स्वामी दयानंद सरस्वती



प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

( ९८ ५०८ ३० २९० )

Prasad.kulkarni65@gmail.com

स्वामी दयानंद सरस्वती यांचे दोनशेवे जन्मवर्ष नुकतेच साजरे झाले. गुजरात मधील मोरबी जिल्ह्यातील टंकारा या गावी या दोनशेव्या  जयंतीच्या सोहळा झाला. त्याला मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे संबोधित केले होते. त्यात स्वामी दयानंद सरस्वती केवळ वैदिक कृषी नव्हते तर राष्ट्रचेतनेचे ऋषी होतेअसे प्रतिपादन केले. या दोन शेवया जन्मावरच्या निमित्त स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ विचार नेमकेपणाने समजून घेण्याची गरज आहे. ते म्हणतात ' जो निप:क्षपाती आहे, जो न्याय व समानता शिकवतो, जो विचार -वाणी व कृती यांच्यात सत्यता राखायला शिकवतो त्याला मी धर्म म्हणतो.'


 स्वामी दयानंद सरस्वती म्हणजे एकोणिसाव्या शतकातील एक प्रमुख धर्म सुधारक होते. इंग्रजी राजवट स्थिरावल्याच्या आणि समाजात वैफल्याचे आणि पराभवाचे समाजकारण प्रस्थापित झाले होते त्या काळात हिंदू धर्मात आणि समाजात सुधारणा करण्यासाठी त्यांनी ' आर्य समाज 'या संस्थेची १० एप्रिल १८७५ रोजी स्थापना केली.' सत्यार्थ प्रकाश ' हा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचा हेतू  स्पष्ट करताना त्यांनी म्हटले आहे ,' हा ग्रंथ लिहिण्याचा माझा मुख्य उद्देश हाच आहे की सत्य अर्थाचा प्रकाश करावा. अर्थात जे खरे आहे त्याला सत्य व जे खोटे आहे त्याला असत्य ठरवणे हा माझा मुख्य उद्देश आहे. आणि यालाच मी सत्य अर्थाचा प्रकाश समजत आहे .'१२ फेब्रुवारी १८२४ ला जन्मलेले स्वामी दयानंद सरस्वती ३० ऑक्टोबर १८८३ रोजी कालवश झाले.

स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म गुजरात मधील टंकारा या गावी एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव मूळशंकर होते. अर्थातच तत्कालीन समाज परिस्थितीनुसार त्यांच्या घरचेही वातावरण धार्मिक होते.त्यांचाही लहान वयात स्वाभाविकपणे मूर्तीपूजेवर विश्वास होता. पण एकदा शंकराच्या पिंडीवर उंदीर उड्या मारताना पाहून त्यांच्या विचारात चिकित्सा निर्माण झाली. सत्य काय ?हा प्रश्न त्यांना भेडसावू लागला. लग्नाच्या आणि संसाराच्या बंधनात अडकायचे नसल्यामुळे त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षी ते सत्याच्या शोधासाठी घराबाहेर पडले. देशभर फिरले आणि त्यांनी मथुरा येथील वज्रानंद स्वामी यांचे शिष्यत्व पत्करले. आणि अध्ययन सुरू केले

