अवधान अभ्यास आणि अवलंबन या त्रिसूत्रीने भाषा समृद्ध होईल

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. हिमांशू स्मार्त यांचे प्रतिपादन 


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर ता.२७ , आपल्या विचार विश्वातील भाषा शाश्वत, दीर्घायु व्हायची असेल तर तिला अवधान दिले पाहिजे,तिचा अभ्यास केला पाहिजे आणि तिचे अवलंबनही केले पाहिजे .या तीन स्तरावर भाषा सोबत ठेवली तर आणि तरच भाषा नावाच्या व्यवस्थेवर आपण प्रेम करू शकतो. अवधानाचे अमृत घालून आकलनाचा वृक्ष वाढवणे फार महत्त्वाचे आहे. अवलंबन म्हणजे भाषा वापरणे. अवलंबनाच्या स्तरावर आपण अनावधानी झालो आहोत. त्यासाठी मराठीचा अभ्यास साहित्य केंद्री व साहित्य हे स्पष्टीकरण केंद्री होत चालले आहे त्यामध्ये बदल केला तर मराठी भाषा ज्ञानभाषा होईल यात शंका नाही,असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. हिमांशू स्मार्त यांनी व्यक्त केले.ते

जिल्हा मराठी भाषा समिती कोल्हापूर ,जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि रयत शिक्षण संस्थेचे राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज कोल्हापूर मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त 'मराठीला आपण काय दिले ? ' या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.प्राचार्य डॉ.एल.डी.कदम अध्यक्षस्थानी होते. कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी व मराठी भाषा समितीच्या सचिव अपर्णा वाईकर यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. तसेच पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी मंचावर मराठी भाषा समितीचे सदस्य प्रसाद कुलकर्णी, उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.एस.जे. आवळे यांची उपस्थिती होती.यावेळी प्रा.विष्णू शिंदे यांच्या ' डांगोरा ' कादंबरीचे प्रकाशन डॉ . हिमांशू स्मार्त यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच प्रा.डॉ. संजीवनी तोफखाने,प्रा.डॉ. सुप्रिया आवारे , प्रा.डॉ.विनोद कांबळे, प्रा.डॉ.शशिकांत अन्नदाते,प्रा.गौतम जाधव ,गौरी भोगले , जयश्री दानवे या साहित्यिकांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


प्रा. डॉ.  हिमांशू स्मार्त म्हणाले भाषेबाबत चिंतेचा सूर लावण्यात अर्थ नाही. भाषेवर प्रेम करणे फार महत्त्वाचे आहे. भाषेचा अभिमान बाळगणे आणि प्रेम करणे यात फरक आहे. अभिमानाने घोषणा देता येतील पण आपण भाषे बाबतची आस्था बाळगणे महत्त्वाचे आहे. माणसाचे वेगळेपण त्याच्या भाषेमुळे, अभिव्यक्ती मुळे आहे. अनेकदा अर्थापेक्षा श्रावणातून आनंद मिळतो. शब्दांमुळे जीवनात दिवा प्रज्वलित होऊन आकलन होत असते. भाषा समृद्ध करायची तर भाषांतराची निरक्षरता टाळली पाहिजे .मराठी भाषा श्रवणाच्या सुखातून उत्पन्न झाली आहे. तिच्यावर कुरुपतेचे डाग आपण लावू नयेत. भाषेचे आनंदाने सेवन केले पाहिजे .भाषा अर्थाप्रमाणे अवस्था सूचित करत असते.आपण शब्द फार ढीसाळपणे वापरतो.खरंतर शब्द एकांतात म्हटला की त्यातील नादमयता, लक्षवेधकता कळते. सर्वांगीण समृद्धीच्या शाश्वतीसाठी भाषा टिकली व संवर्धित झाली पाहिजे. मराठी आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला पाहिजे.प्रा. डॉ.  हिमांशू स्मार्त यांनी आपल्या व्याख्यानामध्ये ' मराठीला आपण काय दिले ?'याची अतिशय विस्तृत व सखोल मांडणी केली.


अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.एल.डी.कदम म्हणाले, मराठी भाषा हा मराठीचा स्वाभिमान आहे .प्राचीन काळापासून मराठी भाषा संपन्न होत गेलेली आहे.संत साहित्यापासून आजच्या साहित्यापर्यंत मराठी भाषेने प्रभावीपणे काम केलेले आहे. आपण मराठीत सातत्याने बोलून मराठी भाषेचे जतन केले पाहिजे. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे अधिकारी उत्तम कारंडे यांच्यासह महाविद्यालयातील अध्यापक, अध्यापिका व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसाद कुलकर्णी यांनी आभार मानले. प्रा. रणदिवे यांनी सूत्रसंचलन केले.

Post a Comment

Previous Post Next Post