रायगड जिल्ह्यातील खोपोली पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एमडी बनविणाऱ्या फॅक्टरीवर छापा; 107 कोटींचे ड्रग्ज जप्त



प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी :  सुनील पाटील

मागील काही महिन्यांपासून रायगड जिल्हयात अंमली पदार्थांची तस्करी वाढल्याचे समोर आले होते. रायगडच्या समुद्र किनार्यावर अंमली पदार्थांची पाकिटे पोलिसांना आढळल्यानंतर रायगड पोलिसांची तपास यंत्रणा तत्पर झाली होती. यानंतर गुरुवारी (7 डिसेंबर) रायगड व खोपोली पोलिसांनी खोपोलीत छापेमारीची मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 107 कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहेत.


खोपोलीतील मौजे ढेकू गावाच्या हद्दीत इलेक्ट्रिक पोल बनवण्याच्या नावाखाली एमडी ड्रग्सच्या कारखान्यावर कारवाई करुन अंमली पदार्थ निर्मितीची फॅक्ट्रीच सील केली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत 85 किलो 200 ग्रॅम एमडी पावडर आणि एमडी बनविण्यासाठी वापरात येणारी रसायने असा एकूण 107 कोटी 30 लाख 37 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे एवढया मोठया प्रमाणावर शासनाचा कोणताही परवाना नसताना कंपनीचा कारभार बिनधास्तपणे सुरू होता. पण ही कंपनी नेमकी कुणाच्या आशिर्वादाने सुरु होती? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

खालापूर तालुक्यातील मौजे ढेकु गावच्या हद्दीत इंडिया इलेक्ट्रीक पोल्स मॅन्युफॅक्चरींग कंपनीचा नावाचा बोर्ड लावून आतमध्ये मात्र अंचल केमिकल या नावाने केमिकल बनवण्याचा व्यवसाय करणार्‍या कंपनीमध्ये प्रतिबंधित केलेले अंमली पदार्थ बेकायदेशीरपणे तयार केले जात असल्याची माहिती खोपोली पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी, खालापूरचे विक्रम कदम आणि खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांच्या समवेत पथकाने कंपनीवर छापा टाकला.

छाप्यादरम्यान कंपनीच्या चालकाकडे रासायनिक पदार्थ निर्मितीसाठी आवश्यक असणारा शासनाचा कोणताही वैध परवाना पोलिसांना आढळला नाही. त्या ठिकाणी उग्र वास येत असल्याचे व काही कच्चा माल, तसेच त्याचेवर प्रक्रीया करण्यासाठी आवश्यक साधन सामग्री असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. यामध्ये पक्का माल असलेली पावडर ही नार्को तपासणी कीटद्वारे तपासणी केली असता हा एम.डी. म्हणजेच मेफेड्रॉन असल्याचे निष्पन्न झाले. याची किंमत जवळपास 107 कोटी असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

106 कोटी 50 लाखाची एकुण 85 किलो 200 ग्रॅम वजनाची एम.डी.पावडर आणि 15 लाख 37 हजार 377 रुपयांची एम.डी.पावडर बनवण्यासाठी वापरण्यात येणारी रसायने त्याचप्रमाणे 65 लाखांची रासायनिक प्रक्रीयेसाठी असेंबल केलेली साधन सामग्री हस्तगत करण्यात आली असून तिघांना अटक करण्यात आली आहे. तर पोलिसांनी कंपनीही सील केली आहे.

कोकण परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण पवार, पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर, प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहाने, अभिजीत व्हरांबळे, हवालदार राजेंद्र पाटील, सागर शेवते, प्रसाद पाटील, महिला पोलीस हवालदार आर. एन.गायकवाड, पोलीस नाईक सतीश बांगर, प्रदीप कुंभार, आर.डी.चौगुले, राम मासाळ, प्रदीप खरात यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post