स्वामी दयानंद सरस्वतीनी हिंदू धर्मग्रंथांचा ,वेदांचा अतिशय सखोल अभ्यास केला.आपल्या वैदिकग्रंथातच सर्व ज्ञानाचा उगम आहे यावर त्यांची श्रद्धा होती.मूर्तीपूजेत आणि कर्मकांडात रुतलेल्या हिंदू धर्माचे पुनर्जीवन झाले पाहिजे असे ते म्हणत. त्यांच्या मते बुद्धपूर्व काळातील हिंदू धर्मात कर्मकांडाचे स्तोम नव्हते. विषमतेला जोपासणारी जाती व्यवस्था नव्हती.यज्ञात प्राणी हत्या केली जात नव्हती. धार्मिक विधीना उत्सवाचे स्वरूप नव्हते .वैदिकधर्म हे धर्मतत्त्वाचे एक श्रेष्ठ रूप आहे. उच्च धर्माचे ज्ञान वेदातच साठवलेले आहे असे त्यांचे मत होते. त्यांच्या मते जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था ही जन्मावर नाही तर गुणावर ,कर्मावर आधारित असते. ऋषी परंपरेने आलेली ही व्यवस्था अतिशय योग्य आहे. तसेच मूर्तीपूजा निशिद्ध आहे असे सांगत ते म्हणतात,परमेश्वर सर्वव्यापक असताना त्याची एका वस्तूच्या ठिकाणी भावना ठेवणे हे अज्ञानाचे द्योतक आहे. दगडासारख्या जड वस्तूची पूजा ,अभिषेक करून मनुष्याचे ज्ञान कसे वाढेल ?असा खडा सवाल त्यांनी केला. ज्ञानी माणसाच्या संगतीनेच आपले ज्ञान वाढते असे ते म्हणत. तसेच स्त्रियांचा उद्धाराचाही त्यांनी विचार मांडला. दुष्ट रूढी परंपरांनी स्त्री अबला आणि परतंत्र बनवली असून तिचे जीवन करुणास्पद बनवले आहे. धार्मिक व सामाजिक परंपरांनी तिचे जीवन शृंखलाबद्ध केले आहे. त्या शृंखला तोडल्या पाहिजेत असे आनंद सरस्वती म्हणतात.

स्वामी दयानंद सरस्वती सामाजिक अवनतीची मीमांसा करताना म्हणतात,' वेदानंतरच्या काळात हिंदू धर्मात कर्मकांड शिरले. ज्ञानाचे पावित्र्य आणि माणुसकी लोक पावत गेली. जातीभेद वाढत गेले. स्त्रिया आणि दीनदलितांवर अन्याय होऊ लागल. कर्मठपणा वाढला. अस्पृश्यता निर्माण झाली.हिंदू समाज रुढीग्रस्त बनला. धार्मिक कर्मकांडाचे स्तोम माजले.मूर्तीपूजेचे महत्त्व वाढले. समाजाची एकात्मता संपली. आणि त्यामुळे विकास थांबला. त्याचा फायदा भारताबाहेरून आलेल्या शक्तींनी , धर्मप्रसारकांनी घेतला.'

स्वामी दयानंद सरस्वती यांनी नामस्मरण आणि जपमाळ यालाही तीव्र विरोध केला.ते म्हणतात की, नुसता मंत्र म्हणून किंवा नाम जपून ईश्वराचा अनुभव येत असला तर ते' साखर ' शब्द पुन्हा पुन्हा म्हणत राहिल्याने तिची गोडी प्रत्यक्ष चाखायला मिळण्यासारखे ठरेल.लाख वेळा साखर हा शब्द उच्चारला तरी त्यामुळे जिभेला जशी तिची गोडी चाखायला मिळत नाही. तसेच केवळ लाखो वेळा देवाचे नाम घेण्याने त्याचा साक्षात्कार होऊ शकत नाही.  मंत्र, जपजाप्य, तीर्थयात्रा, पवित्र स्नान, गंध टीळा लावणे, उपवास करणे हा खरा धर्म नाही व त्यातून आध्यात्मिक विकास काडीचाही होत नाही हे सांगितले.

