जनतेचा प्रगाढ विश्वास व सत्ताधाऱ्यांवर नैतिक धाक ही एन.डी. यांची वैशिष्ट्ये होती -.प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन


प्रेस मीडिया लाईव्ह :

कराड  :  सर्वसमावेशक असलेल्या भारतीय संस्कृती पासून जगातील सर्वाधिक महत्त्वाचा तत्वग्रंथ असलेल्या भारतीय राज्यघटनेने सांगितलेल्या  सर्वांगीण समतावादी व्यापक मानवी मूल्यांची  सार्वत्रिक घसरण वेगाने सुरू आहे.

अशा अस्वस्थ वर्तमानात अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या आणि सत्याचे अधिष्ठान अग्रक्रमावर ठेवत सर्वसामान्यांच्या उन्नतीचे राजकारण व समाजकारण करणाऱ्या lज्येष्ठ नेते विचारवंत प्रा.एन.डी.पाटील यांची तीव्रतेने उणीव जाणवते. जनतेला विश्वास आणि सत्ताधाऱ्यांना नैतिक धाक असणारे ते महाराष्ट्राचे बुलंद नेते होते. एन.डी.पाटील हे विषमता रहित समाज निर्मितीसाठी बुद्धीप्रामाण्यावर आधारित कृतीशील कार्य करणारे ते होते.त्यांच्या विचारांवर आधारीत वाटचाल करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते रयत शिक्षण संस्थेच्या सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज ( स्वायत्त महाविद्यालय ) येथे प्रा.डॉ. एन. डी. पाटील द्वितीय स्मती दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. 

रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ऍड .रवींद्र पवार होते. प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी मंचावर उपप्राचार्य प्रा .एस..ए .पाटील, प्रा.एन आर. सूर्यवंशी, कार्यक्रमाचे संयोजक प्रा. डॉ.दिलीपकुमार कसबे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कालवश प्रा. डॉ.एन. डी. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी बोलताना प्रसाद कुलकर्णी म्हणाले,एन.डी. पाटील हे महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर तब्बल साठ वर्षे महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक , प्रबोधन परिवर्तनवादी, शेतकरी कष्टकरी आदी सर्व चळवळींचे सर्वमान्य एकमुखी नेतृत्व होते. रस्त्यावरच्या लढाईपासून विधानसभा आणि विधान परिषदेत त्यांनी सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आयुष्य खर्ची घातले. छत्रपती शिवाजी महाराज ते कर्मवीरअण्णा ,कार्ल मार्क्स ते गाडगेबाबा, महात्मा फुले ते डॉ. आंबेडकर, महात्मा गांधी ते महर्षी शिंदे अशा सर्व महामानवांच्या विचारांचा लसावी काढत एन डी पाटील समर्थपणे वाटचाल करीत राहिले. त्यातून रंजलेल्या गांजलेल्यांच्या जीवनात प्रकाश पेरण्याचे काम केले. त्यांच्यासारखा प्रबोधकांचा प्रबोधक महाराष्ट्राच्या विचार परंपरेत दुर्मिळ आहे. अशा या थोर विचारवंत नेत्या कडून प्रेरणा घेऊन आपण वाटचाल केली तर आपला व्यक्तिगत आणि सामाजिक भवताल समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तशी आपण वाटचाल करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या ओघावत्या शैलीतील भाषणामध्ये एन.डी.पाटील यांचे व्यक्तिमत्व व कार्य कर्तृत्व याची सखोल मांडणी केली. तसेच एन. डी .पाटील या बुलंद नेत्याच्या मागे खंबीरपणाने उभे असलेल्या त्यांच्या अर्धांगिनी सरोजमाई पाटील यांच्या योगदानाचाही आवर्जून उल्लेख केला.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना ऍड .रवींद्र पवार म्हणाले, प्रा. डॉ. एन.डी. पाटील हे बोले तैसा चाले असे व्यक्तिमत्व होते.वीज दरवाढीच्या प्रश्नांपासून शिक्षणाच्या बाजारीकरणापर्यंत आणि सेझ पासून शेतीच्या किमान हमीभावापर्यंत अनेक लढे त्यांनी लढवले. समाजाच्या उत्थानासाठी लढणे हे त्यांचे जीवन व्रत होते. त्यांचे ते योगदान लक्षात घेऊन आज आपण वाढती धर्मांधता ते शिक्षणाचे बाजारीकरण अशी सर्व क्षेत्रात जी आव्हाने उभी राहिली आहेत त्यांना भिडण्याची ताकद त्यांच्या विचारातून आपण घेतली पाहिजे. या व्याख्यानास महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रा. डॉ.दिलीपकुमार कसबे यांनी आभार मानले.प्रा. डॉ.प्राजक्ता निकम यांनी सूत्रसंचालन केले.

Post a Comment

Previous Post Next Post