शरद पवार यांच्या हस्ते औपचारिक प्रकाशन


 ‘सारिपाट महाविकास आघाडीचा’ या पुस्तकाचे शरद पवार यांच्या हस्ते औपचारिक प्रकाशन

PRESS MEDIA LIVE : पुणे :

महाविकास आघाडी सरकारच्या निर्मितीचा थरारक वेध घेण्यात आलेल्या ‘सारिपाट महाविकास आघाडीचा’ या लेखक विजय जगताप यांच्या पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज पुण्यात केले.

राष्ट्रीय अध्यक्ष उद्योग कक्ष मराठा सेवा संघ प्रकाश जाधव, श्रीमती जनाबाई जाधव माजी नगरसेविका मुंबई महानगरपालिका, सचिन आडेकर ब्लॉक अध्यक्ष काँग्रेस (आय) पुणे, सामाजिक कार्यकर्ते ॲड. लक्ष्मण रानवडे आदी यावेळी उपस्थित होते.

देशातील सर्वात थरारक राजकीय नाट्यातून निर्माण झालेल्या सरकारच्या निर्मितीचा दस्ताऐवज म्हटलं जाईल असं पुस्तक म्हणजे “सारिपाट महाविकास आघाडीचा”याचा उल्लेख करता येईल.

२०१९ च्या विधानसभा निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपाची मालिका निर्माण करून क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी घडलेली घटना म्हणजे सध्या राज्यात सत्तेवर असलेले महाविकास आघाडी सरकार होय.

नऊ महिन्यांपूर्वी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काॅग्रेस हे तीन पक्ष मिळून बनलेले सरकार कोणाच्या ध्यानीमनी नसताना अनपेक्षितरित्या सत्तेवर आलं. भारताच्या राजकीय इतिहासात आजपर्यंत कधीच एखादया राज्यात सत्ता स्थापन होताना भिन्न विचारधारेचे पक्ष एकत्र येऊन सरकार बनवत असताना इतक्या खेळया,कुरघोड्या, डाव, प्रतिडाव, रातोरात उठलेली राष्ट्रपती राजवट, भल्या पहाटे झालेला शपथविधी आणि या प्रश्नी राज्यपालांच्या निर्णयावर थेट सर्वोच्च न्यायालयात सुरू झालेली सत्ताधारी व विरोधकांमधील लढाई,माघारी नाट्य असा इतका दमछाक करणारा प्रवास कधी झाला नाही तो महाराष्ट्रात घडला.

लेखक विजय जगताप यांनी हा संपूर्ण ३६ दिवसांचा प्रवास ओघवत्या शब्दात जसं घडलं तसं अशा रूपात या पुस्तकात मांडला आहे.सरकार निर्मितीच्या घटना घडामोडींचा हा एक दस्ताऐवज ठरेल व राजकीय अभ्यासक,संशोधक व विविध पक्षांचे कार्यकर्ते यांना संदर्भमूल्य ठरेल असा हा सारा उत्कंठा वाढविणारा प्रवास या पुस्तकात शब्दचित्र झाला आहे. विशेषत: शिवसेना व भाजप एकत्र असताना व पुढे २०१४ च्या सत्ताकाळात त्यांच्यात कुरबूरी सुरू झाल्यानंतरचे सारे वाकयुध्द व त्यांचा संसार मोडेस्तोवरच्या सगळ्या घटना व आठवणी या पुस्तकात मांडण्यात आल्या आहेत. विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ नीलम गो-हे यांची लाभलेली प्रस्तावना त्यांच्यातील अभ्यासू शैलीचा व निरपेक्ष सामाजिक कार्यकर्ता पदाची परिचय करून देते. सरकार बनत असताना कशा घडामोडी होतात याची सामान्य नागरिकांना फारशी माहिती नसते.परंतू राजकारण नेमकं कसं शिजतं ? काय उलथापालथी होतात ? हे सारं वास्तव या पुस्तकातून स्पष्ट होते. शरद पवार , अजित पवार यांच्या स्वभाव शैलीचा व राजकारणातील विशेषत: शरद पवार यांच्या बुध्दीचातुर्याचा व चाणक्यनितीची नव्याने ओळख या पुस्तकातून घडते.या सरकारच्या निर्मितीत संजय राऊत हे सूत्रधार कसे ठरले , उध्दव ठाकरे व शिवसेना याविषयी सोनिया गांधी यांच्या मनात व दिल्ली वर्तुळात नेमकी अढी का आहे? ती उलगडण्याचे काम शरद पवार यांनी कसे केले? ही सारी उत्तरे या पुस्तकात मिळतात.

कोरोनाची परिस्थिती व सोशल डिस्टिंक्शन राखून या पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन आज करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post