स्वामी दयानंद सरस्वतीनी जातीभेदाला ,कर्मठपणाला विरोध केला. राष्ट्रीय जागृती आणि व्यक्तीचा विकास यासाठी उत्तम धर्माच्या शिक्षणाची आवश्यकता आहे हे ओळखून त्यांनी शिक्षण प्रसाराचे कार्य केले.राष्ट्रीय ऐक्य वाढीस लागावे म्हणून हिंदी भाषेचा त्यांनी पुरस्कार केला. 'सत्यार्थ प्रकाश ' या ग्रंथात त्यांनी आपले धर्मविचार मांडले आहेत.त्यांच्या मते,' वैदिक धर्मानुसार केलेली धार्मिक कृत्ये व संस्कार साधे असतात. त्यात उधळपट्टी व अवडंबर नसते.वेदांचे अध्ययन करावे, मूर्तिपूजा त्याज्य मानावी , जातीभेदाला स्थान देऊ नये.आश्रमधर्म पाळावा.सतशील संपादन करावे.प्रा.डॉ.ग. ना.जोशी' लिखित ' भारतीय तत्त्वज्ञानाचा बृहद इतिहास खंड ९ ' या ग्रंथात म्हटले आहे की,' सत्यात असत्य बरेच मिसळलेले असते व असत्यालाच काही लोक सत्य समजतात व सत्य आहे असे भासवतात. त्यात योग्य विश्लेषण करून, विवेक करून, चाळणी लावून व दुराग्रहाला बळी न पडता शुद्ध बुद्धीने जर अर्थ समजला तर तो इतरही बुद्धीने विचार करणाऱ्यांना पटू शकतो व पटवून देता येतो. म्हणून मूळ ग्रंथातील विचारांचाही चिकित्सक व साक्षेपी रीतीने अभ्यास करणे आवश्यक ठरते. सत्यार्थ प्रकाश या ग्रंथात दयानंदानी आणि सत्यासत्यनिर्णय करून स्वतःला निर्दोष वाटणाऱ्या मतांचा पुरस्कार केला आहे.आणि इतरांनी त्याचा स्वीकार करावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. दयानंदाना इंग्रजी भाषेचे ज्ञान नव्हते व त्यांनी इंग्रजी शिक्षण घेतले नव्हते. पण त्यांना अनुभव ,निरीक्षण, प्रयोग ,परीक्षण, बुद्धिनिष्ठ, विकाररहित विश्लेषण या मार्गाने तयार झालेले वैज्ञानिक ज्ञान मान्य होते. तेही स्वतः या पद्धतीचा अवलंब करत.पण त्यांच्या वेदांवरील असामान्य प्रेमामुळे हे सर्व वैज्ञानिक ज्ञान वेदांमध्ये आधीच सांगितलेले आहे असे ते आग्रहाने मांडत.'

आपल्या शिकवणूकीच्या प्रसार व प्रचारासाठी आणि धर्म आणि समाज सुधारण्याच्या कार्यासाठी स्वामी दयानंद सरस्वतीनी देशभर प्रवास केला, हजारो व्याख्याने दिली. त्यांना अनेक  अनुयायी लाभले हे जेवढे खरे तेवढाच त्यांना अनेकांनी विरोधही केला. कारण त्यांचे मूर्ती पूजा विरोधाचे, जातीभेद निर्मूलनाचे, धर्म स्वच्छ करण्याचे विचार कर्मठाना आणि सनातन्याना मानवणारे नव्हते. त्यामुळे त्यांचा जोधपुर मध्ये मृत्यू सुद्धा संशयास्पद रीतीने झाला. त्यांचे विचार न पटणाऱ्यांनी त्यांच्यावर वविष प्रयोग केला असावा असे मानले जाते. कर्मठ सनातन्याप्रमाणे ख्रिश्चन व मुस्लिम धर्ममार्तंड यांचाही त्यांना विरोध होता.कारण स्वामी दयानंद सरस्वती त्यांच्या धर्मप्रसार कार्यावर कडक टीका करत. पारतंत्र्याच्या काळात लोकशाही व्यवस्था आणि विकेंद्रित शासन व्यवस्थेचा पुरस्कार त्यांनी केलेला होता.एकोणिसाव्या शतकात धर्मसुधारणा आणि समाज सुधारणा यामध्ये स्वामी दयानंद सरस्वतीनी जे प्रयत्न केले त्याची दखल पुढील कित्येक पिढ्यांना घ्यावीच लागेल यात शंका नाही.


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post