प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : कोथरूडमध्ये संगणक अभियंता आणि भाजप कार्यकर्ता देवेंद्र जोग याला मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणे टोळीवर मोक्का लावण्यात आला. मोक्का लागल्यानंतर काही तासातच गजानन उर्फ गजा मारणेला अटक करण्यात आली आहे.
कोथरूड परिसरातील गजा मारणे टोळीची दहशत मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. नागरिकांनी मारणे टोळीविरुद्ध तक्रार करावी. त्यासाठी गुन्हे शाखेत एक कक्ष सुरू करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे या कक्षाची जबाबदारी सांभाळणार आहेत. तक्रार करणाऱ्या नागरिकांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.
'आका'वरही कारवाई
पोलिसांवर दबाब आणण्याचा प्रयत्न, तसेच गुन्हेगारांना पाठबळ देण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. गुन्हेगारांच्या पाठीशा असणाऱ्या 'आकां'वरही कारवाई केली जाईल. समाज माध्यमात दहशत माजविणाऱ्या चित्रफिती प्रसारित केल्याप्रकरणी मागील वर्षी २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली होती. गुन्हेगारीचे उद्दात्तीकरण केल्यास कठोर कारवाई करू, असेही अमितेश कुमार म्हणाले.
गुंडांनी मुख्य प्रवाहात यावे. चांगली वर्तणूक ठेवल्यास त्यांच्यावर कारवाईचा प्रश्नच येत नाही. मात्र, जे शहरातील कायदा-सुव्यवस्थेला गालबोट लावत आहेत. अशा गुंडांविरुद्ध पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
– अमितेश कुमार, पोलीस आयुक्त