गोष्ट पैशापाण्याची..


प्रेस मीडिया लाईव्ह : 

        मराठी माणसाचे उद्योग उदीम यांचेशी तितके जिव्हाळ्याचे नाते नाही. मराठी उद्योजकांची नांवे सांगायची झाल्यास खुप विचार करावा लागतो, तरी पण हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच नांवे ध्यानात येतात. याचा अर्थ असा नाही की, मराठी माणसाची उद्योगपती होण्याची कुवत नाही. पण आमच्या मनांवरील पारंपारिक विचारांचे जोखड नेहमी यांत अडथळा बनत आली आहे. त्यात ग्रामीण भागांतील युवकांत कधी इंग्रजी भाषेचे भय तर कधी आर्थिक पाठबळाची कमतरता यामुळे व्यापार हे आपले क्षेत्रच नाही अशी पक्की धारणा बनते.जागतिकीकरणाच्या रेट्यात विकासाची बेटे रुंदावत असताना ग्रामीण भागांत उद्योजकतेची स्वप्नं रुजावी यासाठी प्रयत्न होणं गरजेचे आहे. त्यामुळे डॉ. एन्.टी. घट्टे चॅरिटेबल ट्रस्टने *गोष्ट  पैशापाण्याची* समजावून सांगण्यासाठी प्रसिद्ध उद्योजक प्रफुल्ल वानखेडे यांची प्रकट मुलाखत आयोजित केली होती.  प्रफुल्ल वानखेडे यांच्या या पुस्तकाने ग्रंथविक्रीचे सारे विक्रम मोडीत काढले आहेत. आज तक मुंबई या न्यूज चॅनेलचे संपादक अभिजीत करंडे व राजकीय घडामोडींचे विश्लेषक महाराष्ट्र टाईम्सचे पत्रकार प्रशांत अहेर यांनी मुलाखतीची सुत्रे हाताळली. खरे तर हे सारेच माझे मित्र ! माझ्या या मित्रांना इस्लामपूरला आणावे आणि त्यांचेतील सारा अर्थसंवाद माझ्या इस्लामपूरकर तरुणांच्या भविष्याची पायाभरणी करण्यास उपयुक्त ठरावा हिच यामागची माझी भूमिका होती.

       माणसाने माणसे जोडत जावी, शक्यतो भरपूर प्रवास करावा, चौकस बुद्धीने माहिती संकलन करीत राहावे, Proprietorship ची प्रायव्हेट लिमिटेड कसे होता येईल हे पहावे, वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्हाला चालना देत राहतो अशा अनेक उदाहरणातून व्यावसायिक वृद्धीचे विवेचन करत प्रफुल्ल वानखेडे यांची मुलाखत रंगत गेली. उद्योजक होण्यासाठी अनेक मिथ्यके आहेत. त्यांच्याच दडपणाखाली आपण दबून जातो. पण आपले कुटुंबिय व सहकारी यांचेशी संवाद करुन  व्यवसायाची मुहुर्तमेढ रोवली तर ते जास्त योग्य. व्यवसायाची सुरुवात करताना आपला ग्राहक आधी शोधता आला आणि त्याच्या अपेक्षेप्रमाणे आपले उत्पादन केले तर अधिक चांगले ठरु शकते. खरे तर लोकसंख्या आणि त्यांची गरज लक्षात घेतली तर भारताला औद्योगिक जगतात खूप मोठी संधी आहे. पण जागतिक उत्पादनांत आपला वाटा अवघा ३.५ % इतका नगण्य आहे. स्थानिक कच्चा मालावर आधारित उद्योग सुरु करणे सहज शक्य आहे. त्यासाठी होमवर्क गरजेचा आहे. अंबादास म्हस्के हा  बांधकाम मजूराचा मुलगा केवळ शिक्षणाच्या ध्यासापोटी सरकारी शाळेत शिकूनही जगप्रसिद्ध होंडा कंपनीत वार्षिक ४० लाख रुपयांची नोकरी मिळवू शकतो हे प्रेरणादायी आहे. अभिजीत आणि प्रशांतच्या मिश्किल प्रश्नांना उत्तरे देत अर्थशास्त्रासारखा गहन विषयही प्रफुल्ल वानखेडे यांनी प्रत्येकाला समजेल एवढा सोपा केला. 

      गेला आठवडाभर इस्लामपूरमध्ये या कार्यक्रमाची  उत्सुकता होती. राज्याचे माजी अर्थमंत्री आ. जयंतरावजी पाटील आणि महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर. पाटील ( दादा ) यांनी मुलाखतीला हजर राहून मनोमन दाद दिली. प्रा.शामराव आण्णा पाटील ( अध्यक्ष, राजारामबापू सह.बँक ) या कार्यक्रमाच्या आयोजनांवर बारकाईने लक्ष ठेऊन होते. प्रा. संदीप पाटील व प्रा. प्रकाश जाधव आण्णांच्या सुचनेप्रमाणे आयोजनात कोणती उणीव राहणार नाही याची काळजी घेत होते. अॅड. अशोक येडेकर  व सनदी लेखापाल राहूल कुलकर्णी यांचाही या आयोजनांत सहभाग होता. अक्षय कुलकर्णी यांनी नेटक्या व समयोचित सुत्रसंचालन केलं. ग्रामीण भागांत आर्थिक नियोजन व उद्योजकता विकासाची स्वप्ने तरुणांत पडावी यासाठीचा आमचा प्रयत्न फलद्रुप व्हावा हीच मनोकामना !

मितेश घट्टे
दि. २२ ऑक्टोबर २०२३

Post a Comment

Previous Post Next Post