समाजवादी प्रबोधिनीची ४६ वर्षे


प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी, 

समाजवादी प्रबोधिनी,५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट,इचलकरंजी - ४१६ ११५ जि.कोल्हापूर ता.हातकणंगले...(९८५०८ ३०२९०)

गुरुवार ता.११ मे २०२३ रोजी समाजवादी प्रबोधिनीचा ४६ वा वर्धापन दिन आहे.तत्कालीन राजकीय आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर स्थापन झालेल्या समाजवादी प्रबोधिनीचे व तिच्या कामाचे महत्त्व आजच्या संदर्भात अधिक आहे अशी आजची परिस्थिती आहे.  .‘वैज्ञानिक समाजवादाचे खुले ज्ञानपीठ ‘ हे ब्रीद घेऊन ११ मे १९७७ रोजी समाजवादी प्रबोधिनीची स्थापना झाली. महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेरही ख्यातनाम असलेल्या समाजवादी प्रबोधिनीची स्थापना थोर स्वातंत्र्यसैनिक आणि ज्येष्ठ विचारवंत आचार्य शांताराम गरुड यांच्या पुढाकाराने आणि इतर अनेक विचारवंत सहकाऱ्यांच्या मदतीने झाली. प्राचार्य ए.ए.पाटील,प्रा. डॉ.एन. डी.पाटील ,कॉम्रेड गोविंद पानसरे, भाई ज्ञा.स.नार्वेकर, प्राचार्य म.द.देशपांडे ,पी.बी.साळुंखे ऍड. डी.ए. माने,बाळासाहेब पोतदार,वि.स.पागे,डॉ.अक्षय मोहंती,अनंतराव भिडे आदी अनेक मान्यवर यात सहभागी होते.

संस्थेच्या स्थापनेपासून म्हणजे १९७७ पासून ३ सप्टेंबर २०११ रोजी कालवश होईपर्यंत आचार्य शांताराम गरुड समाजवादी प्रबोधिनीचे काम अविरतपणे करत होते. त्यांच्या बरोबर १९८५ पासून म्हणजे गेली अडतीस वर्षे प्रसाद कुलकर्णी समाजवादी प्रबोधिनीचे पूर्णवेळ कार्य करत आहेत. आचार्य शांताराम गरुड यांच्या पश्चात प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली आणि इतर सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने समाजवादी प्रबोधिनीचे काम आपण वाढत्या उपक्रमशीलतेने सुरू ठेवले आहे.यावर्षी १७ जानेवारी २०२२ रोजी प्रा. डॉ.एन.डी. पाटील सुद्धा आपल्याला सोडून गेले.एन.डी.सरांच्या जाण्याने समाजवादी प्रबोधिनीच्या संस्थापकांतील अखेरचा बुलंद आवाज आणि शिलेदार आपण गमावला आहे. एन.डी.सरांच्या निधनानंतर प्रबोधिनीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे जेष्ठ अर्थतज्ञ प्रा.डॉ.जे.एफ.पाटील हेही  ७ डिसेंबर २०२२ रोजी कालवश झाले.

या ४६ व्या वर्धापनदिनी सर्व संस्थापक सदस्यांना विनम्र अभिवादन करतानाच आपण सर्व मंडळी समाजवादी प्रबोधिनीचे जे काम संघटितपणे करत आहोत ते अधिक व्यापक करण्याची नितांत गरज आहे. काळ मोठा कठीण आला आहे हे खरे. कारण सारे इझम आणि संवैधानिक मूल्ये आज राज्यकर्त्यांकडून पायदळी तुडवले जात आहेत. प्रबोधन ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहेच.पण आजच्या अस्वथ वर्तमानात वैचारिक ,सैद्धांतिक पातळीवरील व्यापक प्रबोधनाची मोठी गरज आहे. प्रबोधिनीचे नूतन अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ.अशोक चौसाळकर आणि सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने आपण समाजवादी प्रबोधिनीचे काम अधिक विस्तारित करूया हीच या ४६व्या वर्धापनदिनाची मागणी आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानंतरचा आपला हा वर्धापनदिन ती प्रेरणा आपल्याला देईल अशी खात्री वाटते.

