आणखीन एक पॅकेज शक्य

 आणखी एक पॅकेज शक्‍य !


PRESS MEDIA LIVE :

नवी दिल्ली – लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर विविध क्षेत्रांना तातडीने मदत व्हावी याकरिता केंद्र सरकारने 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. करोना आटोक्‍यात आल्यानंतर विविध क्षेत्रांचा आढावा घेऊन आणखी एक पॅकेज देण्याची शक्‍यता अर्थमंत्रालयाने खुली ठेवली आहे.र्थ अर्थमंत्रालयाच्या खर्च व्यवस्थापन विभागाचे सचिव टी व्ही सोमनाथन यांनी सांगितले की, एकदा करोना आटोक्‍यात आल्यानंतर आणि लोकांच्या मनातील भीती दूर झाल्यानंतर कोणत्या क्षेत्राला कोणत्या मदतीची गरज आहे याचा आढावा घेऊन नवीन पॅकेज जाहीर केले जाऊ शकते. 

मार्च महिन्याच्या अखेरीस अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पॅकेज जाहीर केले होते. त्यानुसार केंद्र सरकार राष्ट्रीय उत्पन्नाच्या दोन टक्के रक्कम अधिक खर्च करणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये रिझर्व बॅंकेने व्याजदरात दोन वेळा मोठी कपात केली आहे. सध्याच्या अडचणीच्या काळामध्ये सर्वांनी तगून राहण्यासाठी हे पॅकेज जाहीर केले होते. नियमित अर्थव्यवस्थेचा यांच्याशी संबंध नव्हता.

मात्र हे पॅकेज केवळ उत्पादन वाढविण्यासाठी उपयोगी आहे. नागरिकांची क्रयशक्ती वाढविण्यासाठी या पॅकेजचा उपयोग नाही, अशी टीका होत आहे. त्यांनी सांगितले की, सध्या संसर्गाच्या भीतीमुळे लोक नियमितपणे खर्च करीत नाहीत. सध्या फक्त संसर्ग टाळणे आणि अस्तित्वात राहणे यावर लोकांचा भर आहे. अशा परिस्थितीत विविध क्षेत्राचे उत्पादन वाढण्याची शक्‍यता कमी आहे. मात्र परिस्थिती अटोक्‍यात आल्यानंतर पूर्ण अर्थव्यवस्था सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून नव्या पॅकेजवर विचार केला जाऊ शकतो. अशा प्रकारची परिस्थिती नोव्हेंबरच्या सुमार निर्माण होऊ शकते, असे त्यांनी सुचविले.

                          लोक खर्च टाळत आहेत

मार्चमध्ये जाहीर झालेल्या पॅकेजनुसार केंद्र सरकारने गरीब महिलांच्या खात्यामध्ये रक्कम टाकली होती. प्राप्त माहितीनुसार या रकमेपैकी केवळ 60 टक्‍के रक्कम नागरिकांनी वापरली आहे. या नागरिकांनी 40 टक्के रक्कम वाचवली आहे. त्यामुळे सरकारने पैसे दिले तरी लोक खर्च करतील असे काही म्हणता येणार नाही असे सोमनाथन म्हणाले. त्यामुळे नवे पॅकेज जाहीर करण्यासाठी केंद्र सरकार काही काळ वाट पाहणार आहे. लोक स्वत:जवळ असलेला पैसा खर्च करण्यास तयार नाही त्यामुळे त्यांना सध्याच्या अवस्थेत आणखी पैसा दिला तर त्याचा उपयोग होणार नाही.

Post a Comment

Previous Post Next Post