देशाच्या विकासासाठी मतदान करा - मिलिंद कांबळे

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट येथे युवा संमेलन जल्लोषात संपन्न 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पिंपरी, पुणे (दि. २६ एप्रिल २०२४) - भारतातील तरुणांसाठी सध्या सुवर्णकाळ आहे. सोशल मीडियाचा उत्तम वापर केल्यास अभ्यास, नोकरी, व्यवसाय आणि अन्य क्षेत्रात नावीन्य मिळविता येईल. फक्त त्याच्या आहारी जाऊ नका. देशाच्या विकासात हातभार लावयचा असेल तर मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे मत दलित इंडियन चेंबरचे अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केले.

    'युवकांकडून, युवकांसाठी' असे ब्रीद घेवून, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) येथे २ दिवसीय युवा संमेलनाच्या (युथ कॉन्फरन्स) समोर प्रसंगी कांबळे बोलत होते. पीसीईटी आणि मुख्य निवडणूक कार्यालय महाराष्ट्र, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, निवडणूक साक्षरता क्लब, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीसीईटी इन्फिनिटी ९०.४ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या चर्चासत्रामध्ये पत्रकारिता, युवकांचे मतदानातील योगदान, लोकशाही व चार स्तंभ, राष्ट्र बांधणीतील युवकांची भूमिका या सत्रांचा समावेश होता. यावेळी राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे, वर्शीप अर्थ फाऊंडेशनचे महाराष्ट्र राज्य समन्वयक अल्ताफ पिरजादे, जिल्हा समन्वयक स्नेहल खानोलकर, पीसीईटीचे डिजिटल मार्केटिंग प्रमुख डॉ. केतन देसले आदी उपस्थित होते.

भारत हा तरुणांचा देश आहे आणि हीच आपली मोठी संपत्ती आहे. राष्ट्र उभारणी मधे तरुणांचा खुप मोलाचा वाटा आहे. कोणत्याही क्षेत्राच्या माध्यमातून ते राष्ट्र उभारणी मध्ये योगदान देऊ शकतात. तरुण पिढी मतदानाच्या माध्यमातून चांगली कामगिरी बजावतील अशी खात्री आहे. पीसीईटीने सामाजिक भान ठेवून विद्यार्थ्यांना चर्चासत्रात सहभागी करून घेतले यांचे विशेष कौतुक आहे, असे श्रीकांत देशपांडे म्हणाले.

 पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या हस्ते युवा संमेलनाचे उद्घाटन  करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल जोशी, अण्णा बोदडे यांनी मार्गदर्शन केले. पहिल्या सत्रामध्ये विद्यार्थी वक्ते विराज चतुरे, प्रितेश खोलपकर यांनी मतदान जागृती या विषयावर मत मांडले. मोनिष मैद, श्रीकांत जाधव, ॲड. सुश्रुत कांबळे या विद्यार्थी वक्त्यांनी पत्रकारिता या विषयावर संबोधित केले. पुणे जिल्हा उपजिल्हाधिकारी व स्वीप नोडल अधिकारी अर्चना तांबे, लेखक अरविंद जगताप यांनी  पत्रकारिता व युवकांचे राष्ट्र घडणीतील योगदान यावर मार्गदर्शन केले. 

दुसऱ्या दिवशी क्षितिज नाईक, हर्षवर्धन शिंदे यांनी 'लोकशाही व चार स्तंभ' यावर विचार मंथन केले. दिशा फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. गणेश राऊत, धुळ्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक किशोर काळे, वर्शीप अर्थ फाउंडेशनच्या मुख्य एडिटर कोरीना मॅनुअल, सकल मराठा परिवारचे संस्थापक दिनेश कदम यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सुशांत बालगुडे, प्राजक्ता भांगे, ओमकार उबाळे या विद्यार्थी वक्त्यांनी 'राष्ट्र घडणीत युवकांचा सहभाग' यावर विचार मांडले. कार्यक्रमांची सांगता युथ कॉन्फरन्सच्या 'लोकशाही की लोभशाई' या नाटकाने झाली. डॉ. केतन देसले यांनी कार्यक्रमाचा आढावा घेतला. 

   पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अल्ताफ पिरजादे, स्नेहल खानोलकर, विद्यार्थी प्रतिनिधी अभिजित बनसोडे, गौरव आरकास, स्वराज बांगर, सचिन गिरवले, अथर्व जाधव यांनी आयोजनात सहभाग घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post