सामाजिक सलोख्यासाठी रक्तदान शिबिर हा स्तुत्य उपक्रम...प्रीतम म्हात्रे



प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

पनवेल : बकरी ईद आणि आषाढी एकादशी निमित्त पनवेल मधील विविध संघटना गेली पाच वर्षे रक्तदान शिबिर भरवित आहेत. हा स्तुत्य उपक्रम असून त्याचं अनुकरण करायला हवं." असे उद्गार माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी काढले. विविध संघटनांनी आयोजित रक्तदान शिबिराला सदिच्छा भेट दिल्यावर ते बोलत होते. 

            'ईद-उल-अजहा' (बकरी ईद) चा सण इस्लाम धर्मियांमध्ये साजरा केला जातो. धर्माने सांगितलेले त्याग हे मूल्य कुर्बानी प्रथेशी जोडलेले आहे. तसेच समतेची शिकवण देणारी आषाढी एकादशीही यावर्षी एकच दिवशी आली आहे. बकरी ईद निमित्ताने बकरे अथवा इतर प्राण्यांची कुर्बानी देण्याची प्रथाही पाळली जाते. 

    आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता, सर्व धर्मियांनी धार्मिक सण हे अधिकाधिक समाजाभिमुख व मानवतावादी करणे हे धर्माचेच उन्नयन आहे. आपल्या सर्वधर्मीय संतांनी ही हीच शिकवण दिली आहे. हाच विचार समोर ठेवून  “बकरी ईद” निमित्त पशूची कुर्बानी देण्याच्या प्रथेमध्ये कालानुरूप बदल व्हावा व या प्रथेला पर्याय म्हणून  पनवेल मधील विविध पुरोगामी संघटना गेली पाच वर्षे रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहेत. यावर्षीही २९ जून रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. रोटरी ब्लड बँकेच्या सहकार्याने ब्लड बँकेत घेण्यात आलेल्या या शिबिरात सर्व धर्मीय लोकांनी सहभाग घेतला .' कुर्बानी देऊ स्व रक्ताची, वारी ही जीवनदानाची ' असे आवाहन विविध संघटनातर्फे करण्यात आले होते. त्याला पनवेल, नवी मुंबई मधील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. 

     या शिबिरास पनवेल शांतीवन चे कार्यवाह विनायक शिंदे यांनी भेट दिली. महाराष्ट्र अंनिस राज्य पदाधिकारी आरती नाईक व प्रियांका खेडेकर, सर्वोदय चे अल्लाउद्दीन शेख, ग्राम स्वराज्य समितीचे हरिभाऊ बगाडे, संविधान प्रचारक प्रवीण जठार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास मंडळाचे कांबळे इत्यादी उपस्थित होते.

     महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती शाखा पनवेल, संविधान प्रचारक, सर्वोदय, हुसेनी फाऊंडेशन, राष्ट्र सेवा दल, ग्रामस्वराज्य समिती महाराष्ट्र, ग्राममित्र, ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था, मिशन माणुसकी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व सांस्कृतिक मंडळ या संस्थांनी हे शिबिर आयोजित केले होते.

Post a Comment

Previous Post Next Post