१९७५ साली आलेली आणीबाणी राजकिय, सामाजिक कार्यकर्त्यांना अस्वस्थ करून गेली. त्यांची मने सैरभैर झाली होती. तसेच १९६० नंतरच्या काळात राजकीय पक्षांच्या बांधणीतही दोष दिसू लागले होते.पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये प्रबोधनाचा अभाव होता. त्यामुळे समाजजीवनात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली होती. ही पोकळी भरून काढावी आणि जिज्ञासू कार्यकर्त्यांचे ,समाजाचे प्रबोधन करावे या हेतूने हे अपक्षीय ज्ञानपीठ तयार झाले. भारतीय राज्यघटनेच्या पायाभूत संकल्पनांची, राज्यघटनेच्या तत्वज्ञानाची, भारतीय संस्कृतीसह भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाची आणि निरनिराळ्या इझमची (तत्वज्ञानांची) जाण असलेले ,तशी मानसिकता तयार असलेले कार्यकर्ते , लोकप्रतिनिधी , नागरिक प्रत्येक क्षेत्रात निर्माण करणे हा संस्थेचा स्थापनेपासूनचा मुख्य उद्देश आहे. हे कार्य अविरतपणे सुरू आहे. असे काम करणारी ‘ समाजवादी प्रबोधिनी ‘ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था आहे. १९९९ साली महाराष्ट्र फाउंडेशनचा समाजकार्य गौरव पुरस्कारही संस्थेला मिळाला आहे.तसेच इतरही अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.

गेल्या ४६वर्षात व्याख्याने ,व्याख्यानमाला ,चर्चासत्रे ,अभ्यास शिबिरे ,परिसंवाद, मेळावे आदी स्वरूपाच्या सहा हजारांवर कार्यक्रमाचे आयोजन समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने करण्यात आले आहे. इचलकरंजी या मुख्य केंद्राबरोबरच कोल्हापूर ,सांगली ,सातारा ,सोलापूर, सिंधुदुर्ग आणि बेळगाव या जिल्ह्यातील विविध शाखांच्या माध्यमातून हे काम अखंडपणे सुरू आहे. त्यामध्ये प्रत्येक शाखेच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे अतिशय मौलिक स्वरूपाचे योगदान असते. समाजवादी प्रबोधिनीच्या उपक्रमात विविध क्षेत्रातील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय आणि राज्यस्तरीय मान्यवरांचा ,अभ्यासकांचा,विचारवंतांचा मोठा सहभाग असतो. लोक प्रबोधनाचे सातत्यपूर्ण उपक्रम हे प्रबोधिनीचे वैशिष्ट्य राहिले आहे. असे काम करणाऱ्या अनेक संस्था व चळवळी महाराष्ट्रात समाजवादी प्रबोधिनीच्या प्रेरणेतून तयार झाल्या याचा प्रबोधिनीला नेहमीच अभिमान आहे.

समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने गेली तेहेतीस वर्षे नियमितपणे ” प्रबोधन प्रकाशन ज्योती ” हे मासिक प्रकाशित केले जाते. lSSN प्राप्त असलेल्या या मासिकात वर्षभरात अंदाजे नऊशे पृष्ठांचा सकस वैचारिक मजकूर अवघ्या तीनशे रुपयांच्या वार्षिक वर्गणीत घरपोच केला जातो. आजअखेर ४२६ अंकाच्या माध्यमातून सत्तावीस हजारांवर छापील पृष्ठांचा मजकूर लोकप्रबोधनार्थ प्रकाशित केला आहे.” पुनर्मुद्रणाचा मुक्त परवाना ” हे या मासिकाचे वैशिष्ट्य आहे. कॉ. गोविंद पानसरे यांचे ‘शिवाजी कोण होता? , राजर्षी शाहू :वसा आणि वारसा ,मंडल आयोग तसेच प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांचे ‘शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ?,महर्षी शिंदे :एक उपेक्षित महात्मा आणि आचार्य शांताराम गरुड यांचे भारतीय राज्यघटना यासह अनेक अभ्यासकांच्या गाजलेल्या पुस्तक -पुस्तिका ‘ प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मधूनच सर्वप्रथम प्रकाशित झाल्या आहेत याचाही मोठा अभिमान प्रबोधिनीला आहे. 

