छद्म विज्ञानाऐवजी शुद्ध विज्ञानाकडे अधिक गांभीर्याने पाहिले जाईल ही अपेक्षा

 प्रबोधिनीच्या चर्चासत्रातील मत 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी  : चंद्रयान-३ मधील विक्रम लॅडर त्यातील प्रज्ञान बग्गी सह दक्षिण ध्रुवावर उतरला.या भागात उतरत चंद्रविजय मिळवणारा भारत पहिला देश ठरला.ही कामगिरी भारताच्या विज्ञान क्षेत्रात सुवर्णअक्षराने लिहावी लागेल.

ही अवघड मोहीम पूर्ण क्षमतेने आणि  कमीत कमी खर्चात यशस्वीरीत्या पूर्ण केली याबद्दल या प्रक्रियेत प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या सर्व वैज्ञानिकांचे,घटकांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. स्वातंत्र्यानंतर उद्योग व कारखाने हीच राष्ट्राची खरी मंदिरे मानणारे शुद्ध विज्ञानाचा पुरस्कार करणारे विज्ञानवादी दृष्टी असलेले नेतृत्व,भारतीय संविधानाने स्वीकारलेला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि त्या दिशेने गेली अनेक दशके इस्रोच्या शास्त्रज्ञांनी अथकपणे अवकाश विज्ञानात केलेले संशोधन आणि त्याला वेळोवेळी प्रामाणिकपणे सहकार्य करणाऱ्या सर्व केंद्र सरकारांमुळे हे यश लाभले आहे.यामुळे प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानाने भरून आला आहे. या घटनेमुळे आमच्या राजकीय, सामाजिक ,सांस्कृतिक जीवनामध्ये 

छद्म विज्ञानाऐवजी शुद्ध विज्ञानाकडे अधिक गांभीर्याने पाहिले जाईल अशी अपेक्षा आहे, असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात ' चांद्रयान-३ ची यशस्वी मोहीम 'या विषयावर व्यक्त करण्यात आले.या चर्चासत्रात प्रसाद कुलकर्णी, राहुल खंजिरे,दयानंद लिपारे,अशोक केसरकर,सचिन पाटोळे, देवदत्त कुंभार,पांडुरंग पिसे, शकील मुल्ला,मनोहर जोशी आदींनी आपले विचार मांडले.

भारतीय माणसांच्या बुद्धीकौशल्याला जगभर मान्यता आहे. सर्व प्रकारच्या बौद्धिक क्षेत्रामध्ये जागतिक पातळीवर भारतीय माणसे आहेत. ही सारी कमालीची लौकिकपात्रही आहेत.त्या बुद्धिमत्तेला योग्य पद्धतीने भारतातच विकसित आणि कार्यरत होण्याची संधी देणारी धोरणे आखणे व होणारा ब्रेनड्रेन थोपवणे याकडे राज्यकर्त्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे असेही मत या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. या चर्चासत्रात चांद्रयान मोहिमेचे यश, त्याची पार्श्वभूमी,त्याचे भविष्यातील होणारे फायदे, शुद्ध वैज्ञानिक दृष्टिकोनाचे राष्ट्राच्या विकासातील महत्त्व, छद्म विज्ञानान होणारे नुकसान आदी अनेक मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली.या चर्चासत्रास अप्पा पाटील, डी. एस.डोणे , बी. जी.देशमुख, रामभाऊ ठिकणे, अशोक मगदूम, शहाजी धस्ते, पाटलोबा पाटील,रमेश लोहार आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post