महाराष्ट्राचे बलदंड शाहीर राजाराम जगताप.

 महाराष्ट्राचे बलदंड शाहीर राजाराम जगताप खऱ्या अर्थाने लोकशाहीर आणि शाहीर भूषण होते.आपल्या पहाडी आवाजाने आशय घन शब्दरचनेने आणि उत्तम अभिनयाने त्यांनी पोवाड्याची कला जपली. त्याद्वारे समाजाला दिशा देण्याचे काम केले.लोकरंजनातून लोकप्रबोधनाचे काम फार चांगल्या पद्धतीने त्यांनी केले. बुधवार ता. २६ ऑगस्ट २०२० रोजी लोकशाहीर राजाराम जगताप वयाच्या ९१ व्या वर्षी वार्धक्याने कालवश झाले यानिमित्ताने यांच्या शाहिरी विषयी...

महाराष्ट्राचे बलदंड शाहीर  राजाराम जगताप.

प्रसाद माधव कुलकर्णी इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९०)

PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी :

इचलकरंजी शहर वस्त्रोद्योग यामुळे भारतभर प्रसिद्ध आहे. वस्त्रोद्योगातील नवे तंत्रज्ञान आत्मसात केल्यामुळे आता या शहराची ओळख जागतिक स्तरावरही झालेली आहे. व्यवसायिक तेजी-मंदी सातत्याने अनुभवणारे शहर आपला सकस सांस्कृतिक वारसा मात्र कायम तेजीत ठेवत आलेले आहे.कला,क्रीडा यासह सर्वच क्षेत्रात या शहराला एक दीर्घकालीन व सकस सांस्कृतिक वारसा आहे.या नगरीचे अधिपती श्रीमंत बाबासाहेब घोरपडे सरकार यांच्या घराण्याचे योगदान यामध्ये मोठे आहे. या मातीने अनेक माणसं घडवली त्यापैकीच एक नाव म्हणजे शाहीर राजाराम जगताप. महाराष्ट्राचा बलदंड शरीर असलेले शाहीर राजाराम जगताप इचलकरंजीच्या साहित्य,सांस्कृतिक,सहकार क्षेत्रातील एक मानाचे व्यक्तिमत्व होते. श्री राजाराम जगताप यांना शासकीय पूरस्कारासहीत अनेक पुरस्कारांनी गौरविले गेले होते.महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या अध्यक्षपदासह इचलकरंजी को.ऑप.स्पिनींग मिल,शिवनेरी सहकारी बँक आदी संस्थांचे संचालकपदही त्यांनी भूषविले होते.४ मार्च १९३० रोजी एका शेतकरी कुटुंबात  जन्मलेले शाहीर २७ ऑगस्ट २०२० रोजी वयाच्या ९१व्या वर्षी वार्धक्याने कालवश झाले.त्यांच्या दीर्घ आणि प्रेरणादायी कार्यकर्तृत्वाला मानाचा मुजरा आणि त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.

कुस्तीचे शौकीन असलेल्या शाहीर राजाराम जगताप ज्येष्ठ बंधू शाहीर गंगाराम जगताप यांच्याकडून शाहीरीचे धडे गिरवले. १९५२  साली शाहिरीचा डफ त्यानी हातात घेतला.स्वतः शाहिरी गीते लिहून पल्लेदार आवाजामध्ये त्याची पेशकश सुरू केली. भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापासून मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यापर्यंतच्या अनेक मान्यवरांसमोर त्यांनी आपली शाहिरी कला सादर केली. हजारो रसिकांची सातत्याने वाहवा मिळवली. शाहीर राजाराम जगताप यांना अतिशय उत्तम व्यक्तिमत्व लाभलेले होते.आणि त्या व्यक्तिमत्त्वाला शाहिराची अत्युत्कृष्ट वेशभूषा करून ते सादर ते कला सादर करत असत. त्यामुळे त्यांना बघणे आणि ऐकणे हा एक रोमांचकारी अनुभव असायचा.त्यांनी अनेक शाहीर घडवले.

