अस्वस्थ वर्तमानात माणसाला


अस्वस्थ वर्तमानात माणसाला आंतरिक सामर्थ्य प्रदान करणारा कवितासंग्रह म्हणजे ‘मुकुटमणी’ : 

गझलकार प्रसाद कुलकर्णी 

 




PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी :


इचलकरंजी ता.२४,संपूर्ण जगाभोवती कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. मानवजातीच्या मोठ्या समूहासमोर   जीविताचा आणि सर्वांगीण अस्तित्वाचा प्रश्न उभा झाला आहे.  लॉकडाऊन पासून बेरोजगारी पर्यंत,उद्योगधंदे बंद पडण्यापासून  असह्य स्थिरीकरणा पर्यंतची अनेक संकटे निर्माण झाली आहेत.त्यातून दुःख, दैन्य, हतबलता, भयग्रस्तता सर्वत्र दाटलेली आहे.अशावेळी ‘मुकुटमणी’ संग्रहातील कविता मात्र हे निराशेचे सावट दूर करू पाहते. समकालाच्या अत्यंत विदारक पार्श्वभूमीवर राजकीय, सामाजिक, आर्थिक तसेच सांस्कृतिक बदलांना सामोरे जात कवी समाजातील वैषम्यावर नेमकेपणाने बोट ठेवतो. सामान्य माणसांच्या व्यथा, वेदनांचे प्रत्ययकारी चित्रण करणारी कविता ‘मुकुटमणी’ मधून आपल्याला अनुभवायला मिळते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध गझलकार व साहित्यिक प्रसाद माधव कुलकर्णी यांनी केले. ते नाईट कॉलेज, इचलकरंजी मधील  मराठी विभाग व तेजश्री प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रा. सौरभ पाटणकर व प्रा. एफ. एन. पटेल यांनी संपादित केलेल्या ‘मुकुटमणी’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाच्या ऑनलाइन प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी जेष्ठ कवी पाटलोबा पाटील, तेजश्री प्रकाशनाचे दादासाहेब जगदाळे, नाईट कॉलेजचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे व मान्यवर उपस्थित होते. 

तेजश्री प्रकाशनाच्या वतीने काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. या स्पर्धेस मोठा प्रतिसाद मिळाला. कवी पाटलोबा पाटील यांनी परीक्षक मनोगत व्यक्त केले.  तेजश्री प्रकाशनच्या दादासाहेब जगदाळे यांनी प्रकाशनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. तसेच दीपावलीच्या निमित्ताने प्रकाशित होणाऱ्या ‘पद्मरत्न’ या दर्जेदार दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन साहित्यिकांना केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. सदर सोहळा कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गुगल मिट च्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. यात शुभांगी तरडे (सातारा), रामकृष्ण हुदार (स्कॉटलंड), प्रदीप बर्जे (ठाणे), एकनाथ डूमने (नांदेड) अशा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तसेच  परदेशातूनही कवींनी सहभाग घेऊन आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास देशभक्त बाबासाहेब खंजिरे शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी कन्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील, अन्वर पटेल, नाईट कॉलेजचे प्राध्यापक, शिक्षक, कवी व श्रोते उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा. एफ. एन. पटेल यांनी केले. स्वागत प्रा. सौरभ पाटणकर यांनी केले. आभार डॉ. माधव मुंडकर यांनी मानले तर कवी अक्षय इळके यांनी आपल्या सुत्रासंचालनातून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

Post a Comment

Previous Post Next Post