पुरंदर चे राजकीय वातावरण


     पुरंदर चे राजकीय हवा तापणार असल्याचे संकेत.

PRESS MEDIA LIVE :  सासवड :

सासवड - पुरंदर तालुक्‍यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव, मृत्यूदरातही झालेली लक्षणीय वाढ, या पार्श्‍वभूमीवर माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी 'पालकमंत्री अजित पवार, विद्यमान आमदार संजय जगताप, प्रशासनावर 'आसूढ' ओढल्यानंतर तालुक्‍यात महामारीत राजकीय हवा गरम झाली आहे. पवार आणि शिवतारे यांच्या भेटीनंतर आमदार जगताप यांनी संवेदनशील महामारीवर उपाययोजनेसाठी ठोस पावले उचलली आहेत. राष्ट्रवादीला सोबत घेत प्रशासनाला आदेश दिल्यामुळे आमदार जगताप 'अलर्ट' झाले आहेत. याच पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस- राष्ट्रवादीची गोपनीय बैठक झाल्याची चर्चा तालुक्‍यात रंगली आहे.माजी मंत्री शिवतारे यांनी थेट पवार व जगताप यांनाच लक्ष्य केले होते. त्यानंतर  शिवतारे यांनी पवारांसमवेत बैठक घेतली. यावेळी पवार यांनी जगताप यांच्याशी चर्चा करून उपाययोजना करा, अशी चर्चा केली होती. या भेटीत शिवतारे यांना सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी पवार यांनी जगताप यांचे महत्व वाढविल्याचे चित्र अधोरेखित झाले आहे.

पवार- शिवतारे यांच्या भेटीनंतर आमदार जगताप हे जनतेचा रोष नको म्हणून बैठक घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून कार्यवाहीबाबत प्रशासनाला सूचना दिल्या. (दि. 22) बहुउद्देशीय सुविधा केंद्रीय कक्ष स्थापन करण्याचा आदेश दिला. त्याची अंमलबजावणी (दि.23) तात्काळ झाली आहे.

शिवतारे यांच्या आरोपाने एका झटक्‍यात जगताप गट-राष्ट्रवादी बॅकफूटवर गेली होती. शिवतारे यांना ऐन महामारीच्या कालावधीत जनतेच्या आरोग्याच्या प्रश्‍नावर आयते कोलीत मिळू नये, यासाठी जगताप हे सावध झाले आहेत. अजित पवार यांचा जगताप यांच्यावर असलेला विश्‍वास, सोबत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची फळी शिवतारे यांना 'शह' देणार काय, अशा प्रतिक्रिया तालुक्‍यातून उमटत आहेत.

            शिवतारेंच्या मागण्या निरर्थक

सध्या पुरंदरमध्ये करोनाचा कहर सुरू असून रुग्णांना ऑक्‍सिजन रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होत नसल्याने शिवतारे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. त्यावेळी पवार यांनी जगताप यांच्यावर विश्‍वास दाखवत बैठकीतून तोडगा काढण्याचे सुचविले. त्यानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक नेते 'अलर्ट' झाले. दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांची गोपनीय बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. शिवतारे यांच्या मागण्यापूर्वी आपण उपाययोजना आखल्या असून त्याची अंमलबजावणीही तात्काळ केली जात आहे. शिवतारे यांच्या मागण्यांना काही अर्थ नाही हे दाखविण्यासाठी आमदार जगताप व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांनी प्रशासनासोबत बैठक घेऊन सूचना दिल्या. ऐन महामारीत शिवतारे यांनी 'एंट्री'ने पुरंदरचे राजकारण तापणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

        शिवतारेंना रोखण्यासाठी व्यूहरचना?

पुरंदरच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा विजय शिवतारे यांनी ऐन निणार्यक क्षणी आरोप केला आहे. त्यामुळे राजकारण ढवळून निघाले आहे. राज्यात महा विकास आघाडीतील सर्वच घटक पक्ष तालुक्‍यात प्रबळ आहेत. मात्र, शिवतारे यांचा कॉंग्रेस- राष्ट्रवादीचा सवतासुभा आहे. मात्र, शिवतारे यांनी आरोप केल्यामुळे आघाडी घटक पक्ष खिंडीत सापडले आहेत. शिवतारे यांचे महत्व कमी करण्यासाठी कॉंग्रेस- राष्ट्रवादीतील तालुका पातळीवरील नेते राजकीय व्यूहरचना करीत असल्याची चर्चा तालुक्‍यात सुरू आहे.

Post a comment

0 Comments