जागतीक पर्यावरण दिनी, सुरेश केसरकर यांना दिल्ली येथे नॅशनल इन्व्हॉर्नमेंट पुरस्कार प्रदान



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश केसरकर यांना पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय तसेच सातत्याने सेवाभावीवृत्तीने वैशिष्ठयपूर्ण कार्य केल्याबद्दल, नुकतेच देशाची राजधानी दिल्ली येथे संसद भवन मध्ये झालेल्या शानदार सत्कार समारंभ कार्यक्रमा वेळी, भारताचे सामाजीक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते राष्ट्रीय नागरी एवं पर्यावरण संरक्षण विभागाच्यावतीने दिला जाणारा "राष्ट्रीय पर्यावरण पुरस्कार- २०२३" देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी देशातील व परदेशातील उदयोग, पर्यावरण, सामाजिक क्षेत्र व शेती अशा विविध क्षेत्राच्या माध्यमातून पर्यावरणपूरक कार्य करणाऱ्या २५ जणांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

सुरेश केसरकर हे जिल्ह्यातील विविध चळवळीमध्ये सातत्याने भरीव कार्य करीत असून, अनेक संस्था व संघटनांच्या पदांवरती आपणही समाजाचे कांहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने सक्रियपणे कार्यरत आहेत. 

सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला - क्रीडा, संघटना व आस्थापना तसेच समाजातील वंचित व उपेक्षित घटकांसाठी त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अवयवदान - देहदान चळवळीचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात होवून याबाबत जनजागृत्ती व्हावी, यासाठी ते शासकीय व जिल्हा पातळीवर विविध संस्थांच्या माध्यमातून सक्रियपणे कार्यरत आहेत. शासनाच्या सर्व योजना व उपक्रम, कामगार मेळावे, कामगार शिबिरे, बाल संस्कार वर्ग, योगा वर्ग, वृक्षारोपण, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पूरग्रस्तांना अन्नधान्य वाटप, रक्तदान शिबिरे, पल्स पोलिओ लसीकरण, एड्स विषयक जनजागृती, हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅप्ड, हर्षनील मानव सेवा केंद्र, चेतना अपंगमती संस्था, बाल करूणालय आदी. सेवाभावी संस्थांना स्वतः व मित्रमंडळींच्या माध्यमातून सातत्याने दातृत्वाच्या भावनेने सढळ हस्ते मदत करीत असतात. 

कवी, साहित्यिक, लेखक, शाहीर आदींचे लेखन व त्यांच्या लेखनाला व्यासपीठ मिळावे यासाठी, धर्मनिरपेक्ष चळवळीमध्ये त्यांचे सातत्याने योगदान असते. राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी ते कार्यरत आहेत. सामाजीक कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांचेकडून मोठ्या प्रमाणात देश सेवा घडावी यासाठी, संबंधिताचा यथोचित मान - सन्मान करून त्यांना देशसेवेसाठी प्रोत्साहित करीत असतात. संघटित व असंघटित कामगार, बांधकाम कामगार, कंत्राटी कामगार यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात ते सातत्याने कामगार आयुक्त, जिल्हाधिकारी, राज्य शासन व केंद्र सरकारला पत्रव्यवहार व त्या संबंधि पाठपुरावा करून कामगार वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. 

आजअखेर त्यांना जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरचे विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. शासनाच्या सर्व योजना व उपक्रमांची माहिती जिल्ह्यातील सर्व घटकांना व्हावी व त्याचा लाभ समाजातील वंचित व उपेक्षित घटक यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम ते सातत्याने करीत आहेत. राज्यातील बोगस नोकर भरती प्रकरण, अवैध धंदे तसेच इतर अनेक बाबींवरती प्रभावी पत्रकारीतेच्या माध्यमातून आवाज उठवून आक्रमक व अभ्यासू कार्यप्रणालीव्दारे ते शासनाला सहकार्य करीत असतात. 

कोरोनाच्या काळात स्थानिक व परप्रांतीय कामगार वर्गाला केलेल्या सामाजिक कार्याच्या जोरावर त्यांना अनेक संस्थांनी "कोरोना योद्धा" हा बहुमान देवून सन्मानीत केले आहे.

सुरेश केसरकर हे मा. जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या शिफारशीनुसार सन २००४ पासून तहयात विशेष कार्यकारी अधिकारी या पदावरती कार्यरत आहेत. त्यांना लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड असून, प्रत्येक काम चांगल्या प्रकारे कसे करता येईल याकडे कटाक्ष ठेवून नेहमीच नेतृत्व करण्यामध्ये आघाडीवरती आहेत. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याची दखल घेत मार्च २०२३ मध्ये त्यांचा कोल्हापूर येथे जाहीर नागरी सत्कार देखील करण्यात आलेला आहे.

या प्रसंगी आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला असता, सदर पुरस्कारामुळे आपल्या जबाबदारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे तसेच आपल्या मित्रमंडळी व कुटुंबातील सर्व सदस्यांनी सहकार्य केल्यामुळेच हे यश मिळाले आहे, असे त्यांनी सांगितले. 

संसद भवनमध्ये झालेल्या या शानदार सोहळ्यास जागतीक पर्यावरण समितीचे प्रमुख मा. अतुल बगाई, केंद्रीय मंत्री मा. ना. रामदासजी आठवले, मा. विजय कुमार, मा. विजयराजे ढमाळ, दुबईचे उद्योगपती डॉ. अब्दुला, युनायटेड अरब अमिरातचे रवि पंडीत, केरळच्या सुलोचना शिवानंद, आसामच्या डॉ. आस्मा, सिने अभिनेत्री दिपाली सय्यद त्याचबरोबर पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे प्रशासनातले ज्येष्ठ सनदी अधिकारी, जागतीक व देश पातळीवर भरीव कार्य केलेले मान्यवर व प्रमुख सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

सुरेश केसरकर यांच्या सर्वच क्षेत्रातील यशस्वी व भरीव कार्याच्या अनुसंगाने जिल्हा तसेच राज्यभरातून त्यांच्यावरती कौतुकाचा तसेच अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post