राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण करून घेण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश

 मुद्रित माध्यमांमध्ये मतदानाच्या दिवशी व एक दिवस आधी तर इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी सर्व जाहिरातींसाठी करावे लागणार पूर्व प्रमाणिकरण


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर, : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे अनुषंगाने मा.आयोगाने राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण करून घेण्याचे निर्देश राजकीय पक्ष व उमेदवारांना दिले असून मुद्रित माध्यमांमध्ये मतदानाच्या दिवशी व एक दिवस आधी तर इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी सर्व कालावधीत सर्व जाहिरातींसाठी पूर्व प्रमाणिकरण करावे लागणार आहे. मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवस पुर्वी मुद्रित माध्यमांमधुन कोणत्याही भडकाऊ, दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातीमुळे कोणतीही अप्रिय घटना घडु नये, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खीळ बसेल अशा जाहिराती प्रकाशीत होऊ नये याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. पूर्व प्रमाणिकरण आणि परवानगी आरपी अॅक्ट १९५१ च्या कलम १२७ ए आणि १२६ (१) अन्वये होते. मतदानादिवशी व मतदानाच्या एक दिवस अगोदर प्रिंट माध्यमाद्वारे प्रकाशित केलेल्या, जाहिरातीचे पूर्व प्रमाणिकरण न झाल्याचे माध्यम सनियंत्रण समितीला आढळल्यास तक्रार दाखल करण्यात येते व त्या जाहिराती पेड न्यूज अंतर्गत नोंदविल्या जातात.

इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे टिव्ही, रेडिओ/एफएम, केबल टिव्ही, सोशल मीडिया, बल्क मेसेज, व्हॉइस मेसेजेस, सार्वजनिक ठिकाणी स्क्रीनद्वारे केलेली ऑडिओ/व्हिडीओ प्रसिद्धी, ईपेपर, सिनेमा हॉल, इंटरनेट आणि सोशल मीडिया यांचा समावेश होतो. सामाजिक माध्यमावरील जाहिरातींचे देखील प्रमाणिकरण आवश्यक असून वृत्तपत्रांच्या ई- आवृत्यांमधील जाहिराती आणि व्हर्चुअल प्रचाराचाही समावेश होतो. स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केलेला संदेश, प्रतिक्रीया, छायाचित्र, व्हीडीओ राजकीय जाहिरात समजण्यात येणार नाही. त्यामुळे त्यासाठी पूर्व प्रमाणिकरणाची आवश्यकता नाही. मात्र क्रियेटीव्ह ऑडिओ/व्हिडीओ राजकीय संदेश जाहिरात स्वरूपात तयार करून ती पोस्ट बूस्ट केली तर त्याची परवानगी आवश्यक आहे. 

जाहिरात संहितेनुसार पुढील प्रकारच्या जाहिरातीस प्रतिबंध घालण्यात आला आहे. यात इतर देशांवरील टीका, धर्म किंवा समुदायांवर हल्ला, काहीही अश्लील किंवा बदनामीकारक, हिंसाचाराला उत्तेजन देणे, न्यायालयाचा अवमान करणारी कोणतीही बाब, राष्ट्रपती आणि न्यायपालिकेच्या सचोटीबद्दल आक्षेप घेणे, राष्ट्राची एकता, सार्वभौमत्व आणि अखंडता प्रभावित करणारी कोणतीही बाब, कोणत्याही व्यक्तीच्या नावाने कोणतीही टीका, निवडणूक प्रचार करताना वापरण्यात येणाऱ्या संगीत किंवा पोस्टरमध्ये मंदिर-मशीद-चर्च-गुरुद्वारा किंवा कोणत्याही प्रार्थनास्थळांचा वापर करता येणार नाही. संरक्षण खात्यातील कर्मचाऱ्यांची छायाचित्रे आणि संरक्षणाशी संबंधित कार्यांची छायाचित्रे घेता येणार नाहीत. नेत्यांच्या व इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांवर सार्वजनिक उपक्रमांशी संबंधित नसलेली, खाजगी जीवनाशी निगडीत कोणत्याही बाबींवर टीका करता येणार नाही. असत्यापित आरोप व विकृतीवर इतर पक्ष किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांवर टीका करता येणार नाही.

इलेक्ट्रॉनिक मीडिया साठी जाहिरात प्रसारणापूर्वी ३ दिवस अगोदर प्रमाणिकरणासाठी अर्ज सादर करावा. अर्ज दाखल केल्यानंतर २ दिवसात म्हणजेच ४८ तासात त्यावर निर्णय देण्यात येणार आहे. नोंदणीकृत पक्ष नसेल किंवा उमेदवार नसलेल्या इतर व्यक्तीस प्रसारणापूर्वी ७ दिवस अगोदर अर्ज करावा लागेल. मतदानादिवशी व मतदानच्या अगोदरच्या दिवशी प्रिंट माध्यमाद्वारे प्रकाशित होणाऱ्या राजकीय जाहिरातीचे पूर्वप्रमाणिकरण करण्यासाठी २ दिवस अगोदर अर्ज सादर करावा. राजकीय जाहिरातींच्या पूर्व प्रमाणिकरणासाठी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. यात जाहिरात निर्मिती खर्च तपशील, जाहिरातीची संहिता व व्हिडीओची कॉपी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात दोन प्रतीत, जाहिरात प्रसारण खर्च व कालावधी, उमेदवार किंवा पक्षाचे नाव, स्वतंत्र व्यक्ती असल्यास प्रतिज्ञापत्र आवश्यक, सर्व खर्च ड्राफ्ट, चेकद्वारे करण्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे. राजकीय जाहिरातींच्या पूर्व प्रमाणिकरणासाठी कोल्हापूर जिल्हा माध्यम कक्ष कार्यालय हे नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालयात सांख्यिकी कार्यालयाजवळ, दुसऱ्या मजल्यावर आहे.


Post a Comment

Previous Post Next Post