या मासिकाचे १९९० ते २००१ ही अकरा वर्षे आचार्य शांताराम गरुड संपादक होते. तर २००२ पासून गेली एकवीस वर्षे मुख्य संपादक पदाची धुरा प्रसाद कुलकर्णी सांभाळत आहेत. संपादक मंडळात प्रसाद कुलकर्णी,प्रा.डॉ.अशोक चौसाळकर ,प्रा. डॉ. भारती पाटील ,प्राचार्य. डॉ.टी.एस.पाटील,प्राचार्य आनंद मेणसे हे सदस्य आहेत.तसेच या अंकाला दशरथ पारेकर, डॉ.नंदा पारेकर,संजीव चांदोरकर अशा अनेकांचे सातत्याने सहकार्य लाभत असते. या मासिकाचा वाचक वर्ग महाराष्ट्रभर पसरलेला आहे. जिज्ञासू – अभ्यासू वाचक, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, सामाजिक -राजकीय कार्यकर्ते , नागरिक बंधू – भगिनी या साऱ्यांनाच हे मासिक अतिशय उपयुक्त ठरते असा अनुभव आहे. या मासिकाच्या कार्यावर मुंबई विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथे पीएच.डी व एम.फिल. झालेले आहे. तसेच या मासिकाचा समावेश अनेक विद्यापीठांच्या भाषा व सोशल सायन्सच्या संदर्भ यादीमध्ये दिसून येतो.गेल्या तीस वर्षांमध्ये विविध विद्यापीठातील शेकडो प्रबंधांमध्ये या मासिकाचा उल्लेख संदर्भ म्हणून केला गेला आहे.याचाही विशेष आनंद आहे.

१९८४ साली समाजवादी प्रबोधिनीने ” प्रबोधन वाचनालय ” सुरू केले.शासनमान्य ‘ अ ‘दर्जा प्राप्त असलेल्या या ग्रंथालयातआजकथा,कादंबरी,ललित,काव्य,चरित्र,नाटक,समीक्षा,धर्म,राजकीय,वैचारिक अशा सर्व साहित्य प्रकाराची तीस हजारांवर पुस्तके आहेत.त्यामध्ये समृद्ध असा संदर्भ विभाग आणि तीन हजारांवर पुस्तकांचा बाल विभागही आहे.या वाचनालयात दररोज सोळा दैनिके येतात. तसेच शंभरावर नियतकालिकेही येतात.या मोफत वाचन विभागाचा आणि ग्रंथ विभागाचा लाभ शेकडो वाचक घेत असतात. प्रबोधन वाचनालयाच्या वतीनेही विविध साहित्य,कला, सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबवले जातात.

समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने अनेक शाखेवर कार्यकर्त्यांची साप्ताहिक,पाक्षिक बैठक होत असते. त्यातून ताज्या घडामोडींवर चर्चासत्र होत असते.तसेच प्रासंगिक व्याख्याने ,अर्थसंकल्प व्याख्यानमाला ,संवाद -संभाषणक्षम कार्यकर्ता प्रशिक्षण ,राष्ट्रीय एकात्मता मोहीम ,मतदार जागृती मोहीम ,प्रायोगिक शैक्षणिक उपक्रम ,प्रबोधन महिला मंच, विविध भाषा शिक्षण वर्ग, बांधकाम कामगार प्रशिक्षण वर्ग, दिवाणजी व जमाखर्च प्रशिक्षण वर्ग ,ग्रंथालय प्रशिक्षण वर्ग यासारखे अनेक उपक्रम राबवले गेले व राबवले जात आहेत. समाजवादी प्रबोधिनीच्या मुरगूड शाखेच्यावतीने १९८६ पासून ‘ मुरगूड ‘ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला घेतली जाते.तसेच किर्लोस्करवाडी शाखेच्या वतीने २०१२ पासून किर्लोस्करवाडी येथे ‘आचार्य शांताराम गरुड व्याख्यानमाला ‘ घेतली जाते. शिवाजी विद्यापीठा पासून विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमानेसुद्धा समाजवादी प्रबोधिनीने आजवर शेकडो उपक्रम घेतलेले आहेत.वृत्तपत्र लेखक संघ, अल्कोहोलिक ॲनॉनिमस, रंगयात्रा नाट्यसंस्था यासारख्या अनेक संस्था – संघटनांना समाजवादी प्रबोधिनीचे सातत्यपूर्ण सक्रीय सहकार्य असते.

