सरकारने सांगली जिल्ह्यातील निष्क्रिय अधिकाऱ्यांना हटवावे

सरकारने सांगली जिल्ह्यातील निष्क्रिय अधिकाऱ्यांना हटवावे.

आमदार व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची मुख्यमंत्र्यांन कडे मागणी



PRESS MEDIA LIVE : पुणे :

पुणे : "सांगली जिल्ह्यात कोरोनामुळे वाढलेला मृत्युदर बघता सरकारने ठोस उपाययोजना करावी. सरकारने सांगली जिल्ह्यातील निष्क्रिय अधिकाऱ्यांना हटवावे." अशी मागणी आमदार व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. आमदार खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र पाठवून सांगली जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात आमदार खोत म्हणतात, "सांगली जिल्ह्यात कोरोना या महामारीचे संकट भयावह पातळीवर पोहोचले आहे. जिल्ह्यातील जनता जीव मुठीत धरून देवाकडे धावा करीत आहे, की परमेश्वरा तुझ्या पाया पडतो, काहीही कर पण मला आणि माझ्या कुटुंबाला या संकटापासून दूर ठेव.कारण जिल्ह्यातील दवाखाने आता रुग्णांना बरे करण्यात अपयशी ठरले आहेत. मी गेली अनेक वर्षे अभिमानाने सांगत होतो, आमच्या सांगली जिल्ह्यातील माता आणि बालमृत्यूचा दर सगळ्या देशात कमी आहे. त्याच जिल्ह्यातील कोरोना या महामारीची स्थिती अंत्यंत दयनीय झाली आहे,''

खोत पत्रात पुढे म्हणतात, "सांगलीचा मृत्यू दर ४.०६ टक्के म्हणजे जगाच्या म‌त्यूदराच्या पुढे गेला आहे.एकेकाळी सर्वोत्तम उपचार मिळणारे दवाखाने म्हणून राज्यात आणि देशात प्रसिद्ध पावलेल्या सांगली आणि मिरज शहरातील आरोग्य यंत्रणा गलितगात्र होऊन पडली आहे.दवाखाने म्हणजे प्राण वाचवणारी आधुनिक मंदिरे आहेत ही भावना जनतेच्या मनात काठोकाठ भरलेली असते.पण आरोग्य यंत्रणेरुपी देवच या आधुनिक मंदिरात नसेल तर जनतेने कोणाच्या तोंडाकडे पहावे? हा मन विषण्ण करणारा प्रश्न पडला आहे. ही शोचनीय परिस्थिती बदलायची असेल तर आपणच जातीने लक्ष घालून संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित केली पाहिजे."

"जिल्ह्यात पहिला मृत्यू एप्रिल महिन्यात झाला.त्यानंतर मे महिन्यात तीन, जून महिन्यात आठ, जुलै महिन्यात ६६ आणि अॉगस्ट मधे १७१ अशी मृत्युसंख्या वाढत चालली आहे. यामुळे जनतेचा धीर खचत चालला आहे. निष्क्रिय आणि बोलघेवड्या अधिका-यांना पदावरून दूर करून चांगले सक्षम अधिकारी आणल्याशिवाय परिस्थितीत फरक पडणार नाही."असे खोत यांनी म्हटले आहे.

"मिरज शासकीय महाविद्यालय आणि सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य रुग्णांना चांगले उपचार मिळतात ही या रुग्णालयांची ख्याती आहे..पण आज त्याच रूग्णांलयात ३० कोरोना रुग्णांमागे केवळ २ नर्सेस काम करीत आहेत .त्यामुळे या रूग्णांलयात कोणी कोरोना रूग्णांची दाद घेत नाही ही भावना सगळ्या जिल्ह्यात पसरली आहे.अनेक डॉक्टर कोरोना रूग्णांची भेटही न घेता बाहेरच्या बाहेर कागदपत्रे रंगवून, सह्या करून परस्पर निघून जात आहेत. केवळ वशिल्याच्या रूग्णांवर उपचार होतात.सामान्य रूग्णांची दखल घेतली जात नाही. या सामान्य रूग्णांना वाली कोण हा कळीचा आणि कळकळीचा प्रश्न आपल्यासमोर ठेवत आहे,'' असेही खोत यांनी म्हटले आहे.

जिल्ह्यात ग्रामीण आणि उपजिल्हारूग्णालयात १४५ अॉक्सिजन बेडसची सोय आहे.पण त्याठिकाणी रुग्णांची भरती न करता कोरोनांच्या रुग्णांना सरसकटपणे सांगली आणि मिरजेच्या सरकारी दवाखान्यात पाठवून जबाबदारी ढकलली जात आहे. परिणामी या तोकडी सोय असलेल्या रूग्णांलयावर ताण पडून मृत्यूंची संख्या वाढत आहे. केवळ समन्वयाच्या अभावी हे घडत आहे. हे अत्यंत संताप जनक आहे. रुग्णालय व्यवस्थापनाकडून उपचाराखालील बेड आणि रिकाम्या बेडची माहिती दररोज सकाळी ८ वाजता आणि सायंकाळी ५ वाजता दिली जाते. पण या दरम्यान काळात रूग्ण दाखल झाला अथवा बेड रिकामी झाली तर त्याची माहिती मिळत नाही. परिणामी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांची अकारण फरफट होत आहे. तासातासाला याची माहिती अपडेट केली तरी जनतेला दिलासा मिळेल,'' अशी सूचना खोत यांनी केली आहे.

''पण आज आरोग्य यंत्रणा बहिरी झाली आहे की काय अशी शंका येते. ग्रामीण भागात रुग्णांचे नमुने घेऊन त्यांना संसर्ग झाला आहे की नाही हे वेळेवर कळवले जात नाही.वाळवा आणि शिराळा तालुक्यात अक्षरशः अंदाधुंदी माजली आहे.सरकारी दवाखान्यातील डॉक्टर नमुने पाठवून देतात पण त्यांना सुध्दा रिपोर्ट कळवला जात नाही.

कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाले तरी इतर सदस्यांना त्यांच्या रिपोर्टची कल्पना मिळत नाही. हे फारच भयंकर आहे.यामुळे संपर्क साखळी कशी तुटणार? आज सांगली जिल्ह्यात दररोज चारशेच्या आसपास रुग्ण दाखल होताहेत याला आरोग्य आणि प्रशासन यंत्रणातील गेल्या चार महिन्यांतील बेपर्वाई कारणीभूत आहे. हे असेच चालू राहिले तर आगामी काळात कोरोना रुग्णांच्या संख्येचा विस्फोट झाल्याशिवाय राहणार नाही." अशा इशारा खोत यांनी दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post