सदलगा येथे श्री दत्त साखर व महाधनच्या वतीने ऊस पीक परिसंवाद उत्साहात

सदलगा येथे श्री दत्त साखर व महाधनच्या वतीने ऊस पीक परिसंवाद उत्साहात



प्रेस मीडिया लाईव्ह :

शिरोळ /प्रतिनिधी: 

     शेतकऱ्यांनी शेती करत असताना शेतीचे बजेट अर्थात अर्थसंकल्प मांडले पाहिजे. बियाणे, खत, कीटकनाशक, तणनाशक, मजुरी, पाणी आणि इतर सर्व खर्च कमी करून चांगले उत्पादन कसे घ्यावयाचे यासाठी सूत्र निश्चित केले पाहिजे. कमी खर्चात ऊस उत्पादन वाढ ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे पिकाचे व जमिनीचे शरीर शास्त्र समजून घेऊन शेतकऱ्यांनी शेती करावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. निलेश मालेकर यांनी केले.

      श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना व महाधन ॲग्रीटेक लिमिटेड पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री महादेव मंदिर सदलगा येथे ऊस पीक परिसंवाद घेण्यात आला. अध्यक्षस्थानी चंद्रकांत पाटील होते.

     डॉ. निलेश मालेकर पुढे म्हणाले, ऊस उत्पादन वाढीसाठी आवश्यक बाबींची शेतकऱ्यांनी माहिती घेतली पाहिजे. उसाच्या जाडी शिवाय टनेज येत नाही, त्यामुळे भरपूर ऊस भरपूर वजन हे चुकीचे असून उसाची संख्या नियंत्रित असायला हवी. अचूक खतमात्रा आणि अचूक तणनाशकाचा वापर केल्यास खर्चही कमी होतो. मशागत ते काढणीपर्यंतच्या अनावश्यक खर्चास फाटा देऊन जमिनीची सुपीकता आणि मुळांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आवश्यक ती रासायनिक व सेंद्रिय खते दिली पाहिजेत. जमिनीतील सेंद्रिय कर्ब आणि जिवाणू यांच्यावरही उत्पादन किती येते हे ठरत असते त्यामुळे त्यांची संख्या आणि प्रमाण वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत.

      श्री दत्तचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील म्हणाले, दत्त कारखान्याच्या वतीने विना मोबदला पाणी, पाने व माती परीक्षण कारखान्यामार्फत उपलब्ध आहे. ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देत आहोत. शेतकऱ्यांनी सुपर केन नर्सरी तंत्रज्ञान शिकून स्वतः रोपे तयार करावीत. पाणी, खत, वेळ आणि सेंद्रिय कर्ब वाढ व इतर बाबींचे योग्य नियोजन करावे, असे सांगून शेतकऱ्यांची जमीन पुढच्या पिढीला शाबूत ठेवण्यासाठीच कारखाना लागेल ती मदत देण्यास तयार असल्याचे सांगितले.

     महाधनचे सुजन मोटे यांनी महाधनने आणलेल्या न्यूट्रियंट अनलॉक टेक्नॉलॉजी या नवीन खत तंत्रज्ञानाची माहिती दिली. शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास निश्चितपणे उत्पादनात वाढ होत असल्याचे सांगितले. 

    प्रारंभी स्व. सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन झाले. सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच  गणपतराव पाटील यांना 'समाज भूषण' पुरस्कार तसेच 'लाईफटाइम अचिव्हमेंट' पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विविध संस्था, मंडळे व मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

     स्वागत कारखान्याचे व्हाईस चेअरमन अरुणकुमार देसाई यांनी केले तर प्रास्ताविक मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांनी केले. शेतकरी शिवपुत्र मरजे व अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले. सूत्रसंचालन माणिक चंदगडे सर यांनी केले तर आभार ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगुले यांनी मानले.

    यावेळी कारखाना संचालक शरदचंद्र पाठक, महेंद्र बागे यांच्यासह बाळासाहेब पाटील, रमेश देसाई, सुरेश देसाई, कुमार बदनीकाई, विद्यासागर पाटील, सुरेश कुंभार, बाळासाहेब पाटील, ऍड. सुरेश देसाई, महालिंगशा स्वामी, सुधाकर कमते, राघवेंद्र डांगे, प्रदीप पाटील, पिरगोंडा पाटील, सरदार अपराज, जयकुमार खोत, महाधनचे देवराज पाटील, माती परीक्षक ए. एस. पाटील, संजय सुतार यांच्यासह शेती अधिकारी, कर्मचारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post