शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे ‘मायक्रो’ प्लानिंग.

 जिल्हाधिकार्‍यांची माहिती : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार.




प्रेस मीडिया लाईव्ह : 

शिवाजी शिंदे : जिल्हा प्रतिनिधी परभणी.

परभणी : दि .25 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत रविवारी (दि.27) दुपारी आयोजित केलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे सर्व यंत्रणांनी भक्कम असे ‘मायक्रो’ प्लानिंग केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलतांना दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी गावडे, मुख्यमंत्री कार्यालया- तील विशेष कार्यकारी अधिकारी राहुल देशपांडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रताप काळे, जिल्हा पोलिस अधिक्षक आर. रागसुधा यांनी शासन आपल्या दारी या जिल्हास्तरीय कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली.

ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या योजनां विषयक समस्या सोडविण्या करीता राज्य सरकारने 15 एप्रिल 2023 पासून हे अभियान राबविले आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 हजार गरजू नागरीकांना लाभार्थ्यांना यातून लाभ मिळावा, अशी अपेक्षा आहे. परभणी जिल्ह्यात या दृष्टीने यापेक्षाही अधिक लाभार्थ्यांना लाभ मिळावा, असे प्रयत्न सुरु आहेत, असे ते म्हणाले.नोडल अधिकारी नियुक्त शासन आपल्या दारी या जिल्हास्तरीय कार्यक्रमाच्या दृष्टीकोनातून सुक्ष्म असे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी 23 नोडल अधिकारी, 82 सहाय्यक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून कार्यक्रमस्थळी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पूरेसा बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी 120 पोलिस अधिकारी व 1 हजार पोलिस कर्मचार्‍यांचा कार्यक्रमस्थळी बंदोबस्त राहणार आहे. तसेच यशस्वीतेकरीता तालुका व जिल्हास्तरावर संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले असून विविध समित्या स्थापन करीत त्या समित्यां मार्फत अपेक्षित कामे पूर्ण केली जात आहेत.

17 हजार 600 लाभार्थी येणार या जिल्हास्तरीय कार्यक्रमास जिल्ह्यातील 17 हजार 600 लाभार्थी उपस्थित राहणार असून त्यांच्याकरीता 400 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी प्रातिनिधीक स्वरुपात काही लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तर उर्वरीत एकूण 1 हजार 60 लाभार्थ्यांना स्टॉलच्या माध्यमातून लाभ बहाल करण्यात येणार आहे.भव्य मंडप व 80 स्टॉल्स शासनाच्या विविध विभागातील योजनांची माहिती सर्वसामान्य नागरीकांना सहजपणे मिळावी या दृष्टीने 80 स्टॉल्स कार्यक्रमस्थळी उभारण्यात येणार असून त्याद्वारे नागरीकांना योजनांची माहिती दिली जाणार आहे. तसेच कार्यक्रम स्थळी भव्य मंडप उभारण्याचे काम सुरु आहे. किमान 35 हजार नागरीकांच्या क्षमतेचा हा मंडप असणार आहे. या व्यतिरिक्त या परिसरात कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविण्यता विभागा मार्फत महारोजगार मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे.

लाभार्थ्यांची क्रॉस चेकींग होणार. या जिल्ह्यात शासनाच्या विविध विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेणार्‍या लाभार्थ्यांचे नाव, रहिवाशी ठिकाण, मोबाईल नंबर, कोणत्या योजनेचा लाभ घेतला या नोंदीचा डाटा प्रशासनाने घेतला असून या लाभार्थ्यांची क्रॉस चेकींग केली जाणार आहे. योग्य लाभार्थ्यांनाच अचूकतेने लाभ मिळावा हे त्या मागचे कारण आहे, असे मुख्यमंत्री कार्यालया- तील विशेष कार्यकारी अधिकारी राहुल देशपांडे यांनी नमूद केले. लाभार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार असून कार्यक्रमाहून परतते वेळी एक रोपही लावण्याकरीता देण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post