शाहीरीचा सांस्कृतिक वारसा पुढे नेण्यामध्ये त्यांनी अतुलनीय योगदान दिले आहे.

             शाहीर राजाराम जगताप यांनी गेल्या सत्तर वर्षांत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या बरोबरच कर्नाटक,गोवा, पंजाब, उत्तर प्रदेश आदी अनेक राज्यातून आपली कला सादर केली. शेकडो - हजारो लोकांना मंत्रमुग्ध करून टाकले. राष्ट्राचा उद्धार करणाऱ्या महामानवाच्या पोवाड्या बरोबरच निरनिराळ्या राष्ट्रीय प्रश्नांवरही त्यांनी पोवाडे लिहिले. त्याचे अप्रतिम सादरीकरण केले. आपल्या पोवाड्या मधून त्यांनी एक व्यापक सामाजिक भान आणि सामाजिक दृष्टीकोन मोठ्या तडफेने मांडला.त्यांच्या डफातील सामाजिक तडफेचे सार्वकालिक महत्त्व फार मोठे आहे. एका ध्येयाने प्रेरित होऊन ते शाहिरी करत होते. लौकिकार्थाने शाहिरांचे शिक्षण केवळ इयत्ता चौथी पर्यंतच झालेले होते.पण इतिहासाकडे आणि समाजाकडे पाहण्याचा त्यांचा प्रगल्भ दृष्टीकोण त्यांना  ' ' ' ' 'शिक्षकांचा शिक्षक' आणि 'शाहिरांचा शाहीर' करून जात होता.त्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे.

    "आम्ही गातो राहू वीर रसाच्या गाथा 

    लिहू वीरांच्या कथा

    पैशासाठी कधी न सोडू 

    धरल्या आमच्या पथा

     सुसंस्कारी सुविचारी होवो भारतीय जनता

     याच साठी गात फिरतो राजाराम पोवाडा 

     असुद्या लोभ आम्हावरा थोडा...."

     शाहीर राजाराम जगताप यांनी लोकमाता जिजाऊ  यांच्यावर पोवाडा लिहिलेला आहे. जिजाऊंचे महानपण यातील शब्दाशब्दातून ओतप्रोत व्यक्त झालेले आहे. शिवाजीराजे उदरात वाढत असताना या मातेला जे डोहाळे लागले त्याचे प्रत्ययकारी वर्णन या पोवाड्यात ते करतात. ते म्हणतात..

      " सांगते जिजा शहाजीला ,निराळेच डोहाळे मला,

        हवे हत्ती घोडे बैसायला, चडून जावे डोंगरी किल्ला

        नी पहावे तिथल्या रम्य शोभेला, सोन्याचे तक्त बसायला

        धारण करून राज्य छत्राला,द्यावे दान गोरगरिबाला

        द्याव्या चौर्या ढाळून आपल्याला,नौबतीच्या मुजऱ्याला                 धनुष्यबाण घेऊन भाला,ढाल तलवार निघाव लढण्याला

           घ्यावं जिंकून गड नी किल्ला,

           अशी इच्छा वारंवार   होते प्राणपती मजला....

           असे डोहाळे लागलेल्या जिजाऊनी आपल्या पुत्राला कसा घडवला ही सारी कथा आपल्या महाराष्ट्राच्या जाज्वल्य इतिहासाचा ठेवा आहे.शाहीर राजाराम जगताप यांनी 'धाडसी शिवाजी' या  पोवड्या मध्ये शिवरायांनी फत्ते केलेल्या विविध धाडसी मोहिमांची अतिशय उत्तम पद्धतीने गुंफण केलेली आहे. छत्रपती संभाजीराजांवर ही शाहिरांनी पोवाडा लिहिला आहे. संभाजी राजांची शूरता, वीरता त्यामध्ये आवेशपूर्ण पद्धतीने मांडलेली आहे .संभाजी राजांचा औरंगजेबाने केलेला छळ आणि त्याला न बधलेले संभाजी महाराज यांची हाकिकत शाहीर डोळ्यासमोर उभी करतात.सळीने डोळे फोडले तरी संभाजी राजे विचलित झाले नाहीत हे सांगून शाहीर म्हणतात..

