प्रबोधनाचे कार्य व्यापक करणे शांताराम बापूंना आदरांजली.


प्रबोधनाचे कार्य व्यापक करणे हीच शांतारामबापूना 

आदरांजली ....…प्रसाद कुलकर्णी 

P RESS MEDIA LIVE :  इचलकरंजी 

इचलकरंजी ता. ३ ,ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक ,बिनीचे राजकीय कार्यकर्ते  व नेते आणि ख्यातनाम विचारवंत असलेले कालवश आचार्य शांताराम गरुड हे प्रबोधकांचे प्रबोधक होते. राजकीय-सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे वैचारिक आणि सैद्धांतिक प्रबोधन झाले पाहिजे.राजकारण अर्थकारण व समाजकारण भारतीय राज्यघटनेतील मूल्यांच्या आधारे चालले पाहिजे या भूमिकेतून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पुढाकार घेऊन ' वैज्ञानिक समाजवादाचे खुले ज्ञानपीठ 'हे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या 'समाजवादी प्रबोधिनी' या संस्थेची १९७७ साली स्थापना केली. कालवश शांताराम बापू हे आपल्या वाणीतून, लेखणीतून आणि उपक्रमातून अखेरपर्यंत लोकप्रबोधनात कार्यरत होते.त्यांचा विचार घेऊन अधिक सक्षमतेने वाटचाल करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

 असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले.ते  कालवश आचार्य शांताराम बापूंच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात  बोलत होते.प्रारंभी आचार्यांच्या प्रतिमेला पांडुरंग पिसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्व त्या दक्षता घेऊन हा कार्यक्रम घेण्यात आला.

  प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले, कालवश शांतारामबापूंच्या विचारांची गरज आजच्या अस्वस्थ वर्तमानात अधिक आहे. भारतीय संविधानातील मूल्यांवर हल्ले केले जात आहेत. भारतीय बहुविध एकतेच्या राष्ट्रवादाची  मूल्यव्यवस्था  उध्वस्त करून  जाणीवपूर्वक  सांस्कृतिक राष्ट्रवादाची पेरणी केली जात आहे.सर्वसामान्यांचे जगणे अवघड करून भांडवलशाही बळकट केली आहे. एक प्रकारचे अराजक माजविले जात आहे.अशावेळी समतावादी समाजरचनेची दिशा पक्की धरावी लागेल. शांतारामबापूंचा हा वसा आणि वारसा जपण्यासाठी सर्व पुरोगामी चळवळीने व्यक्तीने एकत्र आले पाहिजे. ज्येष्ठ नेते व समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांचे प्रबोधन करणाऱ्या समाजवादी प्रबोधिनीचे कार्य अधिक व्यापक करण्यामध्ये प्रत्येक परिवर्तनवादी व्यक्तीने  सक्रिय सहभाग नोंदवला  पाहिजे.यावेळी सौदामिनी कुलकर्णी,अन्वर पटेल, राजन मुठाणे, पाटलोबा पाटील,सुहास जाधव,नितीन पाटील,संतोष आठवले, बुधभूषण आठवले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


फोटो : कालवश आचार्य शांताराम गरुड यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतांना पांडुरंग पिसे,प्रसाद कुलकर्णी, अन्वर पटेल,सौदामिनी कुलकर्णी

Post a Comment

Previous Post Next Post