मूकनायकचा वर्धापन दिन


प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

( ९८ ५०८ ३० २९० )

Prasad.kulkarni65@gmail.com

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ३१ जानेवारी १९२० रोजी ' मूकनायक 'हे वृत्तपत्र सुरू केले.त्याचा आज १०४ था वर्धापन दिन आहे. डॉ.आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत (१९२७) , जनता (१९३०), प्रबुद्ध भारत ( १९५६ )अशी चार वृत्तपत्र सुरू केली. जनताचे नाव पुढे प्रबुद्ध भारत असे करण्यात आले.डॉ.आंबेडकरांच्या एकूण चळवळीत त्यांनी काढलेल्या वृत्तपत्रांचे योगदान मोठे आहे. मूकनायक हे तर त्यांचे पहिले वृत्तपत्र.ते फार काळ चालले नाही आणि त्याचे सर्व अंक उपलब्ध होऊ शकले नाहीत हे खरे. पण त्याचे महत्त्व निश्चितच मोठे आहे. त्यामुळे त्याच्या वर्धापन दिनी त्याची नोंद घेणे महत्त्वाचे आहे.

मूकनायक चा पहिला अंक ३१ जानेवारी १९२० रोजी प्रकाशित झाला. या अंकाला राजर्षी शाहू महाराजांनी अडीच हजार रुपयांची मदत केली होती. त्याची टपाल खर्चासह वार्षिक वर्गणी अडीच रुपये होती .त्या काळात केसरी ,सुधारक, काळ ,ज्ञानोदय ,ज्ञानप्रकाश , दीनमित्र, जागरूक ,डेक्कन रयत,विजयी मराठा ,सुबोध पत्रिका आडी वृत्तपत्रे मराठीत निघत होती.पण तरीही स्वतंत्र वृत्तपत्र काढावे असे आंबेडकरांना का वाटले याची कारण मीमांसा त्यांनी पहिल्या अंकात केलेली आहे.

काय करू आता धरूनिया भीड !निशंक हे तोंड वाजविले !! नव्हे जगी कोणी मुकियांचा जाण ! सार्थक लाजून नव्हे हीत !! हा संत तुकारामांचा अभंग मूकनायकच्या  शिरोभागी छापला जायचा. डॉ. आंबेडकर यांनी पहिल्या अंकातील मनोगतात म्हटले होते ,'हिंदू धर्मियात असलेली ही विषमता जितकी अनुपम आहे तितकीच ती निंदास्पदही आहे.कारण विषमतेवरून होणाऱ्या व्यवहाराचे स्वरूप हिंदू धर्माच्या शिलाला शोभण्यासारखे खास नाही. हिंदू धर्मात समाविष्ट होणाऱ्या जाती उच्च नीच भावनेने प्रेरित झाल्या आहेत हे उघड आहे. हिंदू समाज हा एक मनोरा आहे व एकेक जात म्हणजे त्याचा एक एक मजलाच होय. पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की या मनोऱ्याला शिडी नाही .आणि म्हणून एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्याला मार्ग नाही. ज्या मजल्यात ज्यांनी जन्मावे त्याच मजल्यात त्यांनी मरावे.खालच्या मजल्यातला इसम मग तो कितीही लायक असो त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाही. आणि वरच्या मजल्यातला माणूस मग तो कितीही नालायक असो त्याला खालच्या मजल्यात लोटून  देण्याची कोणाची प्राज्ञा नाही.

या मनुष्यनिर्मित उतरंडीची बुरखाफाड करण्यासाठी आणि मूक असलेल्यांचा आवाज होण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी मूकनायकच्या पहिल्या अंकात वर्तमानाची सर्व मीमांसा करून ते म्हणतात....."  विविध पत्रातून बहिष्कृत समाजाच्या प्रश्नांची चर्चा होते. पण ब्राह्मणेतर या अवडंबर संज्ञेखाली मोडत असलेल्या अनेक जातींच्या प्रश्नांचा ज्यात खल होतो, त्यात बहिष्कृतांच्या प्रश्नांचा सांगोपांग उहापोह होण्यास पुरेशी जागा मिळणे शक्य नाही हेही उघड आहे. त्यांच्या अतिबिकट स्थितीशी संलग्न असलेल्या प्रश्नांची वाटाघाट करण्यास एक स्वतंत्र पत्र पाहिजे हे कोणीही कबूल  करील. ही उणीव भरून काढण्यासाठी या पत्राचा जन्म झाला आहे. खास अस्पृश्यांच्या हिताहिताची चर्चा करण्यासाठी सोमवंशीय मित्र, हिंद नागरिक, विटाळ विध्वंसक ही पत्रे उपजली आणि लयही पावली.परंतु वर्गणीदारांकडून योग्य प्रोत्साहन मिळत गेल्यास मूकनायक न डगमगता स्वजनोद्धाराचे  महतकार्य करण्यास योग्य पंथ दाखविल असे आश्वासन देताना ते अनुभवांती खोटे ठरणार नाही अशी खात्री बाळगून हे स्वशय निवेदन आटोपते घेतो.