           " तवा काय शहा बोलला चिडून

            काढा त्याची जीभ हासडून 

            तसं केलं असदखानान

             काढली जीभ त्याची तोडून 

             शांत तरी राजाचं मन, 

             पुन्हा काय शहा बोलला चिडून 

             अंगास पलिते लावून 

             भरता वाणी काढा भाजून

             कणसावाणी काढा सोलून

              तसच बघा केलंय खानान

              देशाचंफेडाया ऋण 

              भोगल्या किती यातना राजाने

              मरणान गेला शिकवून 

              शत्रूला जाऊ नका शरण.."

               

                 शाहीर राजाराम जगताप यांनी 'अहिल्यादेवी होळकर' यांच्यावर लिहिलेल्या पोवाड्यात त्यांचा सामाजिक दृष्टिकोण अधिक व्यापक झालेला दिसतो. अहिल्यादेवी सदासर्वकाळ पूजापाठ करण्यात मग्न असतात. त्यामुळे त्या राज्यकारभार कसा करणार ?अशा शंका अनेकांनी व्यक्त केल्या होत्या. पण त्या चुकीच्या होत्या.ते अहिल्यादेवींनी आपल्या कार्यकर्तुत्वाने दाखवून दिले. शाहीर राजाराम जगताप त्याबाबत म्हणतात..

                 "गुन्हेगारीला घालाया आळा

                  काय केल ऐका

                   कसायला दिली शेती अवजाराला पैका

                   सुखमय जीवन भिल्लाचं,केलं तीन बरका

                   गुन्हेगारांनी सोडला धंदा, 

                   राज्यात आबादी बरका ..."

                   पुढे या पोवाड्या शाहीर म्हणतात,

     " तळी ,विहिरी, रस्ते ,शाळा बांधल्या गावोगावी 

      भुकेल्याना अन्नदानाची केली सोय नवी

      आर्थिक उन्नतीसाठी काढले उद्योगधंद्याला 

      प्राधान्य दिलं वस्त्रोद्योगाला आणलं भरभराटीला

      ग्रामपंचायती सुरू केल्या त्या हो काळाला 

      ग्रामीण जीवन सुखी करायला पायंडा पाडला

      शेतकऱ्यांना मदत केली त्यांच्या शेतीला

       पशु संवर्धनही केले त्या हो वेळेला ..."        

                    याच पद्धतीने रयतेचा राजा असलेल्या प्रखर बुद्धिवादी राजर्षी शाहू महाराजांचा पोवाडा शाहीर राजाराम जगताप यांनी लिहिला. शाहूराजांनी समाजाच्या सर्व घटकांच्या उन्नतीचा बारकाईने विचार केला. सर्वांगीण समता प्रस्थापित करण्याचा नेटका प्रयत्न केला. शाहुराजांच्या सामाजिक-सांस्कृतिक दृष्टिकोनावर भाष्य करताना शाहीर राजाराम जगताप म्हणतात..

   " माणसाला भूक,तहान,अन्न,वस्त्र आणि निवारा 

     तसं असतं एक मन, सर्व सिद्धीचे कारण

     जसं घडवाव तस घडतं मन ,देवा वा दैत्य होती संस्कारांन

     हे तत्व महान जाणून,शाहुराजांना केला कला साऱ्या जतन        नाटकाला दिले प्रोत्साहन, शाहिराला दिले प्रोत्साहन 

     बागेला पाणी पाजुन सुंदर फुले फुलवून

      टाकीचे घाव घालून जसा देव निर्मित कलावान 

      त्या फुलाकडे पाहून जसा माळी जातो हरकून

      तसं बघा शाहु राजांन, तनमनधन अर्पून

      फुलविल माणसाचं मन..."

