एक दिवस सेल्फी...वर्षभर ढलपी

 पर्यावरण दिनी : फोटोचा अल्बम...वर्षभर बोंबाबोंब


प्रेस मीडिया लाईव्ह :

5 जून पर्यावरण दिन निमित्ताने अनेक हौशे-गवशे-नवशे पर्यावरणप्रेमी अचानक जागे होतील, गल्लोगल्ली, चौका-चौकात उद्या झाडे लावतील* सोशल मीडियावर फोटोंचा भडीमार होईल...  पण पुढे त्या झाडांचं काय?  की दरवर्षीप्रमाणे.... खड्डा तोच.... झाड नवे ! असे विचार आतातरी बदलायला हवे, होय ना ?

        एक दिवस झाड लावून झाडासोबत सेल्फी काढायचा आणि काही दिवसानंतर त्या झाडाची जनावरे आणि माणसांनी ढलपी काढायची हे कितपत योग्य आहे ? कोणी साल काढतं, कोणी फांदी मोडतं, कोणी झाड उपटून टाकतं, कोणी जगलेल्या झाडांची ढलपी काढतं या मानसिकतेच्या विरोधात प्रबोधन कोणी करायचं ?

         पर्यावरण दिनाचे औचित्य साधून एवढी झाडे लावली, तेवढी झाडे लावली, म्हणून उद्या अनेक जण मिरवतील पण 50-60 झाडे लावून इव्हेंट साजरा करण्यापेक्षा 10 झाडे लावा आणि त्यांचे 50-60 आठवडे त्यांचे संगोपन करा तरच खऱ्या अर्थाने ती झाडे जगतील, तग धरतील, सावली देतील आणि तोच खरा पर्यावरण दिन साजरा होईल.

अनेक सेवाभावी वृक्षमित्र, संघटना, पर्यावरण प्रेमी काही मोक्याच्या जागी झाडे लावण्यासाठी जागा हेरून ठेवतात, पण अचानक त्याठिकाणी काही स्वयंघोषित पर्यावरण प्रेमींकडून तेथे झाडे लावली जातात. पण प्रश्न राहतो त्या झाडाच्या संगोपनाचा ! याही पुढे सांगायचे तर खऱ्याखुऱ्या वृक्षप्रेमी संघटनांना झाडे लावण्यासाठी इतरत्र जागा शोधावी लागते, धावपळ करावी लागते ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.

नवीन होऊ घातलेल्या वृक्षप्रेमींना हीच विनंती आहे की ,आपण आपल्या शहरातील अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या सेवाभावी वृक्षमित्र संघटनांच्या पाठीशी राहा. त्यांच्यासोबत जा झाडे लावा, यथाशक्ती त्या झाडांचे संगोपन करा, तरच खऱ्या अर्थाने पर्यावरण दिन साजरा होईल. यातूनच वृक्षांची संख्यात्मक नव्हे तर गुणात्मक वाढ होईल. त्याचबरोबर.....

झाडे लावताना खालील बाबींचा विचार नक्की करा

 रस्त्यावर झाड लावताना शक्यतो 4-5 फुटाच लावावे व ट्रीगार्ड सहित लावावे. जेणेकरून जनावरे आणि माणसं त्यांना त्रास देणार नाहीत.

 झाडे लावताना ती देशी पर्यावरणपूरक असावीत. विदेशी, शोभेची किंवा आपल्या भागातील पक्षांनी नाकारलेली झाड नको.

जैव विविधता जपता यावी म्हणून वेगवेगळी सावली देणारी, फळ देणारी, फुले देणारी झाडे वृक्षारोपणमध्ये सामील करून घ्यावीत.

एरवी फळांची झाड लोक नाकारतात, कारण मुले दगड मारतात वगैरे पण, या फळझाडांमुळे पक्षी जगतील, फुलझाडांमुळे मधमाश्या मध गोळा करतील, आणि असंख्य जीवांच्या जैवविविधतेसाठी फळझाडे फुलझाडे गरजेची आहेत म्हणून लावावीत. म्हणजे सर्व घटकांना त्याचा उपयोग होईल.

हा शब्दप्रपंच म्हणजे उपदेशाचा डोस नव्हे तर तर एक आवाहन आहे. यावर आपण नक्की विचार कराल ,असा विश्वास आहे.

 वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे...


- प्रा. युवराज मोहिते ,

 इचलकरंजी

Post a Comment

Previous Post Next Post