कोल्हापूरहून अक्कलकोटकडे पायी दिंडीचे प्रस्थान

पदयात्रेत ५०० स्वामी भक्तांचा समावे


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : श्री स्वामी समर्थ...जय जय स्वामी समर्थांचा जयजयकार करीत भक्तिमय वातावरणात कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट पायी दिंडीचे शनिवारी शिवाजी चौकात स्वामी भक्त सुहास लटोरे, मेघराज खराडे, अविनाश जाधव, नारायण साळोखे, प्रसाद वळंजु, नितीन पाटील यांच्या हस्ते महाआरती करुन प्रस्थान झाले. जिल्ह्यातील ५०० भक्त या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत. 

मार्गशीर्ष व दत्त जयंती उत्सवानिमित्त श्री स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रेच्या वतीने गेली आठ वर्षे कोल्हापूर ते अक्कलकोट पायी दिंडीचे आयोजन केले जात आहे. शनिवारी पहाटे तीन च्या सुमारास प्रयाग चिखली पंचगंगा नदी संगमावरील दत्त मंदीर येथे श्री स्वामी समर्थ महाराजांना महाअभिषेक, पूजाअर्चा संकल्प करुन पदयात्रेला प्रारंभ झाला. शिवाजी पुल, पंचगंगा घाट, येथे दिंडी येताच ढोलताषा, भगवे झेंडे घेतलेले स्वामीभक्त आणि सजवलेले घोडे  आणि सोबत स्वामी नामाचा गजर यामुळे दिंडीतील वातावरण भक्तीमय झाले. ज्ञानोबा तुकाराम अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था तुरंबे या बाल भजनी मंडळाचा कलाविष्कार नेत्रांचे पारणे फेडणारा ठरला. 

पंचगंगा नदी चौपाटी येथून पदयात्रा स्वामींचे शिष्य श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज यांच्या गंगावेश मठामध्ये आली. येथे मठाच्या विश्वस्तांनी रथाचे पूजन केले. त्यानंतर पदयात्रा गंगावेश, मार्गे रंकाळा स्टँड, ताराबाई रोड, महाद्वार रोड, पापाची तिकटी मार्गे शिवाजी पुतळा येथे आली. सालाबाद प्रमाणे येथेही  शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी, फुलांचा चौघाडा आणि आकर्षक रांगोळी काढून जल्लोषी वातावरणात स्वामींचे स्वागत केले. स्वामी भक्त सुहास लटोरे, मेघराज खराडे, अविनाश जाधव, नारायण साळोखे, प्रसाद वळंजु, नितीन पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते महाआरती करुन दिंडी अक्कलकोटकडे प्रस्थान झाली. यावेळी पदयात्रेचे कार्याध्यक्ष सुहास पाटील,  अध्यक्ष अमोल कोरे,  संस्थापक रमेश चावरे, यशवंत चव्हाण, नियोजन समिती अध्यक्ष गजानन शिंदे यांचेसह स्वामी भक्त उपस्थित होते. रस्त्याच्या दूर्तफा भक्तांनी स्वामी दर्शनासाठी गर्दी केली होती. 

सकाळी साडे दहा वाजता पदयात्रा पुढे मार्गस्थ झाली. व्हिनस कॉर्नर चौकामध्ये दिंडी येताच लक्ष्मीनारायण मंदीराच्या विश्वस्तांच्या वतीने स्वामींच्या रथाचे स्वागत करुन दिंडीतील सहभागी स्वामी भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. मार्केट यार्ड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दुपारी महाप्रसाद व विश्रांती झाली. त्यानंतर सायंकाळी सात वाजता अतिग्रे (ता. हातकणंगले) येथे पदयात्रा येताच ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले. पदयात्रेत महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post