कोणतेही चळवळीचे ,प्रबोधनाचे वृत्तपत्र वर्गणीदार वाचकांनी जिवंत ठेवावे लागते हे डॉ.आंबेडकर यांनी मूकनायकच्या पहिल्या अंकातूनच सांगितले होते. पण गेल्या शंभर वर्षात त्या इशाराकडे दुर्लक्ष केल्याने मूकनायक सह चळवळीची, प्रबोधनाची अनेक मूखपतत्रे बंद पडली हा खेदजनक इतिहास आहे.मूकनायक काढल्यावर लगेच डॉ. आंबेडकर सिडनीहम कॉलेजात प्राध्यापक झाले.ते सरकारी कॉलेज असल्याने त्यांना मूकनायकच्या संपादक पदाचा राजीनामा द्यावा लागला.पांडुरंग नंदाराम भटकर हे संपादक आणि ज्ञानदेव घोलप हे व्यवस्थापक झाले. त्यात ५ जुलै १९२० रोजी बाबासाहेब बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले.परिणामी मूकनायक चा आवाज क्षीण होत गेला व  अखेर बंद झाला. पुढे ३ एप्रिल १९२७ रोजी आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केले. त्यात पुनश्च  हरी ओम या अग्रलेखातून त्यांनी मूकनायक बंद पडल्या बाबत दुःख व्यक्त केले.

मूकनायचे जे अंक उपलब्ध आहेत त्यात डॉ.आंबेडकर यांनी मूलभूत स्वरूपाचे लेखन केलेले दिसून येते. मूकनायकच्या सहाव्या म्हणजे (१० एप्रिल १९२०)च्या अंकात माणगाव परिषदेचा सविस्तर वृत्तांत दिलेला आहे. तर दहाव्या अंकात (५ जून १९२० )नागपूरच्या बहिष्कृत समाज परिषदेचा वृत्तांत दिला आहे. मूकनायक मधून स्वराज्याची सर सुराज्याला नाही, हे स्वराज्य नव्हे तर आमच्यावर राज्य ,स्वराज्यातील आमचे आरोहण त्याचे प्रमाण व त्याची पद्धती, राष्ट्रातील पक्ष , दास्यावलोकन, लोकांना आमचा संदेश, उन्नतीचे साधन ,हिंदी राष्ट्राची प्राणप्रतिष्ठा ( आज  प्राणप्रतिष्ठेची वेगळीच चर्चा सुरू आहे )आदी अग्रलेखांसह विविध स्वरूपाचा मजकूर आहे. तत्कालीन घडामोडी, बातम्या जाहिरातीही त्यात दिसतात. त्याचे महत्त्व मोठे आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्याची अलीकडे मोठी चर्चा सुरू आहे. मूकनायक च्या तिसऱ्या अंकात ( २८ फेब्रुवारी १९२०)  डॉ. आंबेडकर यांनी आपल्या अग्रलेखात नागरिकत्वाच्या मुद्द्याला हात घातला आहे. शंभर वर्षानंतर आजही त्याचे महत्त्व मोठे आहे.ते म्हणतात......." जी सामाजिक बंधने वरिष्ठ हिंदूंना पोषक झाली आहेत ती या बहिष्कृत वर्गास इतकी मारक झाली आहेत की, त्यामुळे हा वर्ग नागरिकत्वासही दुरावला आहे .कोणत्याही व्यक्तीस नागरिक म्हणवण्यास काही हक्क असावे लागतात. त्यात (१) वैयक्तिक स्वातंत्र्य (२)वैयक्तिक संरक्षण (३) खाजगी मालमत्ता वाढवण्याचा हक्क (४) कायद्याच्या बाबतीत समता (५) सदसद विवेक बुद्धीला अनुसरून वागण्याची मोकळी (६) भाषण स्वातंत्र्य व मत स्वातंत्र्य (७)सभा भरवण्याचा हक्क (८) देशाच्या राज्यकारभारात प्रतिनिधी पाठवण्याचा हक्क (९) सरकारी नोकरी मिळवण्याचा हक्क यांचा अंतर्भाव होतो. परंतु सामाजिक बंधनामुळे वरील हक्कांतील बऱ्याच हक्कांना बहिष्कृत आंचवले आहेत. डॉ.आंबेडकर यांनी नागरिकत्वाचे जे हक्क सांगितले आहेत त्याचे समकालीन संदर्भ फार महत्त्वाचे आहेत. मूकनायक मधील विचार हे सामाजिक उत्थानाच्या चळवळीतील महानायकाचे विचार होते म्हणूनच आज त्याचे महत्त्व मोठे आहे. आज संसदीय लोकशाहीचा आणि संविधानिक मूल्यांचा एकीकडे जयघोष केला जात आहे.तर दुसरीकडे करोडो सर्वसामान्यांचे प्रश्न अधिकाधिक बिकट होत आहेत. अशावेळी या मुक्यांचा आवाज होत त्यांना नायक बनवण्याचे काम आजच्या माध्यमांनी केले पाहिजे. मूकनायकच्या वर्धापन दिनाचा तोच संदेश आहे.


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post