क्रांतिकारक बसवण्णा


प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

(९८५०८ ३०२९० )

prasad.kulkarni65@gmail.co

३० एप्रिलला अक्षय तृतीया तसेच महात्मा बसवेश्वर यांची जयंती आहे. बसवेश्वर उर्फ बसवण्णा यांच्या विचारधारेचा प्रभाव  गेली साडेआठ शतके समाज मानसावर टिकून आहे.याचे मुख्य कारण सार्वकालीन सत्य आणि समाजाला नेहमीच उपयुक्त ठरणारी मूल्ये त्यांनी दिली. त्यांचा जन्म वैशाख अक्षय तृतीयेला ११३१ साली झाला. पूर्वीच्या विजापूर आणि सध्याच्या बागलकोट जिल्ह्यातील बागेवाडी जवळ इंगळेश्वर या गावी एक त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव मादलांबीके वडिलांचे नाव मादीराज होते.बसवेश्वरांचे शिक्षण कुडल संगम येथे शैव विचारांच्या गुरुवर्यांच्या आश्रमात झाले.वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी मौंजी बंधनाच्या संस्कार नाकारला होता. मला आधीच लिंग दीक्षा मिळाली आहे असे म्हणून ते घर सोडून कुडल संगम येथे गेले. विजापूर जिल्ह्यात कृष्णा व मलप्रभा नदीच्या संगमावर हे स्थान आहे. कुडल संगम विद्याक्षेत्राचे स्थानपती जातवेदमुनी( ईशान्य गुरु ) यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे अध्ययन झाले असे मानले जाते. बसवेश्वरांना अक्कनागम्मा ही थोरली बहीण व देवराज मुनीप नावाचा थोरला भाऊ असल्याचाही उल्लेख काही ठिकाणी सापडतो. कुडल संगम येथे त्यांनी वेगवेगळ्या भाषा धर्म तत्वज्ञाने यांचा अभ्यास केला . तसेच त्या ठिकाणी निरनिराळ्या संतांचा सहवास लाभल्याने त्यांचे व्यक्तिमत्व प्रगल्भ बनले.


 बसवेश्वर यांनी प्रस्थापित धर्मव्यवस्था नाकारली. कारण प्रस्थापित व्यवस्थेतील विषमता त्यांना अमान्य होती.लिंगायत ही स्वतंत्र धर्म व्यवस्था त्यांनी निर्माण केली. ही व्यवस्था लिंगभेद ,वर्ण, जातभेद ,वर्ग भेद  विरहित, श्रमाधिष्ठ आणि माणुसकी प्रधान आहे अशी त्यांची भूमिका होती. बसवेश्वर यांनी जे तत्वज्ञान मांडले त्याचा व्यक्तिगत जीवनात काटेकोर स्वीकार केला होता.बसवेश्वर यांनी अनुभव मंटप या लोकशाही पद्धतीने चालणाऱ्या धर्म संसदेची स्थापना केली. राजा बिज्जलांच्या राज्यात मंगळवेढा आणि कल्याणात कारकून ते कोषागार मंत्रीपर्यंत विविध महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले. बसवेश्वरांचे मामा बलदेव हे बिज्जलाचे मंत्री होते. या बलदेवांची मुलगी गंगांबीके ही बसवेश्वरांची पत्नी होती. तर त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव नीलंबिका होते. बालसंंगय हे त्यांच्या मुलाचे नाव  होते असाही उल्लेख काही ठिकाणी आढळतो.त्यांचे भाचे चन्नबसवेश्वर हे त्यांना पुत्रासमान होते. 

अनुभव मंटप या धर्मसंस्थेचे अध्यक्षस्थान त्यांनी बहुरूपी जातीच्या आलमप्रभू यांना दिले.तसेच त्याकाळी त्यांनी चांभार मुलगा व ब्राह्मण मुलगी यांचा आंतरजातीय विवाह घडवून आणला .आंतरजातीय विवाहाचे निमित्त होऊन कल्याणमध्ये सनातन मंडळी व शरणमंडळी यांच्यात युद्ध झाले. त्यातून बसवेश्वरानी कल्याण सोडले आणि कुडल संगम येथे येऊन नदीच्या संगमावर ११९६ साली समाधी घेतली असे मानले जाते. दरवर्षी श्रावण शुद्ध प्रतिपदेला त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते.


