सामाजिक उन्नतीतच मुक्ती आहे असे आंबेडकर म्हणत होते - प्रसाद कुलकर्णी यांचे मत

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

जयसिंगपूर ता. १४ राजकीय सत्ता हे औषध नाही तर सामाजिक उन्नतीतच मुक्ती आहे. लोकशाहीमध्ये रक्तपाताविना समता नांदू शकते.समता केवळ राज्यघटनेत नव्हे तर व्यवहारात असली पाहिजे. आपली सामाजिक राजकीय वाटचाल प्रतिनिधिक लोकशाही कडून सहभागी लोकशाही कडे झाली पाहिजे ही डॉ.आंबेडकरांची भूमिका होती.डॉ.आंबेडकरांनी आपल्या चळवळीत सैद्धांतिक व व्यावहारिक रणनीतीला महत्व दिले. सत्तेच्या अमिषापोटी येणाऱ्या मूल्यहीनतेला विरोध केला.आपली चळवळ हा दीर्घकालीन लढा आहे याचे भान त्यांना होते. समता-समाजवाद हे विचार जसे आर्थिक आहेत तसे नैतिकही आहेत असे मानणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक स्तरावरचे प्रगल्भ नेतृत्व होते. समतेचे मूल्य जनमानसात रुजवण्यासाठी आयुष्यभर परिश्रम करणाऱ्या डॉ. आंबेडकरांचे जीवन हा एक गतिमान संघर्ष होता ,असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वैशाली बुद्ध विहार (जयसिंगपूर ) येथे  "सामाजिक नेतृत्वातील आदर्श:डॉ.बाबासाहेब आंबेडकर " या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ.चिदानंद आवळेकर होते. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते निल ध्वजारोहण, दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. भदंत डॉ. यशकश्चपायन महाथेरो यांनी मार्गदर्शन केले व सामूहिक वंदना दिली. रमेश कांबळे यांनी स्वागत केले प्रा. डॉ.धनंजय कर्णिक यांनी प्रास्ताविक केले.प्रा. डॉ.प्रवीण चंदनशिवे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.


प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले, निसर्गालाच वर्ग,जाती, विषमता मान्य नाही. ती मनुष्यनिर्मित आहे.मागणारा आणि देणारा वेगवेगळे ठेवण्यात प्रस्थापितांचे हित असते.कोणतीही चळवळ समाजाच्या सामाजिक-आर्थिक प्रश्नातूनच आकार घेत असते हे बाबासाहेबांनी ओळखले होते. त्यांची चळवळ विध्वंसक नव्हे तर नव्या समाज व्यवस्थेची, नव्या जीवनमूल्यांची भूमिका मांडत होती. राजकारणात क्रांतिकारी आणि सामाजिक-धार्मिक क्षेत्रात सनातनी भूमिका घेता येणार नाही हे त्यांनी ठामपणे सांगितले. दलित समाजाचे प्रश्न  दिव्यांगांच्यासारखे केवळ शारीरिक नाहीत तर त्याची पाळेमुळे सामाजिक, आर्थिक ,शैक्षणिक, सांस्कृतिक व्यवस्थेत आहेत हे ओळखून त्यांनी  भूमिका घेतली होती. विषमतेची निर्मिती करणारी मनुस्मृती जाळून समतेची प्रस्थापना करणारी भारतीय राज्यघटना बाबासाहेबांनी दिली.समाज परिवर्तनासाठी संघटना निर्माण करायची असेल तर ती बुद्ध विहारातच तयार होऊ शकते, बुहा कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर बुद्ध संस्कार मंडळ, रमाई उपासिका संघ, नालंदा सार्वजनिक ग्रंथालय ,पंचशील नागरी सहकारी पतसंस्था, सर्व बहुजन समाज- सामाजिक संस्था व तरुण मंडळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता.बुद्ध विहारांची नवी देवळे होऊ नयेत ,तिथे अंधश्रद्धा नांदू नये असे त्यांनी निक्षून सांगितले होते.बाबासाहेबांचे समाजकारण व राजकारण हे भारताला सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून जगात सन्मानाने उभे करण्यासाठीचे होते.

अध्यक्ष मनोगतात डॉ.चिदानंद आवळेकर म्हणाले , डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेतून आपण सर्वांनी बोध घेऊन वाटचाल करण्याची गरज आहे. वर्तमानातील राजकारण व समाजकारण त्यांच्या विचारापासून पद्धतशीरपणे दूर नेले जात आहे. भारतीय  राज्यघटनेचे तत्त्वज्ञान बाजूला करून विषमतावादी समाज निर्माण करण्याचे एक षडयंत्र रचले जात आहे. हा धोका ओळखून उज्वल भविष्यासाठी व येणाऱ्या पिढ्यांसाठी आंबेडकरी विचाराची प्रस्थापना करण्याचे काम करण्याची आंबेडकरी कार्यकर्त्यांची मोठी जबाबदारी आहे.आभार व सूत्रसंचालन सुनील आलासकर यांनी केले.हा कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर बुद्ध संस्कार मंडळ, रमाई उपासिका संघ, नालंदा सार्वजनिक ग्रंथालय ,पंचशील नागरी सहकारी पतसंस्था, सर्व बहुजन समाज- सामाजिक संस्था व तरुण मंडळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता. कार्यक्रमास मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post