मतदान प्रक्रियेसाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज

मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्रांवर सुविधा  - जिल्हाधिकारी अमोल येडगे

                - 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर :  राज्यात  तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवार 7 मे रोजी होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात असून मतदान प्रक्रिया शांततापूर्ण आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. मतदानाच्या टक्केवारीत कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर राहण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

  जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, ओआरएस, प्रथमोपचार पेटी, सावलीसाठी मंडप, खुर्च्यांची व्यवस्था, दिव्यांगांसाठी रॅम्प, व्हील चेअर आदी सोयी करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर आधारित (थीम बेस) 73 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. तसेच विधानसभा मतदारसंघनिहाय युवा, महिला (पिंक) आणि दिव्यांग मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. 

    विद्यार्थी, शिक्षक, विविध विभाग व सर्वांच्या सहकार्यातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून मतदारांनी मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यात आली आहे. येत्या 7 मे रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदानाची सोय करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कोल्हापूर व  हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

 70, 80 व 85 टक्क्यांहून अधिक मतदान होणाऱ्या मतदान केंद्रांशी संबंधित यंत्रणेला 

रौप्य, कांस्य व सुवर्ण पदक देवून सन्मानित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मतदान करुन मतदानाच्या टक्केवारीत राज्यात व देशात कोल्हापूर जिल्हा अग्रेसर बनवूया असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी केले आहे.

      

Post a Comment

Previous Post Next Post