उड्डाण पुलाचे काम अद्याप अपूर्ण. उड्डाण पुलाचे काम अद्याप अपूर्ण ,  वाहतूक कोंडीने वाहनचालक हैराण

PRESS MEDIA LIVE : पिंपरी :

पिंपरी - निगडी येथील भक्ती-शक्ती उद्यान चौकात महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे अद्याप डांबरीकरण बाकी आहे. पुलासाठी दिलेल्या कामाची मुदत संपून जवळपास नऊ महिन्यांचा कालावधी उलटला आहे. तरीही ठेकेदार काम पूर्ण करत नसल्याने उड्डाणपुलाचे काम अपूर्णच आहे. त्यामुळे येथे सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्‌भवत आहे. 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन होते. मात्र, काम पूर्ण न झाल्याने पूल वाहतुकीसाठी खुला केलेला नाही.

निगडी येथे भक्ती-शक्ती चौक येथे जुना मुंबई-पुणे रस्ता आणि प्राधिकरणाचा स्पाइन रस्ता एकत्र येत आहे.येथून जवळच वाहतूकनगरी आहे. बीआरटीएस टर्मिनल उभारले आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाला येथूनच वाहनांची ये-जा सुरू असते. त्याशिवाय, तळवडे आयटी पार्ककडे जाणाऱ्या वाहनांची देखील याच रस्त्याने भक्ती-शक्ती चौकात आल्यानंतर स्पाइन रस्तामार्गे वाहतूक होते. त्यामुळे येथील चौकात सातत्याने वाहतूक कोंडी होते. पर्यायाने, हा चौक 'सिग्नल फ्री' करणे गरजेचे आहे. त्यासाठी निगडी येथे उड्डाण पूल उभारण्याचे काम 27 जून 2017 रोजी हाती घेण्यात आले.

उड्डाण पूल, प्राधिकरण-रुपीनगर भागाला जोडणारा ग्रेडसेपरेटर आणि वर्तुळाकार रस्ता असे काम केले जात आहे. काम पूर्ण करण्यासाठी अडीच वर्षांची मुदत होती. मात्र, मुदतीत उड्डाणपुलाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पुलाच्या कामासाठी मुदतवाढ देण्यात आली. मुदतवाढ देऊन नऊ महिन्यांचा कालावधी उलटला आहे. तरीही अद्याप उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला केलेला नाही. गेल्या महिन्यात 15 ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन होते. मात्र, हे नियोजन फसले आहे.

ग्रेडसेपरेटर, रॅम्पचे काम अर्धवट

सद्य:स्थितीत उड्डाण पूल उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र डांबरीकरण बाकी आहे. ग्रेडसेपरेटरमधील प्राधिकरण आणि रुपीनगर बाजूचे काम झाले आहे. ग्रेडसेपरेटरच्या भिंतीचे काम सुरू आहे. त्याशिवाय, पुण्याकडून मुंबईकडे आणि मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या रॅम्पचे काम 25 टक्‍क्‍यांपर्यंत झाले आहे. ग्रेडसेपरेटर आणि रॅम्पचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. उड्‌डाणपुलाच्या कामासाठी 90 कोटी 53 लाख 59 हजार रुपयांचा खर्च मंजूर आहे. त्यातील आत्तापर्यंत 75 कोटी 31 लाख 93 हजार रुपये इतका खर्च केला आहे.

निगडी येथील उड्डाण पूल उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. डांबरीकरणाचे काम बाकी आहे. ते काम लवकरच पूर्ण केले जाईल. ग्रेडसेपरेटर व रॅम्पचे काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण होईल. पुलाच्या कामासाठी दिल्या जाणाऱ्या भाववाढ फरकाच्या रकमेसाठी वेगळी तरतूद केलेली नसते. भाववाढ फरकाची रक्कम कंत्राटदाराला द्यावीच लागते.

- विजय भोजने, प्रवक्ते, बीआरटीएस, महापालिका.

Post a comment

0 Comments