शिंगणापूर येथे तलवार हल्ल्यातील जखमी वृध्दाचा मृत्यु.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - करवीर तालुक्यातील शिंगणापूर  येथे बुधवारी (ता.२६) रोजी  मुलाने वडिलांवर केलेल्या तलवार हल्ल्यातील जखमी वृध्द पित्याचा उपचार चालू असताना बुधवारी (ता.५) रोजी  सायंकाळी  मृत्यू झाला. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. सदाशिव रामचंद्र तोरस्कर (वय ७८, रा. घर नं ८४, पूरग्रस्त कॉलनी, इंडिया ग्रुप मंडळ, शिंगणापूर) असे या हल्ल्यातील मृत पावलेल्या वृध्दाचे नाव आहे.सदाशिव तोरस्कर हे वृद्ध शिंगणापूर येथे घरात आपला नातू रितेश याच्यासोबत विभक्त राहत होते. त्यांच्या पलीकडच्या २ खोल्यांत त्यांची पत्नी व मुलगा राजेंद्र राहत होते. वीस वर्षापासून राजेंद्रची पत्नी माहेरी विभक्त राहते. त्यामुळे राजेंद्र आपल्या आईसोबत राहतो. वडिलांशी राजेंद्रचे पटत नसल्याने रितेश वडिल सदाशिव तोरस्कर यांचा लाडका असल्याने राजेंद्र व रितेश या बापलेकात वाद होता. या वादाचा परिणाम मोठ्या भांडणात झाला.                  

२६ फेब्रुवारीच्या मध्यरात्री नातू रितेश राजेंद्र तोरस्कर (वय २३) आजोबांसोबत बोलत बसला होता. त्यानंतर रितेश हा झोपण्यासाठी खोलीत गेला असता राजेंद्रने मुलगा रितेश यास तू या घरात राहायचे नाही असे म्हणून मुलग्याशी भांडण करू लागला. त्यावेळी आजोबा सदाशिव यांनी रितेश याच्याशी का वाद घालतोस याची विचारणा करून समजावयाचा प्रयत्न केला. भांडणात मध्ये पडल्याचा राग व जाब विचारल्याच्या रागातून संशयित आरोपी राजेंद्र तोरस्कर याने तू मध्ये का पडतो तुला आता जिवंत ठेवत नाही म्हणून शिवीगाळ करत खोलीत लपवलेली तलवार बाहेर काढून वडील सदाशिव यांच्या डोक्यावर वार केला. घाव वर्मी लागल्याने वडील सदाशिव हे गंभीर जखमी झाले. रितेशने आजोबा जखमी झालेले पाहून वडील राजेंद्रला रोखण्याचा प्रयत्न केला. पण राजेंद्रने मुलगा रितेशलाही तलवारीची मागील मुठ डोक्यात मारत हाताच्या बोटांचा व छातीचा जोराचा चावा घेत रितेशला  जखमी केले. त्यावेळी झालेल्या झटापटीत आरोपीच्या हाताला  दुखापत झाली होती.                   

 जखमींना शेजाऱ्यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. यातील गंभीर जखमी वृद्ध सदाशिव तोरस्कर हे आठ दिवस उपचार घेत होते. आज त्यांचे उपचार सुरू असताना त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.या  गुन्ह्याची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे. आरोपी राजेंद्र तोरस्कर हा पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास करवीर पोलीस करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post