चंदगड तालुक्यातील 55 हेरे सरंजाम जमिनीचे प्रलंबित काम मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश



प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर  : मुरलीधर कांबळे :

चंदगड तालुक्यातील एकूण 55 गावांमध्ये हेरे सरंजाम जमिनीबाबत पुर्नप्रदान शर्तभंग नियमित करणे, कुळे व वहिवाटदार यांचे हक्क संरक्षित करणे व शेती प्रयोजनार्थ वर्ग 1 करण्यासाठी जिल्ह्यातील 8 उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 2 डिसेंबर 2023 रोजी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार या पथकांना चंदगड तालुक्यातील गावे वाटप करण्यात आली असून या पथकामार्फत  दिनांक 2 जानेवारी 2024 ते 12 मार्च 2024  या कालावधीत काम पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

बऱ्याच वर्षापासून चंदगड येथील हेरे सरंजाम जमिनीबाबत प्रलंबित असलेले कामकाज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे.

 या जमिनीबाबत प्रलंबित खातेदार संख्या 22 हजार 945 असून , त्याचे क्षेत्र हे. 12 हजार 884.14 हे.आर. इतके आहे. हे कामकाज पुढील दोन महिन्याच्या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी  कालबध्द कार्यक्रम आखून देण्यात आला आहे. त्यानुसार   सोबत कालबध्द कार्यक्रम -कामकाजाचे स्वरूप कालावधी- पथकामधील महसूल विभाग कर्मचारी यांनी त्यांना आदेशामध्ये नेमून दिले हेरे सरंजाम इनाम असलेल्या क्षेत्रांच्या गावामध्ये स्थानिक तलाठी तसेच कोतवालामार्फत दवंडी देणे , खातेदारांची बैठक घेणे व त्यांना कालबध्द कार्यक्रमाबद्दल मार्गदर्शन करणे—दि. 2 जानेवारी 2024 ते 11 जानेवारी 2024 पर्यंत. 

गावामध्ये नेमणूक करण्यात आलेले संबंधित तलाठी यांनी त्याअनुषंगाने संबंधित गावात अर्जदार यांचे अर्ज स्वीकारणे - दि. 2 जानेवारी 2024  ते  15 जानेवारी 2024 पर्यंत. 

नेमण्यात आलेले तहसिलदार/नायब तहसिलदार, अव्वल कारकून, लिपिक यांनी पथक प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त अर्ज व त्यासोबतच्या कागदपत्रांची छाननी व पडताळणी करुन अंतिम यादी व 200 पट रक्कमेची परिगणना करुन चलनाने भरावयाची रक्कम गावातील नोटीस बोर्डवर जाहीर करणे - दि.8 जानेवारी 2024  ते  16 फेब्रुवारी  2024 पर्यंत. 

प्रसिध्द केलेल्या अंतिम यादीनुसार होणारी रक्कम (चलनाने शासकीय कोषागारात भरुन घेणे- दि. 8 जानेवारी 2024  ते  23 फेब्रुवारी 2024 पर्यंत. 

उपरोक्त नमुद आदेशानुसार पथक प्रमुखांना अधिकार प्रदान करण्यात आले असून त्यानुसार अंतिम आदेश पारित करुन संबंधित गावांत नेमलेल्या तलाठीकडून आदेशाच्या अंमलबजावणीकरीता फेरफार घेणे तसेच ज्या ठिकाणी पोटहिस्से तयार होत आहेत त्या ठिकाणी गाव नमुना 6 ड च्या नोंदी घेवून सदर 6 ड नमुना पथकासोबत नेमलेल्या भूमापक (सर्व्हेअर) यांच्याकडे मोजणीसाठी देणे, मोजणीच्या नोटीस संबंधितांना बजाविणे- दि.8 जानेवारी 2024  ते 1 मार्च  2024 पर्यंत 

पथकामध्ये नेमलेल्या अव्वल कारकून/मंडळ अधिकारी यांनी उपरोक्त नमुद अंतिम आदेशाप्रमाणे फेरफार नोंदी घेवून त्या प्रमाणित कराव्यांत. तसेच भूमापक यांनी मोजणी नकाशाची क प्रत सादर केल्यावर त्याचा अंमल देवून 7/12 विभागणीची फेरफार नोंदी प्रमाणित कराव्यात- दि. 8 जानेवारी 2024  ते  7 मार्च 2024 पर्यंत. 

पथक प्रमुख यांनी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व खातेदारांना दुरुस्त 7/12 चे वाटप करण्याबाबतचे कामकाज करण्याची कार्यवाही करावी- दि. 8 जानेवारी 2024  ते  12 मार्च 2024 पर्यंत असणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post