हरवलेले संस्कार’ पुन्हा रुजवण्यासाठी संस्कारमाला ही लोकचळवळ बनली पाहिजे



प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे : रोग होण्याआधी घेतलेले औषध म्हणजे संस्कार होय. संस्कार ही निरंतर प्रक्रिया असून कुसंस्कार आणि सुसंस्कार असे दोन्ही संस्कार समाजात घडतांना दिसतात. त्यामुळेच तरुण पिढीला कुसंस्कारांपासून दूर ठेवून सुसंस्कार त्यांच्या मनात रुजवणे अत्यंत गरजेचे आहे. त्या दृष्टीने ‘हरवलेले संस्कार’ ही संस्कारमाला अतिशय उपयुक्त ठरेल. समाजात स्तुत्य उपक्रम सुरु केल्याबद्दल संयोजक आबा बागुल यांचे मी अभिनंदन करतो. अशा भावना ज्येष्ठ विचारवंत व ‘आदर्श शिक्षक’ सन्मानाने पुरस्कृत न.म. जोशी यांनी आज व्यक्त केल्या. पुणे महानगरपालिकेच्यी राजीव गांधी अकॅडमी ऑफ इ लर्निंग आणि पुणे नवरात्रौ महोत्सव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हरवलेले संस्कार’ या संस्कारमालिकेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत माजी आमदार उल्हास पवार होते.   

प्रारंभी द्वारका पीठाच्या शंकराचार्यचे पुणे प्रतिनिधी कै. शंकरदत्त ज. महाशब्दे गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने या संस्कार मालेच्या पहिल्या पुष्पाचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाचे संयोजक माजी उपमहापौर आबा बागुल यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. 

न.म. जोशी पुढे म्हणाले की, हल्ली पालक व मुले यांच्यात संवाद कमी पडत आहे. पूर्वी जेवण घरी व्हायचे आणि चित्रपट बाहेर जाऊन बघितला जाईचा. आता मात्र चित्रपट घरी टी.व्ही.वर बघितला जातो आणि जेवण बाहेर केले जाते. त्यामुळे कुटुंबांमध्ये जेवताना पालक व मुले यांच्यात घडणारा संवाद संपला आहे. त्यातून सुसंस्कार ही कमी होत राहिले. औपचारिक संस्कारांचे ठिकाण म्हणजे शाळा व महाविद्यालय असूनही तेथे ही सुसंस्कारांचे शिक्षण अपवादानेच दिले जाते. यामुळेच तरुणांमध्ये गुन्हेगारी वाढत असून समाज स्वास्थ्याच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळेच आबा बागुल यांनी सुरु केलेल्या या संस्कार मालेचे महत्व अनन्य साधारण आहे. पुणे शहरात सर्व ठिकाणी हा उपक्रम राबवला जावा असे सांगून त्यांनी या विधायक उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. 

या उपक्रमाचे संयोजक माजी उपमहापौर आबा बागुल आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, माणसे हरवतात, पैसे हरवतात आणि आता संस्कारही हरवत चालले आहे ही चिंतेची बाब बनली आहे. तरुणांमध्ये संस्कार कमी पडत आहे आणि गुन्हेगारी वाढत आहे. गाड्यांच्या काचा फोडणे, मोटारसायकली जाळणे, कोयता गँगचे गुन्हे अशा बातम्या ऐकून चिंता वाढते.  पोलिसांनी अशांवर गुन्हे दाखल केल्याने प्रश्न सुटणार आहे काय?  असा प्रश्न विचारून आबा बागुल म्हणाले की, तरुणांवर चांगले संस्कार रुजावेत यासाठी ही संस्कारमाला आयोजित केली आहे. दर १५ दिवसांनी अशा व्याख्यानांचे आयोजन होईल. हा उपक्रम सार्वत्रिक होण्यासाठी पोलीस व सामाजिक संस्थाने व पुणे महानगरपालिकेने देखील यात सहभागी व्हावे असे आवाहन करून हे लोक चळवळ बनवली पाहिजे असे ते म्हणाले.  

अध्यक्षीय भाषणात उल्हास पवार यांनी आबा बागुल यांच्या या संकल्पनेचे कौतुक करून म्हंटले की, समाजात चांगले संस्कार रुजण्यासाठी ही चळवळ बनवली पाहिजे ही आबा बागुलांची कल्पना अतिशय योग्य आहे. मातृ पितृ देवो भव, गुरु देवो भव, अतिथी देवो भव यातून चांगले संस्कार रुजत असतात. पूर्वी घरी पाहुणे आले की सारे कुटुंब गप्पांमध्ये रंगून जाईचे. आता मात्र टी.व्ही. आणि मोबाईल याचे वेड लागल्यामुळे घरी आलेले पाहुणे कधी जातील याची वाट बघितली जाते. कुटुंब आणि शाळा यांमध्ये संस्कार रुजायला सुरुवात होते. चांगल्या संस्कारांमुळे उत्तम नागरिक बनतो. सध्याची समाजातील परिस्थिती पाहून अशे हरवलेले संस्कार सर्वत्र रुजवण्यासाठी आबा बागुलांप्रमाणेच प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे असे ते म्हणाले. 

पुणे नवरात्रौ महोत्सवाचे सचिव घनश्याम सावंत यांनी सूत्रसंचालन केले तर राजीव गांधी अकॅडमी ऑफ इ लर्निंगचे प्रिन्सिपल जांबुवंत मसलकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास तरुण विद्यार्थी व पालकांनी मोठी गर्दी केली होती. 

यावेळी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे ट्रस्टी नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर,रमेश भंडारी,अश्विनी ताटे, संभाजी कोळी आदी उपस्थित होते.


आबा बागुल 

माजी उपमहापौर 

९८२२०१५४७९


फोटो ओळ :


1. दीप प्रज्वलन करताना डावीकडून उल्हास पवार,आबा बागुल,जांबुवंत मसलकर,न म जोशी,अश्विनी ताटे,नंदकुमार बानगुडे,नंदकुमार कोंढाळकर,रमेश भंडारी व संभाजी कोळी


2. डावीकडून, नंदकुमार कोंढाळकर, नंदकुमार बानगुडे,उल्हास पवार,न.म.जोशी,आबा बागुल,जांबुवंत मसलकर, संभाजी कोळी

Post a Comment

Previous Post Next Post