संपादकीय : कुलगुरू पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या बायोडाटाचे ऑडिट व्हावे....एक अपेक्षा : डॉ. तुषार निकाळजे



प्रेस मीडिया लाईव्ह : 

 सध्या वेगवेगळ्या विद्यापीठांच्या रिक्त असलेल्या कुलगुरू, प्र- कुलगुरू, कुलसचिव इत्यादी पदांच्या नेमणुका होण्याच्या प्रक्रिया चालू आहेत.  एका विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठीच्या पहिल्या पाच उमेदवारांच्या नावांची यादी नुकतीच जाहीर झाली. या पाच उमेदवारांच्या मुलाखती होतील आणि यापैकी एकाचे कुलगुरू पदी नियुक्ती होईल, ही एक नेहमीचीच कार्यपद्धती आहे. विद्यापीठ अनुदान आयोग, विद्यापीठ कायदे, नागरी सेवा नियम इत्यादींमधील तरतूद पाहता  शैक्षणिक, संशोधनात्मक व अनुभव यांचा विचार करून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविले जाते. तत्पूर्वी पदासाठी अर्ज करताना उमेदवार त्याचा बायोडाटा अर्जामध्ये नमूद करतात. परंतु या अर्जामध्ये नमूद केलेल्या बायोडेटाचे बारकाईने परीक्षण केल्यास वेगळीच बाब निदर्शनास येते. मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या एखाद्या उमेदवाराच्या बायोडाटाचे  बारकाईने निरीक्षण केल्यास विरोधाभास जाणवतो. एखादा प्राध्यापक आपला 20 ते 25 वर्षांचा अनुभव त्यामध्ये नमूद करतात. तसेच त्यांनी वेगवेगळ्या विभागांमध्ये केलेल्या प्रभारी कामांचा उल्लेख करतात. एका प्राध्यापकास विद्यापीठातील  राष्ट्रीय मुल्यांकन  विभाग, नवसंशोधन विभाग, शैक्षणिक विभाग यांचा अधिभार किंवा प्रभारी म्हणून नेमणूक केलेली असते. याचबरोबर इतर बऱ्याच समित्यांचे सदस्यत्व दिलेले असते. उदाहरणार्थ:-  अभ्यास मंडळ, स्थानिक चौकशी समिती, याचबरोबर राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय कार्यशाळांमध्ये सहभाग यांचा समावेश असतो. अशा प्रकारचे उमेदवार वेगवेगळ्या अनुभवांचा वापर करून कुलगुरू पदासाठी अर्ज करीत असतात. कुलगुरू हा सर्व गुण संपन्न किंवा वेगवेगळ्या प्रकारचा शैक्षणिक, प्रशासकीय अनुभव असलेला असणे अपेक्षित आहे, परंतु याचा वेगळाच अर्थ काही उमेदवारांनी लावलेला दिसतो. अशा उमेदवारांनी ज्या विभागाचे कामाचा अनुभव सादर केला आहे, त्याचे बारकाईने परीक्षण किंवा अवलोकन केल्यास पुढील काही बाबी निदर्शनास येतील. विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांनी विद्यापीठास प्राप्त झालेल्या राष्ट्रीय मूल्यांकनावर पुन: श्च चौकशी करण्याचे पत्र पाठविले असल्यास त्याचे उत्तर या उमेदवार असलेल्या महोदयांनी दिलेले नसते, नवसंशोधन केंद्राचा पदभार सांभाळत असताना काही संशोधकांचे लघु प्रकल्प कचऱ्याच्या टोपलीत गुंडाळून  टाकलेले दिसतील, उपरोक्त नमूद केलेल्या समित्यांवर किंवा विभागांचे पदभार सांभाळताना या उमेदवारांना विशेष मानधन, वेतन, स्थानिक भत्ता, टी ए डी ए दिलेले असतात. मग हा अनुभव किती नैतिक? फक्त कुलगुरू पदाच्या शर्यतीमध्ये पात्र ठरण्यासाठी हा खटाटोप का? कुलगुरू पद हे नेमके श्रद्धा, निष्ठा की प्रतिष्ठा? असा प्रश्न उपस्थित होतो. विद्यापीठ हे समाज निर्मितीचे व भावी पिढी निर्मितीचे केंद्र असते,  याचा उल्लेख येथे आवर्जून करावासा वाटतो.  बऱ्याच वेळा अशा पदांवर नियुक्ती झाल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी उघडकिस येतात. परंतु कुलगुरू निवड समितीने उमेदवारांनी सादर केलेल्या बायोडाटाचे सर्वप्रथम परीक्षण अथवा अवलोकन करावे ही एक काळाची गरज आहे व  अपेक्षा देखील.

Post a Comment

Previous Post Next Post