20 गुंठ्याच्या आतील पूर्ण क्षेत्राचा खरेदीदस्त करण्यास परवानगी मिळावी

 सहाय्यक दुय्यम निबंधकांकडे मागणीचे निवेदन 

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : प्रतिनिधी 

शेतीमध्ये वीस गुंठ्याच्या आतील पूर्ण क्षेत्राचे खरेदीपत्र करण्यास कोणतीही अडचण नाही. मात्र 20 गुंठ्याच्या आतील पूर्ण क्षेत्राचा खरेदीदस्त करण्यास दुय्यम निबंधक कार्यालय तयार नाही. त्यामुळे 15 दिवसांत याबाबत योग्य निर्णय न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन सहाय्यक दुय्यम निबंधक ए.एम.देशपांडे यांना देण्यात आले.

पुणे विभाग दस्त नोंदणी महानिरीक्षकांनी जुलै 2021 मध्ये 20 गुंठ्याच्या आतील शेतीतील तुकड्यांचे खरेदीपत्र नोंदवू नये असे पत्र दिले होते. हा आदेश बेकायदेशीर होता. या आदेशाच्या विरोधात औरंगाबाद उच्च न्यायालायात याचिका दाखल झाली होती. यावेळी न्यायमुर्तींनी परिपत्रक रद्दबातल ठरवले आहे. शासनाने त्याबाबतची फेरयाचिका त्याच न्यायालयात दाखल केली होती. ही फेरयाचिका न्यायालयाने फेटाळली होती. तुकडेबंदी कायद्यानुसार 20 गुंठ्याच्या आतील पूर्ण क्षेत्र विक्री करण्यास कोणतीही कायदेशीर अडचण नाही. पूर्वी एक-दोन गुंठ्याच्या खरेदी होत होत्या. मात्र 12 जुलै 2021 च्या परिपत्रकानंतर राज्यातील दुय्यम निबंधकांकडून 20 गुंठ्याच्या आतील तुकडे खरेदी केली जात नाही. त्याचा फटका शेतकर्‍यांना बसत आहे. त्यामुळे तातडीने 20 गुंठ्याच्या आतील पूर्ण क्षेत्राची खरेदी पुन्हा सुरू करावी ,अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा नागरिकांनी सहाय्यक दुय्यम निबंधक ए.एम.देशपांडे यांना दिलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे.

या निवेदनावर अ‍ॅड.आनंद पटवा, संजय चोपडे, बजरंग चोपडे, शकील कडगे, उत्तम मोरे, सचिन ढोकळे, सचिन भोसले, राजू काकणकी आदींच्या सह्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post