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी च्या वतीने गेली एकतीस वर्षे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती’ मासिकाचे संपादक आहेत.)


Post a comment

0 Comments