लॉकडाऊनचे सहामहिने....

राज्य व केंद्र सरकारने सर्वसामान्यांना धीर देणारी धोरणे आखण्याची नितांत गरज.

            ज्येष्ठ पत्रकार दयानंद लिपारे.

 PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी :

इचलकरंजी ता.२०,लॉक डाऊनला सहा महिने पूर्ण होत आले असतानाच आरोग्य, सामाजिक ,शैक्षणिक,आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रांची हानी होत आहे.या महासंकटा च्या काळात सर्वसामान्य लोकांपुढे मानसिक अस्वास्थ्यापासून ते बेरोजगारी पर्यंतचे प्रश्न बिकट होत आहेत. कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. शेतीक्षेत्रांनी मात्र या संकट काळातही मौलिक योगदान दिले आहे.अशावेळी सर्वसामान्यांना धीर देणारी धोरणे राज्य व केंद्र सरकारांनी आखण्याची नितांत गरज आहे. असे मत ज्येष्ठ पत्रकार दयानंद लिपारे यांनी व्यक्त केले.ते समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात ' लॉकडाऊनचे सहा महिने ' या  विषयावरील चर्चासत्राचा समारोप करताना बोलत होते. प्रारंभी प्रा.रमेश लवटे यांनी या विषयाची सूत्रबद्ध मांडणी केली.

 गेल्या सहा महिन्यात कोरोनाच्या अभूतपूर्व संकटाने आणि काही चुकीच्या निर्णयांनी या संकटाची व्याप्ती आणि तीव्रता वाढलेली आहे. देशात एक्कावन्न लाखांवर कोरोना रुग्ण आहेत.आणि  त्र्यऐंशी हजारांवर लोक मृत्यू पावले आहेत.एक प्रकारची भीती वातावरणात भरून राहिली आहे. आरोग्य सेवेतील सर्व घटकांनी निश्चितच चांगले योगदान दिले. पण त्याचबरोबर सर्व क्षेत्रांचे होत असलेले भांडवलीकरण व बाजारीकरण अतिशय वेगाने होत आहे. शिक्षणापासून औद्योगिक क्षेत्रापर्यंत आणि सामाजिक संबंधांपासून ते व्यवस्थेच्या कंगालीकरण्यापर्यंत अनेक प्रश्न नवे अक्राळविक्राळ रूप धारण करत आहेत. अशावेळी समाजातील जबाबदार घटकांनी आणि सर्व राजकीय पक्षांनी एकजुटीने या संकटाचा मुकाबला करण्याची गरज आहे.या संकटामुळे संसदेचे अधिवेशनही गुंडाळले जाण्याची शक्यता आहे.या संकटाचा गैरफायदा घेऊन जर विषमतेची धोरणे पुढे रेटली जात असतील तर संपूर्ण देशापुढे मोठे आव्हान उभे राहू शकते. योग्य धोरणाने या संकटाचा मुकाबला होऊ शकतो असा आशावाद धोरणात्मक पातळीवरच्या कृतिशील अंमलबजावणीने देण्याची गरज आहे. सत्तेचा अग्रक्रमी वापर संकट निवारण्यासाठीच केला गेला पाहिजे. प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाच्या 'कोरोनाची महामारी ' या विशेषांकातील लेख हा आशावाद निर्माण करू शकतात असे मत या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. या चर्चेत प्रसाद कुलकर्णी, तुकाराम आपराध, पांडुरंग पिसे ,सचिन पाटोळे, शकील मुल्ला ,रामचंद्र ठीकणे ,रियाज जमादार ,शंकर भांबिष्टे ,मनोहर जोशी आदींनी सहभाग घेतला. यावेळी रोझा देशपांडे,सुभाष पिसे,मारुती अपराध यांना आदरांजली वाहण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post