गझलकार प्रसाद कुलकर्णी


 बंधमुक्त आणि हळुवार जपत कठोर प्रहार करण्याची समता ही गझलेची  खरी ओळख.

गझलकार प्रसाद  कुलकर्णी.

PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी :

इचलकरंजी ता.२२, कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय सांगणारा कविता प्रकार म्हणून गझलेने मोठे योगदान दिले आहे.त्याच पद्धतीने रसिकांचे मनोरंजन करतच बौद्धिक भूक भागवणारा सर्वोत्तम काव्यप्रकार म्हणूनही गझलेकडेच  पहावे लागते.मराठी मध्ये ' गझलेची बाराखडी 'लिहून शास्त्रशुद्ध गझलेची ओळख सुरेश भटांनी अर्धशतकापूर्वी  करून दिली.सर्वार्थाने 'मराठी गझल विद्यापीठाचे कुलपती' असलेल्या सुरेश भटांनी आपल्या लेखणीतून मराठी गझल अतिशय समृद्ध करून ठेवली आहे.उत्कृष्ट रचना, तंत्रशुद्धता ,छंदोबद्धता ही गझलेची वैशिष्ट्ये ती कोणत्याही भाषेतील असली तरी फार महत्त्वाची असतात. डोळ्यांना तशी भाषा असते तसे गझलेला व्याकरण असते.बंधने असूनही बंधमुक्त आणि हळुवारपणा जपत कठोर प्रहार करण्याची क्षमता ही गझलेची खरी ओळख आहे असे मत गझलकार प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.ते एव्हीजी फिल्म्स अँड प्रॉडक्शन आणि शिवशरण उज्जैनकर फाउंडेशन  (जळगाव )यांच्यावतीने आयोजित आपली माणसं आपली चर्चा या व्याख्यानमालेत ' ओळख गझलेची' या विषयावर बोलत होते.

प्रसाद कुलकर्णी म्हणाले, लोकप्रियता ,हृदय प्रियता,कर्णप्रियता आणि नयन प्रियता ही गझलेची वैशिष्ट्ये असतात.निव्वळ शब्दकृती म्हणजे गझल होत नसते. तर त्या शब्दकृतीचे विशिष्ट संकेतांना अनुसरून केलेले काव्यात्म रूप म्हणजे गझल असते.नेहमीच्या भाषेपेक्षा गझलेची भाषा वेगळी असते.गझलेला फारसी भाषेपासून पासून पाचशे वर्षांची परंपरा आहे. वेदना आणि संवेदना यातूनच गझल जन्म घेत असते. अपूर्णतेतच नवनिर्मितीची बिजे असतात आणि बीजाचे अंकुरणे  कधीच सोपे नसते.कारण त्यासाठी त्याला आतून तडकावे लागते.गझल व तिचे शेर काळजात घुसतात याचे कारण तिची  निर्मिती प्रक्रिया सहज साध्य  नसते.ती प्रसववेदना सोसूनच जन्म घेत असते.गझल बाहेर येण्यापूर्वी काळजात लोणच्यासारखी मुरवत ठेवली तर ती अधिक आस्वाद देते आणि अस्सल गझलेची तीच ओळख आहे.

प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले,सुख आणि दुःख या मानवी  जीवनाच्या अटळ बाजू आहेत.संपूर्ण सुखी किंवा संपूर्ण दुःखी असा माणूस नसतो.गझलकार वेगवेगळ्या अनुभवातून ,दाखल्यातून ,परकाया प्रवेशातून मानवी मनाची आंदोलने टिपत असतो. गझलकाराचे शेर हे केवळ त्याच्या काळजात वास करत नसतात.तर श्वासातुन आणि रक्तातुन वाहत असतात.कवी इतिहास आठवत, भविष्य पहात वर्तमानात जगत असतो. त्यामुळे अनेकदा त्याचे लेखन समकालीनते बरोबरच कालातीतही असते. गझल असो किंवा कविता असो, शेवटी ती माणसाच्या म्हणजेच पर्यायाने समाजाच्याच भोवती फिरते .माणूस हा नाशवंत असल्यामुळे त्याच्यात अपूर्णतेची जाणीव आहे. त्याच जाणिवेमुळे सर्व कला समृद्ध होत जातात.तसेच  दिलखुलास, मनमुराद आनंद देणे व घेणे हे मानवी जीवनाचे सार आहे. ज्यांच्यापर्यंत प्रकाश पोहोचू शकला नाही ,त्यांच्यापर्यंत तो नेण्याचे काम करणे ,तसा प्रयत्न करणे यातच खरा आनंद आहे. गझलेने तो केलेला आहे,दिलेला आहे. प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या ओघवत्या शैलीतील भाषणात गझल, गझलेचे व्याकरण ,गझलेची वृत्ते, गझलेचे तंत्र आदींची अनेक उदाहरणे व दाखले देत  रसिकांना सोप्या पद्धतीने गझलेची ओळख करून दिली.

Post a Comment

Previous Post Next Post