                   भारताला स्वातंत्र्य हजारो ,लाखो लोकांच्या सहभागाने मिळाले आहे.या सगतंत्र्य चळवळीला यशस्वितेचे रूप देणारे महात्मा गांधी म्हणजे भारताचे सर्वार्थाने राष्ट्रपिता. ' सत्याग्रही महात्मा गांधी 'या पोवाड्यात शाहीर राजाराम जगताप यांनी त्यांच्या जीवनकार्याचे यथार्थ वर्णन केले आहे. त्यांनी भारतीय स्वातंत्र्याचा रणसंग्राम ही पोवाडाबध्द केला. हा पोवाडा म्हणजे भारताचा इतिहास कसा होता? वर्तमान काळ कसा आहे ?आणि भविष्यकाळ कसा असला पाहिजे? हे स्पष्ट करणारे एक महान शब्दशिल्प आहे.१८५७ च्या  पहिल्या स्वातंत्र्य आंदोलनापासून ते १५ ऑगस्ट १९४७ च्या पहिल्या ध्वजारोहणापर्यंत सर्व प्रसंगांची नेमकेपणाने मांडणी त्यात केली आहे. या पोवाड्याच्या शेवटी शाहीर राजाराम जगताप म्हणतात,

  "  जिंकले दिल्लीचे तख्त, बाराचा वख्त, जाऊले मुक्त

    १५ऑगस्ट ४७ साल, मातेचे पुन्हा उजळले भाल

     संपले आई तुझे हाल, गतकाळीचे वैभव तुझे 

     मिळवण्या पायी सुरू जाहले उद्योग धंदे आज ठाई ठाई

      विकास कामी रमूनी गेली ग्रामीण जनता 

      तळी- विहिरी- रस्ते - शाळा गावोगावी आता

       स्वराज्याची ज्योती घेऊन आम्ही पुढे जाऊ 

       आली संकट किती आम्हावरी धैर्ये तोंड देऊ 

       जाती -भेद- पक्ष विसरून करू तुझी सेवा

       सर्व जगामध्ये भारत माते, मान तुझा व्हावा..."

       असा उज्वल आशावाद निर्माण करणारे प्रेरणादायी पोवाडे शाहीर राजाराम जगताप यांनी लिहिले आणि गायले. प्रतापगड, बाजीप्रभू, वीर मुरारबाजी, संताजी घोरपडे, महात्मा फुले, चिनी आक्रमण, बांगला मुक्ती ,काडसिद्धेश्वर महाराज, नरवीर अण्णासाहेब पाटील ,जंगल वाचवा, दुष्काळ आदी अनेक विषय त्यांनी पोवाड्यासाठी निवडले. राष्ट्रीय आपत्तीच्या काळात त्यांनी दुष्काळ निधी व संरक्षण निधी याला मोलाची मदत केली. आणि आपल्या शाहीरीचा उपयोग राष्ट्र बांधणीच्या कार्यासाठी केला." विरांची पूजा करावी पराक्रमासाठी, लोखंडाचे चणे फुटाणे मर्दाच्या ओठी " अशी भूमिका असणाऱ्या शाहीर राजाराम जगताप यांनी आपल्या पहाडी आवाजाने, आशयघन शब्दरचनेने  आणि उत्तम अभिनयाने पोवाड्याची कला जोपासत नेली आणि सर्वदूर पोहोचवली.त्यामधून समाजाला दिशा देण्याचे काम केले.लोकरंजनातून लोकप्रबोधन चांगल्या पद्धतीने केले  जाऊ शकते हे त्याने दाखवून दिले. शेवटी शाहीर राजाराम जगताप यांच्याच शब्दांमध्ये थोडासा बदल करून असे म्हणता येईल की,

       " वीर रसाचा साक्षीदार हा,पोवाडा अतिमहान

        कैक तपे गातो हा जोशात शाहिरी गान

         रसिकांनी दिले याला भरून कीर्तीचे दान 

         हा शाहीर अमर राजाराम करी शाहिरीचाच सन्मान

          हा शाहीर अमर राजाराम करी शाहिरीचाच सन्मान..

          महाराष्टाच्या या बलदंड शाहिराला विनम्र आदरांजली.

          

          ( लेखक समाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजीच्या वतीने गेली तीस वर्षे  नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या 'प्रबोधन प्रकाशन ज्योती 'मासिकाचे संपादक आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post