एक आमदार, खासदार तरी आहे का..?


आठवलेंचा एक आमदार-खासदार तरी आहे का  ?   शरद पवार.

                         

 PRESS MEDIA LIVE : पंढरपूर :

पंढरपूर - शिवसेना येत नसल्यास राष्ट्रवादीने भाजपसोबत सरकार स्थापन करावं, अशी ऑफर देणारे रिपाइं अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारलं. आठवलेंचा एक आमदार-खासदार तरी आहे का? असा उपरोधिक सवाल पवारांनी विचारला. पंढरपूर दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भाष्य केले.

आठवले यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही. राज्यसभेतही नाही आणि बाहेरही नाही. त्यांचा एकही आमदार नाही, खासदार नाही, असा टोला शरद पवारांनी लगावला. महाविकास आघाडी सरकार स्थिर असून, या सरकारला कोणताही धोका नाही. हे सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयने काय दिवे लावले, असा उपरोधिक सवालही शरद पवारांनी विचारला. सुशांतच्या केसमध्ये त्याची आत्महत्या राहिली बाजूला आणि हे सगळे अन्य ठिकाणी वळत आहे, असे पवार म्हणाले.

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नकार दर्शवला होता. या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी मुंबई पोलीस सक्षम असल्याचे त्यांनी म्हटले होते. जवळपास तीन महिने होत आले तरी या प्रकरणात सीबीआयला अजून काहीच सापडले नाही. या उलट हा तपास आत वेगळ्याच दिशेत जात असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले.

                 ते आरोग्य खाते ठरवेल

अनलॉकबाबत बोलताना काय काय सुरु करायचे ते आरोग्य खाते ठरवेल, असे पवारांनी स्पष्ट केले. देश पातळीवर कृषी विधेयकाविरोधात एकत्र येण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी मांडले. शिवाय दोन्ही छत्रपती भाजपच्या पाठिंब्याने राज्यसभेत आहेत. त्यांनी त्यांच्या पाठिंब्याने मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करावा, असा सल्लाही शरद पवारांनी दिला.

शरद पवारांनी संजय राऊत-देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसंदर्भात देखील वक्तव्य केले. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या घेतलेल्या मुलखातीचा राजकीय अर्थ काढायचे कारण नाही. राऊतांनी पहिली मुलाखत माझी घेतली. त्याच मुलाखतीत त्यांनी मला सांगितलं की, पुढची मुलाखत मी उद्धव ठाकरे आणि नंतर भाजप नेत्यांची घेणार आहे असं पवार म्हणाले.

Post a comment

0 Comments