पिंपरी चिंचवड : होटेल व्यवसाय समोर अनंत अडचणी


 पिंपरी-चिंचवड : हॉटेल व्यवसायासमोर अनंत अडचणी.

पूर्ण क्षमतेने हॉटेल्स सुरू करण्यास परवानगी नसल्याने आर्थिक कोंडी

PRESS MEDIA LIVE :  पिंपरी

पिंपरी – कन्टेन्मेंट झोनबाहेरील हॉटेल, लॉजिंग, गेस्ट हाऊसमधील निवास व्यवस्था सेवा 33 टक्‍क्‍यांच्या मर्यादेत सुरू करण्यास काही अटींवर परवानगी मिळाली असली तरी हॉटेल व्यवसायासमोरील अनंत अडचणींचा डोंगर अद्यापही कायम आहे. हॉटेल व्यावसायिकांना पूर्ण क्षमतेने हॉटेल्स सुरू करण्यास अद्याप परवानगी मिळाली नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी होत आहेआहे.  आयुक्तश्रावण हर्डीकर यांनी अनलॉक-3.0 अंतर्गत कन्टेन्मेंट झोनबाहेरील हॉटेल, लॉजिंग, गेस्ट हाऊसमधील निवास व्यवस्था सेवा 33 टक्‍क्‍यांच्या मर्यादेत सुरू करण्यास काही अटींवर परवानगी दिलेली आहे. ज्या हॉटेल्समध्ये संस्थात्मक अलगीकरण अथवा संस्थात्मक विलगीकरण केले जात असेल तेथे निवास व्यवस्था शंभर टक्‍क्‍यांपर्यंत करण्यास परवानगी आहे. तसेच, हॉटेल किंवा लॉजिंगमधील रेस्टारंट, कॅन्टीनची सोय केवळ तेथे निवासी राहणाऱ्या प्रवाशांसाठीच करण्यास परवानगी दिली आहे. फूड कोर्ट, रेस्टॉरंटमधील घरपोच सेवेला परवानगी दिली असली तरीही त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अद्याप हॉटेल व्यवसाय अडचणीतच आहे. पुरेशी दक्षता आणि सोशल डिस्टंसिंग घेऊन व्यवसायाला परवानगी द्यावी, अशी हॉटेल व्यावसायिकांची प्रमुख मागणी आहे.

हॉटेल व्यावसायिक सापडले चक्रव्यूहात

देशभरात 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन सुरू झाला. जवळपास साडेचार महिन्यांचा कालावधी उलटला आहे. अद्यापही हॉटेल्सला पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक चक्रव्यूहात सापडले आहेत. काही व्यावसायिकांनी हॉटेल्स बंद करून अन्य व्यवसायाचा पर्याय निवडला आहे. वीज बिल, विविध कर भरणे त्यांना जिकीरीचे झाले आहे. ज्यांनी बॅंकाकडून कर्ज काढून व्यवसाय सुरू केला आहे, त्यांचे चार ते पाच महिन्यांचे हप्ते थकले आहेत. सध्या बॅंकांनी हप्ते भरण्यासाठी सवलत दिली असल्याने काही अंशी दिलासा आहे. भाडेतत्त्वावर हॉटेल चालविणाऱ्यांचे भाडे थकले आहे. ज्यांनी लॉकडाऊनपूर्वी नव्याने हॉटेल व्यवसाय सुरू केला, त्यांच्यासमोर तर अडचणींचा डोंगरच उभा राहिला आहे. हॉटेल व्यवसाय थंडावला असल्याने कर्मचाऱ्यांना पगार देण्यातही अडचणी येत आहे.  रा ज्य सरकारने हॉटेल व्यावसायिकांना पुर्ण क्षमतेने हॉटेल्स सुरू करण्यास परवानगी द्यायला हवी. सोशल डिस्टंसिंग, आरोग्यविषयक दक्षता, वैद्यकिय तपासणी करूनच व्यावसायिक हॉटेल्स चालवतील. सध्या हॉटेल्समध्ये 33 टक्के मर्यादेत निवास व्यवस्था आणि घरपोच सेवेलाच परवानगी आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

– गोविंद पानसरे, कार्याध्यक्ष, पिंपरी-चिंचवड हॉटेल असोसिएशन.

लॉकडाऊन सुरू होऊन साडेचार महिन्यांचा कालावधी उलटला आहे. सध्या हॉटेल व्यावसायिक खूप अडचणीत आहेत. सरकारने मॉल्स, सलून व्यावसायिक यांना परवानगी दिली मग हॉटेल व्यवसायाला का परवानगी दिली जात नाही, हे लक्षात येत नाही. छोटे व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. काही व्यावसायिकांना तर हॉटेल्स बंद करण्याची वेळ आली आहे. होम डिलिव्हरी, हॉटेल्समधील निवास व्यवस्था या माध्यमातून मिळणारे उत्पन्न नगण्य आहे. पुरेशी दक्षता घेऊन हॉटेल्स सुरू करायला परवानगी मिळायला हवी.

– उल्हास शेट्टी, प्रमुख हॉटेल व्यावसायिक.

Post a comment

0 Comments