जातीयता हा एक मानसिक रोग आहे ही त्यांची भूमिका होती. त्यांच्या अनुभव मंडपात वेगवेगळ्या जातीचे संत होते. उदाहरणार्थ ब्राह्मण मधुवैया ,चांभार हरलय्या, ढोर कक्कया, नावाडी चौंड्या, सुतार बसप्पा, मांग चेन्नय्या , दोरखंड करणारा चांदा,  पारधी संगय्या अशी अनेक उदाहरणे आहेत.एका वचनात बसवेश्वर म्हणतात मी वेदांवर खड्ग चालवीन, शास्त्रांना बेड्या घालीन .बसवेश्वरांनी आपल्या वचनातून लोकप्रबोधनाचे मोठे काम केले. त्यांचा नीती विचार फार महत्त्वाचा आहे.आज जात पात जाणिवा वाढण्याच्या काळात, परजातीचा अनादर करण्याच्या काळात, स्त्रीला भोगवस्तू मानण्याच्या काळात, अनितीचे समर्थन करण्याच्या काळात बसवेश्वरांचा विचार महत्त्वाचा ठरतो. माणसाचे श्रेष्ठत्व तो कोणत्या जातीत जन्माला यावरून नव्हे तर त्याच्या कार्यकर्तुत्वावरून ठरते ही आग्रही भूमिका त्यांनी मांडली. 


शारीरिक श्रम अथवा व्यवसाय हाच खरा स्वर्ग ( कैलास )आहे असे सांगणारा ' काय कवे कैलास हा महान सिद्धांत त्यांनी मांडला. मोक्षासाठी जंगलात तपश्चर्या करायची गरज नाही असे सांगणाऱ्या बसवेश्वरानी शारीरिक श्रमाची प्रतिष्ठा वाढवली. प्रत्येकाने आपल्या श्रमावरच आपली उपजीविका चालवली पाहिजे याबाबत जंगमांचाही अपवाद करू नये असे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या तत्त्वज्ञानात भिक्षावृत्तीला स्थान नाही. श्रमप्रतिष्ठे बरोबरच गरजेनुसार संपत्तीचीही विभागणी करावी असा समाजवादी विचारही त्यांनी त्याकाळी मांडला.

 "चोरी करू नका,, हत्या करू नका, खोटे बोलू नका, रागावू नका, इतरांचा तिरस्कार करू नका ,दुसऱ्याची निंदा करू नका, हीच अंतरंगशुद्धी, हीच बहिरंगशुद्धी, हेच कुडलसंगमदेवाला प्रसन्न करण्याची पद्धत आहे.आयुष्यभर मला शरणांची सेवा करण्याची संधी मिळावी, असे महात्मा बसवेश्वर वचनात सांगतात, "मंदिराचा कळस बनून कावळ्याच्या विष्ठेने अपवित्र होण्यापेक्षा शरणांच्या पायातील पादुका करा, मज कूडलसंगमदेवा.बसववचने हे एक अनुभवजन्य साहित्य आहे. अंधश्रद्धा, कर्मकांड, बुवाबाजी, पुरोहितशाही, काल्पनिक धर्मग्रंथ, जातिभेद, स्त्रीदास्य, श्रम इ. अनेक विषयांवर प्रहार करणारे क्रांतिकारक विचार वचनांत आहेत. महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात श्रमजीवी समाजाची निर्मिती केली. कल्याणच्या अनुभवमंटपात निर्माण झालेल्या वचन साहित्याने कन्नड भाषेला समृद्ध केले. माणसाची जीवन जगण्याची शैली बदलून टाकली.


थोर विचारवंत मानवेंद्रनाथ रॉय यांनी  म्हटले आहे की,' बसवेश्वर हे मध्ययुगीन भारताचे जनक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली बाराव्या शतकाची लिंगायत चळवळ ही सामाजिक क्रांतीची चळवळ होती. भारताच्या सुधारणा कार्याचा तो पहिला स्फोट होता .अशा या समतावादी महात्म्याची विचारधारा प्रत्येकाने समजून घेण्याची गरज आहे. ते सदसदविवेक बुद्धीला चालना  देणारे थोर समाज सुधारक होते, धर्म सुधारक होते, क्रांतिकारक होते. ' मराठी विश्वकोशात म्हटले आहे,"बसवेश्वर यांनी निर्माण केलेली अनुभवमंटप ही संस्था जागतिक धर्मेइतिहासातील  अनन्यसाधारण संस्था होय. वेगवेगळ्या जातीतील व व्यवसायातील भक्त म्हणजे शिवशरण येथे एकत्र जमत आणि विविध विषयांवर चर्चा करीत असत. बसवेश्वरानी धर्मप्रसारासाठी संन्यास घेतला नाही. भाष्ये लिहिली नाहीत व प्रवासही केला नाही.परंतु मंटपातील चर्चेच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये जागृती केली. येथे परिसंवादाच्या  स्वरूपाची जी चर्चा होत असे तीच कन्नड साहित्यामध्ये वचन साहित्याच्या रूपाने प्रसिद्ध झाली..... भारतातील मध्ययुगीन धार्मिक प्रबोधनाच्या चळवळीत बसवेश्वरांचे कार्य अधिक क्रांतिकारक स्वरूपाचे होते व त्यामागे एक अलौकिक द्रष्टेपणा होता हे सर्वमान्य होण्यासारखे आहे.


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post