गांधी सप्ताहातील व्याख्यानास प्रतिसाद

गांधीजींना फक्त स्वच्छ भारत अभियान पुरते मर्यादित ठेवणे चुकीचे:सुधींद्र कुलकर्णी

...............

भारत-पाक- बांगलादेशाची युनियन शक्य : सुधींद्र कुलकर्णी


प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांना फक्त स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड ॲम्बेसेडर करून ठेवले आहे, हे योग्य नाही. गांधीजींचे जीवनातील सर्व बाजूंना स्पर्श करणारे जगातील एकमेव आणि वैशिष्ट्य पूर्ण व्यक्तिमत्त्व समजुन घेतले पाहिजे , ते सर्वांनी प्रत्यक्ष कृतीतून जगून समजून घेतले पाहिजे',असे प्रतिपादन ज्येष्ठ विश्लेषक सुधींद्र कुलकर्णी यांनी केले.

गांधीजींबद्दल होणाऱ्या  अपप्रचाराचा समाचार घेताना सुधींद्र कुलकर्णी म्हणाले, 'गांधीजी हे दलितांचे हितचिंतकच होते, हिंदू - मुस्लीम एकतेचे पुरस्कर्ते होते, फाळणीला जबाबदार नव्हते. फाळणीला ब्रिटीश, मुस्लीम लीग, हिंदुत्ववादी जबाबदार आहेत.व्हॉटस अप युनिव्हर्सिटी, काही वाहिन्यांवरून होणारा अपप्रचार थांबला पाहिजे.संघपरिवार गांधीजींना एका बाजूला प्रात : स्मरणीय म्हणतो, तर दुसऱ्या बाजुला खलनायक ठरवले जाते, याला आपण विरोध केला पाहिजे.

 भारत- पाक संबंध सुधारले तर चांगला परिणाम घडून येईल. दक्षिण आशियाला नवे भवितव्य लाभेल.अखंड भारत शक्य नाही, पण भारत, पाकिस्तान, बांगला देश या ३ देशांची साऊथ एशियन  युनियन झाली पाहिजे. भारत- चीन कायमस्वरूपी एकमेकांना पाण्यात पाहू शकणे चांगले नाही. त्यासाठी गांधी विचारांचा प्रसार केला पाहिजे.महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह निमीत्त आयोजित सुधींद्र कुलकर्णी यांच्या ' गांधी समजून घेताना ' या व्याख्यानास शुक्रवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी ते बोलत होते.

गांधी भवन ,कोथरूड येथे ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता हे व्याख्यान झाले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी चे अध्यक्ष डॉ कुमार सप्तर्षी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

व्यासपीठावर संदिप बर्वे, जांबुवंत मनोहर, सचिन पांडुळे उपस्थित होते. सभागृहात अन्वर राजन, डॉ. प्रवीण सप्तर्षी, डॉ. उर्मिला सप्तर्षी, अन्वर राजन, नीलम पंडित , अरूण खोरे , अॅड. संतोष म्हस्के, नितीन सोनवणे आदी उपस्थित होते.

सुधींद्र कुलकर्णी म्हणाले, ' गांधी भवन मध्ये युवक कार्यकर्त्यांचे युवाशक्ती दिसली ती इतरत्र दिसत नाही. युवक क्रांती दलामुळे हे घडले असावे.डॉ. कुमार सप्तर्षी यांचे ऋषीतुल्य व्यक्तीमत्व कारणीभूत आहे.

प्रथमच मला महात्मा गांधींवर बोलण्याची संधी पुण्यात मिळाली आहे.   गांधी आणि टॉलस्टॉयसारख्या जगातील अनेक महनीय व्यक्ती भेटल्या नाहीत पण, पत्रव्यवहारातून स्नेही झाल्या.

पुण्याचा आणि महात्मा गांधींचा खरोखरीच जवळचा संबंध आहे. पुण्यातील गोपाळ कृष्ण गोखले यांच्या मुळेच ते महात्मा बनले. मंडाले तून परत आल्यावर टिळक हे हिंदू मुस्लिम एकतेचे पुरस्कर्ते झाले. लखनौ करार हा फाळणी टाळणारा ठरू शकत होता.

गोपाळ कृष्ण गोखले, येरवडा कारागृह ,उरळी कांचन चे निसर्गउपचार केंद्र , नथुराम गोडसे हे पुणे आणि गांधीजी यांच्यातील महत्वाचे दुवे आहेत. गांधीजींना समजुन घ्यायचे असतील तर आपण गांधीजींच्या विचारानुसार कृती केली पाहिजे.महिमा मंडण न करता चिकित्सक पद्धतीने गांधी समजून घेतले पाहिजेत. परस्पर विरोधी विचार धारा यामध्ये संवाद, संपर्क आणि समन्वय याची गरज आहे.

गांधीजी हे जगातील एकमेव नेते असे आहेत, ज्यांनी सामजिक, राजकीय आणि वैय्यक्तिक जीवनातील सर्व गोष्टींना स्पर्श केला आहे. जन सेवेतून त्यांनी या सर्वाचा आविष्कार केला. गांधींना अपेक्षित स्वातंत्र्य आणि स्वराज्य हे आपल्याला अजून कळाले नाही. स्वतः ने स्वतःचे, समाजाने समाजाचे, देशाने देशाचे संचालन करणे हे स्वराज्य आहे

नितीन सोनवणे यांचे कौतुक

गांधीचा संदेश घेऊन जगभर, आणि  पाकिस्तानात जाणाऱ्या युवक क्रांती दलाच्या नितीन सोनवणे या कार्यकर्त्याचे सुधींद्र कुलकर्णी यांनी कौतुक केले.

चीनशी संबंध सुधारले तर आपण जग बदलू शकतो. गांधीजींचे विचार त्यासाठी उपयोगी ठरतील 

हिंदुत्ववादी हेच हिंदू धर्माचे शत्रू: डॉ कुमार सप्तर्षी

अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ कुमार सप्तर्षी म्हणाले,' हिंदू धर्मात असलेले सर्व सद्गुण पुसून टाकण्याचे काम चालू आहे. त्यांना  सद्गुण विकृती म्हटले जात आहे.हे काम हिंदुत्ववादी करीत आहेत. असेच पुढे चालू राहता कामा नये. हिंदुत्ववादीच हिंदू धर्माचा शत्रू आहेत.

.

Post a Comment

Previous Post Next Post