समाजवादी प्रबोधिनीच्या कामात प्रा.डॉ.अशोक चौसाळकर ,प्रसाद माधव कुलकर्णी, शशांक बावचकर , प्रा. डॉ. भारती पाटील, प्राचार्य. डॉ.टी. एस. पाटील,प्राचार्य आनंद मेणसे ,अन्वर पटेल,प्रा.विजयकुमार जोखे, प्रा.शिवाजीराव होडगे ,बी.एस खामकर, प्राचार्य डॉ.सुनील हेळकर, डॉ. चिदानंद आवळेकर, राहुल खंजिरे ,सौदामिनी कुलकर्णी,प्रा.डी.डी.चोगुले, व्ही वाय ( आबा ) पाटील,प्रा.अनिल उंदरे, मुकुंद वैद्य,प्राचार्य विश्वास सायनकर,प्रा.बी.आर.जाधव,मोहनराव केळुसकर,उज्जला दळवी,दशरथ पारेकर,ऍड.अजित सूर्यवंशी, प्रा.नवनाथ शिंदे,प्रा.भास्कर कदम,एम.एस.चौगुले, जयकुमार कोले,प्रा.शांताराम कांबळे,प्रा.डॉ.काशिनाथ तनंगे,संजय संकपाळ,तानाजी पोवार, सुनील इनामदार,के.एस.दानवाडे, अस्लम तडसरकर,प्रा.रमेश लवटे,पांडुरंग पिसे,प्रा.अप्पासो कमलाकर, बबन बारदेस्कर,समीर कटके,माधवराव मोहिते,मारुती शिरतोडे,प्रा.डॉ.त्रिशला कदम,राजाराम माळी, हणमंतराव गाडगीळ,ऍड.दशरथ दळवी,प्रमोदकुमार पाटील , रमेश माणगावे,विजय मांडके,प्रा.डॉ.बाबुराव गुरव,प्रा.डॉ.भालबा विभूते यांच्यासह अनेकांचे मोठे योगदान आहे.नावे लिहिण्याची मर्यादा असल्याने सर्वांचीच नावे लिहू शकत नाही याबद्दल क्षमस्व.पण विविध शाखांतील अनेकजण आणि अनेकजण व्यक्तिगतही समाजवादी प्रबोधिनीचे कार्य व्यापक व्हावे यासाठी सातत्याने कार्यरत असतात.लोकप्रबोधनाचे हे कार्य संघटितरूपाने सुरू आहे ही अभिमानाची बाब आहे.

प्रबोधन चळवळीपुढील आव्हाने वाढत असतांना हे काम अधिक लोकसहभागाने करणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच ज्या मंडळीना समाजवादी प्रबोधिनीच्या कार्यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी जरूर संपर्क करावा. संस्थेच्या विविध उपक्रमांसाठी मोठा खर्च येत असतो.आपण स्वतः आर्थिक मदत करावी आणि इतरांकडून मिळवूनही द्यावी ही आग्रहाची विनंती आहे..तसेच प्रत्येक जिज्ञासू बंधू – भगिनीने ” प्रबोधन प्रकाशन ज्योती ” मासिकाचे वर्गणीदार वाचक व्हावे. आणि इचलकरंजी परिसरातील मंडळींनी या मासिकासह ‘ प्रबोधन वाचनालयाचे ‘ ही सभासद वाचक व्हावे असे या ४६ व्या वर्धापनदिनी नम्र आवाहन करतो. आपल्या सक्रिय सहभाग व सहकार्याच्या प्रतीक्षेत आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++

देणगीची आणि वर्गणीदार वाचक होण्याची अपेक्षा....

