ससून रुग्णालयात आता अहोरात्र होणार करोनाची चाचणी.

PRESS MEDIA LIVE : पुणे : (मोहम्मद जावेद मौला) :

पुणे – ससून रुग्णालयात आता करोनाची चाचणी अहोरात्र सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी दिली. शहरातील कोणत्याही भागातील रहिवाशांना महापालिकेच्या कोणत्याही टेस्टिंग केंद्रात चाचणी करता येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत विधान भवन येथे झालेल्या बैठकीत यावरही निर्णय घेण्यात आला. पुण्यामध्ये करोनाची चाचणी सायंकाळी किंवा रात्री करण्याची सुविधा काही खासगी रुग्णालयांमध्ये आहे. परंतु, शासकीय यंत्रणेमार्फत सुरू असलेली टेस्टींगची सेवा दुपारी तीन वाजता बंद होते. सायंकाळी किंवा रात्री कोणाला शासकीय यंत्रणेमार्फत चाचणी करायची असेल तर सध्या ती सेवा उपलब्ध नाही. यासाठी किमान ससून रुग्णालयात तरी, करोनाची चाचणी 24 तास सुरू ठेवावी, अशी मागणी या बैठकीत खासदार चव्हण यांनी केली होती. ती मान्य करण्यात आली.

पुणेकरांना सध्या करोनाची चाचणी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयनिहायच करावी लागते. कामानिमित्ताने बाहेर आलेल्या नागरिकांना ते शक्य होत नाही. त्यासाठी कोणत्याही सेंटरला ही चाचणी करता यावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली होती. त्यालाही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी होकार दिला. त्यामुळे आता शहरात महापालिकेच्या कोणत्याही केंद्रावर नागरिक चाचणी करू शकतील.