------------------–---------------------------

समाजवादी प्रबोधिनीचे कार्यालय,इमारत ,प्रबोधन वाचनालय, प्रबोधन ज्योती हे मासिक,सातत्याने होणारे असंख्य कार्यक्रम या सातत्यपूर्ण प्रबोधन कार्यासाठी, उपक्रमांसाठी दरवर्षी किमान दहा लाख रुपये खर्च येत असतो. यासाठीआपण देणगी रूपाने सहकार्य करावे अशी नम्र विनंती आहे. तसेच गेली चौतीस वर्षे सुरू असणाऱ्या 'प्रबोधन प्रकाशन ज्योती' मासिकाचेही आपण वर्गणीदार वाचक अद्याप झाला नसाल तर तेही व्हावे ही नम्र विनंती.या विनंतीचा स्वीकार करून त्वरित सहाय्य कराल ही अपेक्षा आहे. आपल्या सहकार्याच्या प्रतीक्षेत आहे.

१) देणगी:

-–----  देणगीचा चेक ' समाजवादी प्रबोधिनी ' या नावे पाठवावा.अथवा परस्पर बँक खात्यात रक्कम भरली तरीही चालू शकेलं. त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे.

खात्याचे नाव : समाजवादी प्रबोधिनी 

बँकेचे नाव  : कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक

शाखा :  इंडस्ट्रियल इस्टेट ,इचलकरंजी

खाते क्रमांक : 00 90011 00000237

IFSC_ KAIJ 0000009

अथवा 98 508 30 290 या नंबरवर गुगल पे ने देणगी जमा करून याच नंबर वर स्क्रीनशॉट पाठवून त्याची माहिती द्यावी. त्यामध्ये पोचपावती देणेसाठी आपला पिन कोडसह संपूर्ण पत्ता कळवावा.

२)'प्रबोधन प्रकाशन ज्योती' मासिकाची वर्गणी

------–------------------------

समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने गेली तेहेतीस वर्षे सातत्याने सुरू असलेल्या आपल्या 'प्रबोधन प्रकाशन ज्योती ' मासिकाद्वारे किमान ८००  ते ९०० छापील पानांचा प्रबोधनात्मक मजकूर प्रकाशित केला जातो. प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला अंक पोस्टाद्वारे पाठविला जातो. 

या अंकाचे  वार्षिक ५००/- दैवार्षिक ९००/-,चार वर्षाची १८००/- आणि बारा वर्षाची ५०००/- असे  वर्गणीचे दर आहेत. 

वर्गणीचा चेक, डीडी ' प्रबोधन प्रकाशन ' या नावे पाठवावा. अथवा मनी ऑर्डर करावी.किंवा परस्पर बँक खात्यात भरले तरीही चालू शकतील. त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे.

खात्याचे नाव : प्रबोधन प्रकाशन

बँकेचे नाव  : कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक

शाखा :  इंडस्ट्रियल इस्टेट ,इचलकरंजी

खाते क्रमांक : 00 90011 00000245

IFSC_ KAIJ 0000009

अथवा 98 508 30 290 या नंबरवर गुगल पे ने वर्गणी जमा करून याच नंबर वर स्क्रीनशॉट पाठवून त्याची माहिती द्यावी. त्यामध्ये पोचपावती देणेसाठी व अंक पाठविणेसाठी आपला पिन कोडसह संपूर्ण पत्ता कळवावा.

आपले स्नेहांकित

प्रसाद माधव कुलकर्णी

आणि

समाजवादी प्रबोधिनीचा संपूर्ण परिवार

----_--------------------------------_--------------

Post a Comment

Previous Post Next Post